बायका.
खेडोपाडीच्या बायका,
शहरातल्या कष्टकरी बायका,
घरातलं आवरतात, डबा बांधून घेतात, एखादी अनुभवी स्त्री सोबत घेतात. नाईलाजाने एखादं लेकरु बखोटीला मारतात..आणि सकाळीच महिला स्त्रीरोग तज्ञाच्या दवाखान्यात येऊन बसतात.
एकेक बाई एखाद्या बेटासारखी शांत आणि स्थिर वाटणारी.
मैडमची वाट पहात बसलेली.
लाल, हिरवी, पिवळी साडी. गळ्यात चार पिवळ्या मण्यांच गंठण. कानात खुडकं, हातात डझनांनी बिल्वरं, चंदेरी ठसठशीत जोडवी, मस्त ऐसपैस गळ्याच ब्लाऊज. त्यातून चमकणारी शिशवी गुळगुळीत पाठ.
एखाद दुसरीच्या हाताला मेंदी, भांगात सिंदूर, नखरेबाज नथनी.
कोणकुठुन आलेल्या महिला.
कुणाचे काय प्रश्न तर कुणाच काय ?
एकीचा जीवकाढू तिसरा महिना तर एकीचा टपोरलेला सातवा तर एकीचं अवघडलेलं बाळांतपण अगदी काठावर आलेलं.
एकीला दिवस जात नाहीत म्हणून, तर एकीला नको असताना गेले म्हणून तर एकीची पाळी नियमित नाही म्हणून.
एकीला पहिल्याच बाळाची उत्सुकता तर एकीला इजा-बीजा-तीजा पोरीचा धाक.
मातृत्वाचे सप्तसूरच जणू.
वानगी दाखल दोनचार तरुण नवविवाहित पुरुष ऑकवर्ड होऊन बसलेले.
शेजारी निशब्द अबोध सहचरणी.. जेमतेम षोडशा..
लालजर्द सिंदूर, भरगच्च हिरवा चुडा, फिकटलेली मेंदी..
हरवलेले डोळे, नव्हाळलेली कांती आणि पोटात चाहूल.
सासरचं गाव परकं, सासर अनोळखी, साथीदारही नवखाच, वैवाहिक अनुभवही नवथरच आणि
उदरात वाढणारा जीव मात्र साताजन्माची ओळख असल्यासारखा हक्कानी रुजलेला.
बारागावच्या बारा महिला, तरी एका समान धाग्याने गुंफलेल्या. खरच मातृत्वाचा धागाच चिवट आणि चिरंतर.
No comments:
Post a Comment