भर उन्हाळा म्हटलं की सुट्ट्यांची सोय बघून मुंजी, लग्न, वास्तुशांत, बारशी असे महत्वाचे कौटुंबिक समारंभ अगत्याने उरकले जातात. उन्हाच्या नावाने बोटं मोडत का होत नाही पण बहुतांश जण या कार्यक्रमांना हजेरी लावतातच. तरुण जरा फटकूनच रहातात पण ठराविक वयानंतर मात्र कधीतरीच भेटणाऱ्या गणगोतांच्या ओढीने हे कार्यक्रम न चुकता अटेंड करायची ओढ लागते.
दिवंगत आईवडीलांचे चुलत-मावस बहिणभाऊ,अजून कुणी जुन्या नातेसंबंधाचे नातलग भेटले की छान वाटतं. त्यांच्या सोबत घालवलेला गतकाळ आठवताना ऊर अगदी भरुन येतो. मग गप्पांच्या ओघात ही कुठे, तो कुठे, झालं का तिचं लग्न, झालं का त्यांना मुल अशा खरोखरच्या आत्मीय चौकशा होतात. बरेचदा निगेटिव्ह उत्तर येतं. मनातल्या मनात जरा अरेरे असं होतं. परत हास्य विनोद होतात आणि पॉझिटिव्ह नोटवर निरोप घेतले जातात.
पण परत कधी एकांतात विचार करत बसले की ऐनकेन प्रकरणे सर्वमान्य आयुष्याला मुकलेल्या या व्यक्ती आठवतात. त्यांचा जुना तरुण काळ आठवतो. त्याकाळातला त्यांचा विचार, हट्ट आठवतो, अडचणी आठवतात. बहुतेक कुटुंबियांचा दुटप्पी छुपा विरोध आठवतो.
खरच गरज असते का अशा हटवादीपणाची ?
कुठली तरी आत्या, मावशी, काका, मामा आठवतो. रंगरुपामुळे, आर्थिक अडचणींमुळे, परजातीय प्रेमामुळे वा अजून कुठल्या तरी सामाजिक कारणामुळे, अडचणीमुळे तरुणपणी ठोस निर्णय घेऊ न शकलेल्या या व्यक्ती मनात रेंगाळत रहातात.
आपल्या सुखी संसाराच्या उंबरठ्याबाहेर अवंगुठलेल्या दिसतात.
लग्न होणं, मुल होणं हे काही आयुष्याचं अंतिम ध्येय किंवा सुख नसते तरीपण तनामनानी कुणाचं तरी होणं, सहजीवन अनुभवणं, मातृत्व अनुभवणं, बायोलॉजीकल साखळीतली एक साखळी आपण वाढवणं, आणि मानवी भावनांचा एक उच्चतम अविष्कार अनुभवणं हे फार तृप्त करणारे अनोखे अनुभव असतात.
जन्माला आलेल्या प्रत्येकालाच हे अनुभवण्याचा हक्क आहे. पण आपली सामाजिक चौकट इतकी चिरेबंद असते की वेगळा विचार करणा-याला, आयुष्य जगू पहाणा-याला इथे सहजासहजी मान्यता मिळत नाही. आणि तरुणपणी कुटुंबाची जबाबदारी म्हणून, कमकुवत मन म्हणून, जरा अननुभवी म्हणून माणसं कच खातात आणि आयुष्यभर एकाकीपणे पस्तावतात.
असं माझं मत आहे.
जात-धर्म, शिक्षणाचा-आर्थिकतेचा समान (सर्वमान्य) दर्जा, त्यातली तफावत, त्यातले आग्रह यामुळे किती तरी मुलं-मुली आयुष्यभर बिनलग्नाची रहातात. कालांतराने तर नादच सोडून देतात.
समाजा विरुद्ध जात मनासारखे निर्णय अमलात आणायची क्षमता तरुणपणी कमी असते. आणि जेव्हा समाजाच भय निघून जातं तेव्हा वेळ गेलेली असते.
नुसतं लग्नच नाही तर मुल होऊ न शकणारं दांपत्यही कितीतरी उमेदीची वर्ष मुल होण्याची वाट पहाण्यातच घालवतात. माझ्या पहाण्यातल्या मुल दत्तक घेतलेल्या एकूण एक दांपत्यांनी मुल दत्तक घेण्याचा निर्णय आधीच का नाही घेतला याची चुटपुट मनस्वीपणे व्यक्त केली आहे.
तरुणपणी काही प्रश्न जास्त गहन, प्रखर वाटतात. पण उत्तर आयुष्यात ते प्रश्न खरोखरच मामुली वाटायला लागतात. आणि असतात देखील.
पण या दोन्ही वाटण्यांच्या मधे कितीतरी आयुष्य एकाकी होतात, कोमेजून जातात. हा सर्वकष समाजाचा दोष आहे.
या दोषाचा चटका मात्र हे एकाकी जीवच सोसतात.
इतर गोष्टींमधे मन रमवत, मन मारत आपण आनंदाने जगतो. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर एक आंतरीक पोकळी निर्माण होते आणि तरुणपणी नको त्या प्रश्नांचा आपण बाऊ केला आणि आयुष्यातल्या एका अनमोल आणि नैसर्गिक आनंदाला मुकलो याची बोच लागल्या वाचून रहात नाही.
पुरुष तसेही फार गुंतणारे नसतात.
त्यांना पोटापाण्यासाठी बाहेरही पडावेच लागते.
बाहेर पडल्यामुळे आणि पुरुष प्रधान संस्कृतीमुळे पुरुषांच काही काळ तरी मन रमतं आणि निभतही.
पण स्त्रियांना मात्र फार कठीण जातो हा काळ. एका ठरावीक वयानंतर सहजीवनाच्या ओढीने, मातृत्वाच्या आसेने काळीज कुरतडले गेले तरी कुठेही बोलायची सोय नसते. ना ही कुणा स्वकीयाला ऐकून घ्यायच भान असतं. एक साधी नैसर्गिक ओढ पण या व्यक्ती त्यापासूनही आयुष्यभर वंचित रहातात. महिलांना तर सतत दुहेरी अग्निपरीक्षा द्यावी लागते.
एक तर चांगलं- वाईट मुकाट्याने सोसायच. ब्र म्हणून काढायचा नाही. आणि केलीच कुणी हिंमत तर तिच्यावरच शिंतोडे उडवायला समाज तयार असतो.
मान्य आहे लग्न होणं, मुलं होणं म्हणजे काही गुलाब पाकळ्यांवर चालणं नाहीये पण हे शहाणपण ज्याला त्याला अनुभवान्ती येऊ देत ना. आपण ऊन-सावलीचा खेळ करताना एखादा वेगळा विचार करणा-याला कायमच उन्हात ठेवणं योग्य आहे का ? म्हणजे एक तर आमचं ऐक नाही तर हद्दपार हो म्हणण्यासारखच आहे की हे.
तरुणपणातले काही सनातन, गहन प्रश्न उत्तरआयुष्यात फारच बोथट आणि कुचकामे वाटतात.
पण आपण उगाचच त्याचा बाऊ करुन मनाजोगं नाही जगू शकलो अशी कायमची टोचणी मात्र यशस्वीपणे लावतात.
साधक बाधक विचार करुन आपण घेत असलेल्या निर्णयाची जबाबदारी जर प्रत्येक जण घेत असेल, आणि एक मोकळं, खुलं वातावरण जर समाजात, कुटुंबात मिळणार असेल तर मळलेली वहिवाट न चालणा-यांना कायमच आयुष्याशी समझौता करुन रहाण्याची वेळ येणार नाही.
No comments:
Post a Comment