सध्या सोशल मिडियावर पाककलेतील संबंधीत वाळवणाच्या पोस्टस् दुथडी भरुन वहाताहेत.
पुर्वीचा तुडुंब पावसाळा, दळणवळणाची साधनं नसणं आणि त्यामुळे येणा-या भाजीपाल्याच्या तुटवड्याला आणि अचानक आलेल्या पाहुणचा-याच्या संकटाला सकस आणि समृद्ध तोंड द्यायची उत्तम पध्दत म्हणजे उन्हाळ्यातली ही वाळवणं. पापड, पापड्या, कुरुड्या, खारोड्या, किस, विविध भाज्यांचे सांडगे, शेवया असे एक ना अनेक प्रकार ऊन्हाळ्यात घरोघर केले जातात. तर हे झालं वाळवणांविषयी.
पण या कहरी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच फळांचीही भरपूर रेलचेल सुरु होते.
हल्ली तर कुठलही शहर घ्या, गावं घ्या, खेड्याचं बस स्टैंड घ्या, कोप-याकोप-यातली दुकानं फळांनी अगदी ओसंडत असतात. हल्लीचे तुडुंब फळ बाजार पाहिले की मला सत्तरच दशक फार आठवत.
पुर्वी फळांची एवढी रेलचेल मुळीच नसायची.
तीही बारमाही ? अशक्यच.
सर्वसामान्यपणे खरी रेलचेल फक्त केळ्यांचीच असायची. डाळिंब, सफरचंद आणि द्राक्ष तर श्रीमंतांचीच मक्तेदारी वाटायची. पपया तर कधी यायच्या आणि नाहिशा व्हायच्या कळायचही नाही. आंबा मात्र मुबलकतेमुळे घराघरात पोहोंचायचाच. तेव्हाचे फळांचे ठेले सुध्दा केळी,चिकु,पेरु, पपया अशा दोन- तीन प्रकारच्या फळांनीच साधारण भरलेले असायचे.
एकदा माझ्या आईचे वडील हैद्राबादहून आमच्याकडे आले. येताना त्यांनी अक्षरशः एक मोठी दुरडी बास्केट भरुन हिरवे-काळे अंगूर आणले होते. ती अंगूरांनी ओसंडणारी बास्केट बघून तर मला सिंदबादची सफरच आठवली होती. अजूनही ती झाकणवाली दुरडी माझ्या नजरे समोर आहे. नंतर ती बास्केट आम्ही कांदे बटाटे ठेवायला वापरली. तसच एकदा माझ्या मुंबईच्या मावशीने मुंबईहून येताना त्या टिपिकल चॉकलेटी काश्मिरी सुबक बास्केट मधून खूप लिची आणल्या होत्या आपल्या मराठवाडी भाचरांसाठी.
तेंव्हाच आयुष्यात पहिल्यांदा लिची पाहिली आणि खाल्ली पण.
सफरचंद आणि डाळिंबांना तर हात लावायचीही भीती वाटावी इतकी ती फळं उच्चभ्रुततेशी निगडीत होती.
बरं मोसमी फळं सुध्दा जेमतेम काही दिवसच बाजारात दिसायची. नंतर ती जी गायब व्हायची ती पुढच्याच वर्षी दिसायची.
हल्ली आता जवळपास सगळी फळं वर्षभर मिळतात. चवीचा फरक पडतो पण फळ मिळतं. यामधे मुस्लीम समाजाचही कॉन्ट्रिब्युशन खूप आहे. पुर्वी रमजान ईदी कधी होऊन जायच्या कळायच्या देखील नाही.
आणि आता तर गैर मुस्लीम सुध्दा रमजानच्या फळ बाजारावर बारीक नजर ठेवून असतो.
सफरचंदांच तर इतकं उदंड पीक झालयं की दवाखान्यातले पेशंट्स सुध्दा भेट नको पण ती सफरचंदं आवरा म्हणायला लागली आहेत.
तसच ते शहाळ्यांच पण बरं. आमच्या एका परिचितांनी आपल्या बायकोला आवडतात म्हणून दोन गोण्या शहाळी मुंबईहून टैक्सीने गावी आणली होती.
आम्हा बालकांना जसं नारळाचं झाड म्हणजे समुद्र तसंच शहाळं म्हटलं की मुंबईच आठवायची. आणि मुंबईला गेलं की शहाळ्यातलं पाणी आणि मलईचं फार आकर्षण असायचं. त्यामुळे त्याकाळी ते काका म्हणजे लईच भारी आणि रईस वाटले होते.
आता काळ सगळ्याच अर्थाने फार बदलला आहे. जाणवेल अशी सर्वसाधारण सुबत्ता चहूकडे दिसते आहे.
नाक्या नाक्यावरची फळांची दुकानं याची साक्ष आहेत. अगदी प्रसादासारखी थोडीफार केळी ठेवत बाकीचं दुकान स्थानिक, परराज्यीय, परदेशी फळफळावळांनी अक्षरशः ओसंडून वहात असतं. दोनचार फळांचे अपवाद सोडता सगळी फळं वर्षभर कमी जास्त किमतीत पण हमखास मिळतातच.
फळांची बेणंही इतकी विविध असतात की फळं विकत घेणा-याच्याही ज्ञानात भारीच भरच पडते.सिंगापूरी शहाळी, कर्नाटकी टरबूजं, तैवानी पपया, दुनियेभरची सफरचंद, हिमाचली लिची..वगैरे..वगैरे.
मार्च महिना सुरु झालाय. ऊन तापतंय तशी फळांमधली गोडी वाढत चालली आहे. रमजानही उंबरठ्यातच आहे.
द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, संत्री, अंजीर, चिकू, केळी, अननस, आलूबुखार, टरबूज, खरबूज, पपया, फणस, खारका, पेयर, लिची, नासपती, पीच आणि ब-याच परदेशी फळांनी आठवडी बाजार आणि शहरी ठेले ओसंडून वहाताहेत. त्यातही खूप वैविध्य आहे.
मध्यंतरी मी राजस्थानी आलूबुखार दौलताबादच्या रस्त्यावर घेतले. चारशे रुपये किलो. पण चव म्हणाल तर खरच अप्रतिम. पुन्हा असे आलूबुखार नाहीच मिळाले.
कुठलाही टुरिस्ट रस्ता - डेस्टिनेशन घ्या नुसत्या फळांवर सुध्दा आपण जगू शकू इतकी फळांची रेलचेल हल्ली महाराष्ट्रात तरी असते. जाता जाता कुठेही गाडी थांबवा आणि रसदार फळं घ्या. कुणाच्या घरी जाताना तर मिठायांपेक्षा ही फळं कधीही उत्तमच.
मागे बारा वर्षांपूर्वी राजस्थानात फिरायला गेलो होतो तर सकाळचं जेवणं फक्त फळांचच करायच ठरवून गेलो होतो. पण कसचं काय त्या कुंभलगड-चितोडगड परिसरात काही फळं मिळेनात. सकाळ झाली की पहावं तिकडे कचो-या, बेसन-डिंकाचे लाडू. वैतागलोच होतो.
पण तरी चित्र बदललंय. समाजातही फळांच कंझ्म्पशन खूप वाढलयं. शहराच्या मेन मंडईत कधी पहाटेसच जाऊन बघा ट्रक्स भरभरुन रंगबिरंगी, विविध सुवासी, चवीची फळफळावळ दाखल होत असते.
तुटक्या, फुटक्या, थोड्या पिचक्या फळांचा सुध्दा लिलाव होतो, आणि वेस्ट फळं खाऊन सुध्दा काही कुटुंब पोसली जातात.
बाहेरच्या काहिलीतून घरात आल्यावर फ्रिजमधली गारीगार, रसदार फळं खाण्यासारखं सूख नाही.
तसच पहाटेच्या माफक गारव्यात मंडईतून गाडी भरभरुन तरत-हेची फळफळावळ आपल्या जिवलगांसाठी घरात आणून टाकण्यासारखं कर्तृत्व नाही.😀
No comments:
Post a Comment