जुन्या पुराण्या आपल्याच गावातला जूनाट भाग. जुनी दुकानं, जूनेच व्यवहार..नाही म्हणायला बापाची गादी चालवत पोक्तपणाकडे ढळलेले एकेकाळचे तळपते तरुण आता विक्रेते म्हणून.
तोच तो बाजाराचा भुलभुलैया.
उभ्या-आडव्या छेदाचे रस्ते, गल्ल्या. व्यवसायाची ओळखं म्हणून नावरुप ल्यालेल्या.
आपल्याला आता हा जूनाट बाजार अस्ताव्यस्त वाटणारा तरी तो आतून सुव्यवस्थेने चाललेला.
तेंव्हाचे भरजरी रस्ते आज सस्ते का माल विकताहेत.
कपडे बाजारातली चमक आता बेगडी वाटते आहे आणि फुल बाजारातला ओलसर सुगंध आता दर्प वाटू लागलाय. बिकानेरी मेंदी,लखनवी इत्तर आता हिरव्या धर्माच्या बासनात गेलय. हातभर, वितभर कापडाचे हिशेब आता फक्त वाकप्रचारातच राहिलेत.
गादीघर, स्टोव्हच्या पिना,कंदिलाच्या काचा-वाती यांच्याशी कधीच घटस्फोट झालाय. काळाशी इमान राखत घड्याळं मात्र इमानेइतबारे अजूनही चालताहेत.
याच गल्ल्यांमधे आईवडीलांची आठवण काढणारे विक्रेते अजूनही ओळख ठेवून आहेत.
शेव,फाफडे,इम्रतीचे तेलकट,गोडसर दरवळ आता नॉशियाटिक वाटू लागलेत.
ओहो..हे पहा इथेच मी पहिलं नेलपेंट आणि लिपग्लॉस रुबाबात विकत घेतलं होतं. आणि ते पहा समोरचं दुकान जिथे सॅनीटरी पैडस आणि ऍन फ्रेंच मागताना आम्ही भगनी बावरलो होतो.
याप्रशस्त लौकिकी दुकानाने कीती विद्यार्थ्यांना
नव्याको-या वह्या-पुस्तकांच्या वासाने वेडंपिसं केलं असेल याची गणतीच नसेल.
याच चौकात स्वप्नांच्या दुनियेत नेणारे चांदोबा आणि लॉटरीची तिकीटं विकत घ्यायचो आम्ही.
व्यवहार तोच आहे, विक्रीचा मालही उन्नीस-बीस तोच आहे. छनछन गल्ल्याच्या खुर्चीवर तीच व्यापारी कुटुंब आहेत. म्हणजे पाटही तोच ताटही तेच फक्त
जेवणा-याची चव बदलली तसे जेवणारेही बदलले.
या ऑन लाईनच्या जमान्यात काय काय ऑफ लाईन होईल आणि आयुष्यातले कीती माणसं, त्यांचे आवाज, लकबी, दुकानांची सजावट, फळकूटं, वास, एका अख्ख्या गावाची धडधडणारी स्पंदनं नामषेश होतील याचाही एकदा हिशोब लावला पाहिजे.
त्या रंजक चांदोबातली आटपाट नगरी कधीच मागे पडली पण आठवणींचा वेताळ अजून मानेवरच आहे बघा.
No comments:
Post a Comment