Monday, 21 May 2018

औरंगाबाद ऑटो फेस्ट. 2018

चिरंजीवांनी मित्रांच्या सहकार्याने काल हिरण्यवर एकदिवसीय औरंगाबाद ऑटो फेस्ट ऑरगनाईज केला होता. कन्हाय माझा मुलगा स्वतः चांगला बाईकर आहे. आणि बाईकिंग क्षेत्रात काहीतरी करायची त्याची सतत धडपड सुरु असते.
हिरण्यच्या खालच्या मोठ्या आणि मोकळ्या मैदानावर सगळा कार्यक्रम होता. संभाव्य ग्राहक असलेले विशीच्या आतले उत्सुक बघे कॉलेजकुमार तर खुप असतात.
या तरुणांना सुपर बाईक्स, ताकदवान बाईक्सचं फार अप्रुप असतं. पण अजून वय लहान असतं त्यामुळे पालक शक्यतो या मुलांना कुटुंबवत्सल, मल्टीयुटिलीटीवाली कायनेटीकच दामटुन हातात देतात. पण यांच्या मनात मात्र बाईकच कायम फुरफुरत असते.
तर फेस्ट संपल्यानंतर रेंगाळणारे असे बरेच युवक वर रेस्टॉरंटमध्ये डोकावले. आणि काळवेळ बघत जेवायची ऑर्डर देऊन फेस्टमधल्या बाईक्सवर, बाईकर्सनी केलेल्या थरारक स्टंटसवर हिरीरीने स्वप्नाळू चर्चा करत बसले. मी एकटीच तिथे एका अंधा-या कोप-यात बसले होते.
नऊ वाजत आलेले..चर्चा रंगात आलेली..
तेवढ्यात एकाचा फोन वाजला..
हो गं..अजून तिथेच आहे. आत्ता तर शो संपलाय. आता बसलोत आम्ही गप्पा मारत. काय..जेवण ? अगं आम्ही इथेच जेवतोय. मित्र आहेत बरोबर.
काय..करुन ठेवलाय स्वैपाक. आता उद्या खातो ते जेवण. (या विषयावरची पुढील संभाव्य डायलॉगबाजी ज्याची त्यानी समजून घ्यावी. मी लिहित नाही. ते काये..घरोघर मातीच्याच चुली असतात नाही का?)
घड्याळ बघून कुणाचा फोन आला असेल याचा अंदाज बांधून बाकीचे मित्र फिदीफिदी हसताहेत. आणि हा मित्र कसा आता (नेहमीप्रमाणे) उद्या शिळा फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी खाणार आहे हे समजून खुदुखुदु हसत त्याची सामुहिक टर उडवताहेत.
काय..मित्रालाही जेवायला आणू ? अगं आई एकजण थोडीच आहे. साताठजणं आहेत. हो..हो..लवकरच निघतो. जेवण ऑर्डरच केलय. हो..खातो उद्या.
निघतो अर्ध्या तासात. हो..सावकाश येतो. फास्ट नाही चालवत आई. हो..निघायच्या आधी फोन करतो..
हो..डायरेक्ट घरीच येतो..हो..हो...हो...ठेवतो.
पुन्हा एकदा त्या लेकराला टारगेट करत सगळ्यांनी फिदीफिदी हसत चिडवलं.
चर्चा परत रंगली. परत एकाचा फोन वाजला.
अगं हो आई अजून हिरण्यलाच आहे..इथेच जेवण करतोय. ऑर्डर केलय. येतो अर्ध्या पाऊण तासात. हो..हो...होगं.
परत पाच मिनिटं होत नाही की अजून एकाचा फोन वाजला.
परत सगळं ओळखून सगळे खुसखुसले.
फोनवाल्याने खुण करुन चुप बसायला सांगितलं.
हां..मम्मी..हां हो गया शो. बस निकल ही रहे है खाना खाके. हां मम्मी हेल्मेट पहनुंगा और धीरेसे आऊंगा..हां मम्मी आप चिंता मत करो. सब साथ मे है. हां..हां...
मला गंमत वाटली. त्रयस्थपणे आपला रोल, घराघरातल्या मातांचा दृष्टिकोन तरुणांमधे कसा रिसिव्ह केला जातो हे बघून मलाही खुदकन हसू आलं. खरंतर बाईकर मुलाची आई म्हणून मी यापेक्षाही जास्त चिंतेतून गेले आहे. पालक म्हणून आपली चिंता अनाठायी नसतेच. तरीपण सगळ्याच गोष्टींकडे बेफिकिरीने बघण्याची ही तरुणवृत्ती मन को छू गई और दिल को हल्का कर गई.

No comments:

Post a Comment