Thursday, 17 May 2018

प्रवाह.

माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मला कधी कळलं नाही एवढं त्या अधिक मासाच आगमन हल्ली काही वर्षात कळायला लागलं आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे चाणाक्ष बाजारपेठ आणि जाहिरातवाले. अधिकमासाची चाहुलच मुळी या प्रस्थी सोनारांच्या अवाढव्य चंदेरी होर्डिंग्जने लागते. विवाहसंस्था किती का गर्ततेत सापडेना, मोडकळीला येईना आपल्या समाजातलं जावयाच कवतिक काही संपत नाही.

तर अधिक मास दानधर्म करण्यासाठी अतियोग्य समजला जातो म्हणे. आणि दानाचा-आहेराचा पहिला मान कुणाला तर तो ही जावयाला. बरं दानही असं तसं नाही तर सोन्या-चांदीचच. चांदीचं तर फार कौतुक. कोण असले जावई शोध लावतं कोण जाणे. दुनिया झुकती है, बस..झुकानेवाला चाहिये.
म्हणजे महिनाभर आता जेवणावळी, आहेरांचा, अनारश्यांचा, चांदीचा धुमाकूळ आणि व्हॉट्सऍपवर बायकोवरचे धोंड्याच्या इनोदाचे रतीब.
सगळाच विनोद आहे झालं.

आज सकाळचा चहा संपवून व्हरांड्यात बसलेली तर तालसुरात गाणे म्हणत वासुदेव गल्लीत आलेला.
बहुदा त्यांचीही घरं ठरलेली असतात त्यामुळे मी बसलेली दिसुनही माझ्याकडे दुर्लक्ष करत वासुदेव पुढे गेला.
दुस-या चहासाठी मी घरात आले तर तेवढ्यात
बाहेरुन आवाज आला..ताई...
पाहिलं तर फाटकाशी आवाज देत वासुदेव ऊभे.
आता आली का पंचाईत. दुसरा चहा घेऊन मला व्हरांड्यातच बसायचे होते. आणि यांची गाणीबिणी ऐकण्यात मुळीच इंटरेस्ट नव्हता. मुळात वासुदेव दारी आल्यावर काय करायच हेच मला माहित नव्हतं. अर्थात सगळ्याचं उत्तर पैसे देणं हा कॉमनसेन्स आहेच.

वासुदेवांनी चार पाचदा ताई..ताई..केलं..शेवटी आतुनच विचारलं चहा घेणार का ? तर हो म्हणाले. मग त्यांचा व माझा चहा घेऊनच बाहेर गेले. फाटक न उघडताच चहा हातात दिला. थोडं फार बोलले. मग लक्षात आलं त्यांना निदान बसायला तरी सांगावं. या..बसा म्हटलं तर गेट उघडून ते अंगणातच पण फाटकाजवळच बसले.
मग काय मीच चौकश्या कम गप्पा सुरु केल्या.

तर औंढ्याजवळचे हे सुभाष चव्हाण नावाचे वासुदेव अधिकमासानिमित्त बाहेर पडलेत. औरंगाबाद, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देहु-आळंदी करत पंढरपूरला अधिकमासा अखेरीस पोहंचणार आहेत. अधिकमासात लोकं जास्त दानधर्म करतात. समाजातल्या एका वर्गाचा उदरनिर्वाह अशा संस्कारी पध्दतीने चालवण्याची प्रथा एकनाथांनी सुरु केली आहे असं यांच म्हणणं आहे. लोकांच्या दारी पहाटेसच जावून देवाची,वासुदेवाची आशिर्वादपर गाणी-भजनं म्हणायची. एक संस्कारी पवित्र वातावरण निर्माण करायच. मग लोकही दानधर्म करत झोळीत शिधा, पैसा, वस्त्र असं टाकतात. तेवढीच संसाराला मदत. नसता असतेच शेतावर मजूरी.
सगळ्यांची देवाण घेवाणीची उत्तम सोय लावणारी ही अशी प्रथा पाडली म्हणून हे वासुदेव नाथांच फार कौतुक करत होते.
कुटुंब गावी आहे. मुलं शिकताहेत.
त्यांना ही वासुदेवगीरी येते पण करण्यात स्वारस्य नाही.

भाऊ..तुम्ही आत्ता गल्लीत पुढे गेला होतात, कुणी दान दिलं का ?
हो ताई..एका घरातनं दान मिळालं..साडी दिली, पैसे दिले.
हो का ? साडीच तुम्ही काय करणार ?
मुलीचं लग्न आहे माझ्या. तेव्हा तिला देईन.
लगेच साडी काढून दाखवली. यांची भाषा बरीच शुध्द होती.
इथे घर आहे का तुमचं ?
न्हाई ताई. मुकुंदवाडीत मंदिर आहे. त्या मंदीरात होते सगळी सोय.
आणि जेवण ?
सकाळपासून फिरतो. दुपारी कुणीतरी भाकर तुकडा देतं आणि रात्रीला मंदिरात जेवण मिळतं.
पुण्याला जात नाही का ?
पुण्याला आषाढ-कार्तिकात जातो. नेहमी नाही.
धार्मिक महिन्यात फिरायचं. लोकंही जरा जास्त दानधर्म करतात. आमचही पोट भरतं.
तुमचे एरियाही ठरलेले असतील ना ?
नाही ताई. मनात येईल तसं फिरायच, पन मराठी, मारवाडी दानधर्म नेमाने करतात. त्या नाथांनी बरी आमची सोय लावली आहे. दारोदार फिरुन देवाची गाणी म्हणतो. भरभरून आशिर्वाद देतो. लोकही दान देतात. पण आता पहिल्यासारखं राहिलं नाही. खेडोपाडी अजूनही वासुदेवाला रिकामं पाठवत नाहीत. शेहरात मात्र पायपीटंच फार होते. आता आमच्या संस्थेतर्फे ओळखपत्रही देतात. त्यामुळे शहरात दारोदार फिरायच भय वाटत नाही.
इरल्यासारख्या टोपीवर ओळखपत्र गुंडाळून ठेवलेलं दिसतच होतं. भगभगीत पिवळा ड्रेस, गळाभर वारकरी माळा, हातात टाळ..ताई..तुमच्यासाठी गाणं म्हणू ?
म्हणा की.
कुणाचं म्हणू ? देवीचं का वासुदेवाच ?
कुणाचही म्हणा हो.
तुम्ही सांगाल ते म्हन्तो. देवी का वासुदेव ?
ठीक आहे. म्हणा वासुदेवाचं..कधी ऐकलच नाहीये मी.
एकसुरी..री ओढत, टाळांच्या तालावर एक गाणं म्हटलं आणि निघाले.
निघताना..ताई..काही वस्त्रदान करा इच्छा असेल तर.
मघाशीच माझ्याही मनात आलं होतं. पण म्हटलं त्यांनी दृग्गोचार केला तर देऊ, नसता जाऊदे.
थांबा..जरा आणते हं. आहेरातली एक साडी त्यांच्या हातात ठेवली तर ताई तुमच्या आईच नाव काय ? वडीलांच नाव काय ? सासु-सास-यांच नाव काय हे विचारुन आशिर्वादपर एक गाणं लगेच सुरु केलं.  चौघांचीही नावं गुंफत गाण्यातनच परमेश्वराकडे आमच्या सुख, सौख्य, संपदेची मागणी केली. विठोबा, जेजुरी, ज्योतिबा, वणी, सप्तश्रृंगी, कोल्हापूर, अंबाजोगाईच्या देवी तसेच महाराष्ट्रातले आणि बाहेरचे काही ज्योर्तीलिंगांची नामावळी, त्यांचे आशिर्वाद मागत एकसुरी लांबलचक गाणं संपवलं. नमस्कार केला आणि चालू लागले.

मीही विचारात पडले. परवाच दर्श अमावस्या झाली.  शनी जयंती पण होती तर भल्या पहाटे अमावस्या मागायला निघालेल्या मांग महिलांचा जथ्थाच दिसला होता. डोईवर टोपलं, तेलाचा कॅन, टिफीन घेऊन बायाबापड्या तरातरा अमावस्या मागायला निघाल्या होत्या.
या प्रथा कुणी आणि कधी रुजवल्या माहीत नाही पण वेळोवेळी गांजलेल्यांना दोनचार पैसे मिळतील. एकवेळचं पोटभर जेवण मिळेल तसेच समाजातही, समाजाचे काही देणं द्यायचे असते अशी वृत्ती निर्माण होत रहावी असा सदहेतू या प्रथांमागे असावा.

मग अधुनमधून ऐकत रहावेसे वाटणारे खडे मनाचे श्लोक गात येणारे रामदासी असो का अमावस्या मागणा-या गृहिणी असोत वा आषाढातला पोतराज असो व सटीसहामयीचे गोंधळी असो वा हे वासुदेव असो वा अजून कुणी असो.

सणवार, काळवेळ बघून ही माणसं दारी येतात. ढोल, टिमक्या,टाळ, चिपळ्या वाजवत, जमेल तशी काही भजन किर्तनं गावून वातावरण प्रसन्न करतात. परमेश्वराच्या ठाई तुमच्यासाठी आशिर्वाद मागतात आणि मोबदल्यात काही अन्न-वस्त्र-पैशाची आस ठेवतात. देणारेही समजून उमजून देतात. अशा प्रकारे समाजातला एक वंचित वर्ग त्यातल्या त्यात राजस मार्गाने जरा तरी स्थिरावतो आणि एक संस्कार परंपरा प्रवाहित ठेवतो.
निदान मी तरी हल्ली या गोष्टींकडे अशा नजरेने बघू लागले आहे.

No comments:

Post a Comment