Wednesday, 7 February 2018

Rose Day.

आज रोज डे आहे म्हणे.
सोशल मिडियामुळे जो सांस्कृतिक बदल होतो त्यातला हा एक बदल. रोज कुठलान कुठला डे असतोच. जागतिक स्तरावर तो कसा व का साजरा केला जातो त्याची भरपूर माहिती शुभेच्छा आणि पोष्टींनी कळते.
भारतात सहसा फेब्रुवारीच्या मध्यावर ठिकठिकाणी फ्लॉवर शोज आयोजित केले जातात ते माहीत होतं पण गुलछबू गुलाबाचा दिवस आज आहे हे आयुष्यात  पहिल्यांदा आजच कळलं.

तसं बघायला गेलं तर गुलाबाची पहिली ओळख शाळेतली. दचकू नका पुढे वाचा.
मी बहुदा आठवीत होते. शाळा-घर-शाळा एवढंच सिमित आयुष्य होतं. तर एका सोमवारी शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात आणि आसपास खूपसारी
त-हेत-हेची फुलं मांडलेली दिसली. बहुदा आदल्या दिवशी पुष्प प्रदर्शन झालं असावं तिथे. सकाळची शाळा त्यामुळे सकाळी फुलं बघता नाही आली. मग जेवणाच्या सुट्टीत माझी एक मैत्रीण आणि मी रेंगाळत फुलं बघायला गेलो. चार पिरियडस् नंतरची सुट्टी म्हणजे सकाळचे साडे नऊची वेळ असावी. फुलं उचलून प्रदर्शन आटोपायला त्या विभागाची ऑफिसची माणसं आलेली. आम्ही आपलं हे फुल छान, ते मस्त, त्याचा रंग, ह्याच्या पाकळ्या असं करत डिस्प्ले बघत रेंगाळत होतो. कुठून कोण जाणे एक खाकी ड्रेसमधला कर्मचारी अचानक पुढ्यात आला आणि एक गुलाबाचं फुल मला आदबशीरपणे for you म्हणत द्यायला लागला. आम्ही दोघीही जाम घाबरून गेलो. गुलाब फुल देण्या-घेण्याची चिरतरुण महत्ता कळायचं वय नव्हतं तरी ते अगोचरपणे धिटाईने पुढे केलेलं फुल झिडकारावं एवढं आम्हाला कळलं आणि तसं ते फुल झिडकारून आम्ही वर्गात धूम पळालो. नंतर कीती तरी दिवस मलाच कानकोंड होत राहिलं. या वयात कीतीतरी मुली अशा कानकोंड्या, घुसमटून टाकणा-या अनुभवातून अनेक कारणांनी जात असतील नाही ?
म्हणजे अगदी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही सारखी परिस्थितीच म्हणाना.

आयुष्यातलं पहिलं गुलाब फुल दिलं गेलं ते असं आणि अश्या व्यक्ती कडून.
दुनियाभरचे कवीराज भले कितीही प्रियतमेला फुल, कली म्हणत आणि प्रियकराला माली, भंवर म्हणत काव्यरचना करु देत, अबोध वयातल्या या अशा आठवणी म्हणजे सदाबहार गुलाबाचे काटेच नाही का ?
कायम मनात रुतणारे. म्हणूनच मी नेहमी म्हणते मुलींच तरुण होणं, वयात येणं तिच्या आधी जगाला कळतं म्हणून.

No comments:

Post a Comment