Wednesday, 23 May 2018

आमच्या शहरातल्या एका जुन्या नामांकित दर्ग्याजवळचं जुनंपुराणं विस्तीर्ण चिंचेच झाडं रस्तारुंदीकरणानंतरही मधे येत होतं, अपघाताला निमंत्रण देत होतं म्हणून एवढ्यातच तोडलं.
भलथोरलं झाड, जमीनदोस्त करायला नक्कीच दोनदिवस लागले असणार. साहजिकच येणा-या जाणा-यांपैकी अनेकांचा जीव हळहळला असेल.
झाडं तोडताना माझाही जीव हळहळतो.
पण हल्ली जो उठतो तो पर्यावरणवादी बनतो. आणि सगळ्या कलंकित,दुषीत पर्यावरणावर झाडं लावणं, झाडं जगवणं आणि झाडं न तोडणं हाच एकला उपाय मानतो. सोशल मिडियाचही हत्यार हातात असतच. लगेच हळहळणारी बातमी होते. वा-यासारखी पसरते. कंमेंट्सचा पाऊस पडतो. झाडं पाडणा-याला जाब विचारले जातात. खरमरीत वक्तव्य होतात. पाडलेल्या झाडाबद्दल हळहळ व्यक्त होते. झाडं पाडणा-या अविचारी यंत्रणेबद्दल बोटं मोडली जातात. मागचा पुढचा विचार न करता उगाचच धुराळा उडतो.
आता हे झाड रस्त्याच्या इतकं मधे होतं की ते नष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता.

शंभरीपेक्षा जूना गावाबाहेरचा दर्गा, त्याच्या इमारतीचा काही भाग, त्यापासची झाडं आता वाढलेल्या शहराला त्रासदायक होणारच होती. धार्मिक संवेदनशीलतेमुळे इमारतीचा काही भाग वाचवला पण अपघाताला कारण होणारं झाड तोडण्यावाचून पर्यायच नव्हता.
भरवस्तीतल्या झाडासाठी रस्ता बदलणं, वस्ती उठवणं किती संयुक्तिक आहे ?

गावोगावी हिच कथा आहे. ऐसपैस वाढणारी शहरं, जुने अरुंद रस्ते रुंद करताना वृक्षकटाई बहुतांश वेळा अपरिहार्य असते. मग तुटल्या जाणा-या प्रत्येकच झाडासाठी झगडण्यापेक्षा सारासार विचार करुन अजून दुपटीने झाडं लावणं, त्याची निगा घेणं हे जास्त संयुक्तिक आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी एक सिस्टीम वापरात आली पाहिजे.

आमच्या चारशे वर्षापूर्वीच्या बावन दरवाजे आणि बावनपु-यांच्या शहरात तर एक वेगळच त्रांगड आहे. जूनी ऐतिहासिक बांधकामं, अरुंद रस्ते, आपलेपणातनं पाडलेला चतुरस्त्र अतिक्रमणांचा विळखा आणि अफाट वाढणा-या शहराचा सर्वांगीण ताण..
काळाच्या प्रवाहात वाचलेली ही थोडीफार मॉन्युमेंटस्ही वाचवणं फारच जोखीमीचं काम आहे.
घरात बसून वाटतही कि हा ठेवा जपायला हवा( आणि ठेवायलाच हवा) पण जेव्हा जागेवरची परिस्थिती आपण पहातो तेव्हा हे काम किती कठीण आहे याचा अंदाज होतो.
मॉन्युमेंटस् जुनी पाडली तर नवीन बांधू असं होत नाही पण सर्वसामान्य झाडांसाठी मात्र एकास दोन अशी वृक्ष लागवड हा उत्तम पर्याय आहे.
अर्थातच सरसकट धोपट मार्ग अवलंबणही योग्य नाही. पण सारासार विचार करुन जर कृती केली गेली तर त्याचा उगाचच उहापोह करण्यात अर्थ नाही.
म्हणजे आधी शहराच्या सुयोग्य विस्तारीकरणासाठी धरणं धरा आणि नंतर या पर्यावरणवाद्यांना तोंड द्या.
तेही हरकत नाही. विचारांची देवाण व्हायलाच हवी. सर्वकष विचार करुनच कृती व्हायला पाहिजे.
पण सर्वसामान्यांच हे सोशलमिडियावरच उतावळेपण खटकतच.
या दिर्घायुषी चिंचेच्या झाडाबाबतीत हेच झालं म्हणून हा शब्दप्रपंच.

#लहानपणी या गावाबाहेरच्या भागात आम्ही शाळेच्या ट्रिपबरोबर यायचो. चिंचेच्या झाडांसाठी हा परिसर प्रसिद्ध होता. अजूनही ब-यापैकी झाडी आहे इथे.

No comments:

Post a Comment