हल्ली या सोशल मिडियामुळे जग इतकं जवळ आलं आहे की त्या गदारोळात जवळचेच हरवून जातात की काय अशी भिती वाटायला लागली आहे.
आधी मोबाईल फोन ने क्रांती घडवली आणि आता व्हॉट्सऍप, स्नैप चैट,व्हिडीओ कॉलींगने तर प्रत्येकाच्या जगण्यावर, उठण्या, बसण्यावर, झोपण्यावर..एकूणच मॉडेस्ट प्रायव्हसीवर फार अतिक्रमण केलय.
बरं कुणाशी बोलावं तर सगळेच एका माळेचे मणी. आपणच खड्यासारखे वेगळे पडतो.
हातात एक संवादाचं-बोलण्याचं साधन आहे म्हणून किती ते अतिक्रमण करायचं एखाद्याच्या आयुष्यात यालाही काही लिमिट पाहिजे ना ?
अधिकाराने, आदराने, ममत्वाने, काळजीने किती एकमेकांच्या आयुष्यात भोचकपणे चौकशीरुपी दखल द्यायची यालाही काही सीमा असते हेच लोकं विसरुन गेलेत.
तरुण लोक तर इतके एकमेकांच्या, मित्र परिवाराच्या या अशा गैजेट ओरियंटेड संपर्कात असतात ना की विचारायची सोय नाही. तरुणांमधे काय आणि किती शेयरींग केलं जातं आणि त्याची सायकॉलॉजी काय हा एक चिंतनीय आणि चिंताजनक विषय आहे.
ऑफिसला गेलेल्या पुरुषांना त्यांच्या बायका आणि बाहेर पडलेल्या बायकांना त्यांची मुलं इतके सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी, कामांसाठी फोन करतात की एखादं काम आठवणीत ठेवून करणे ही स्मरण शक्ती वाढवणारी पध्दतच आता संपुष्टात येते की काय असं वाटण्यासारखी अलार्मिंग परिस्थिती नक्कीच आली आहे. स्वैपाकवाल्या मावशींकडनं रोजच्या पोळ्या सुध्दा किती करुन घ्यायच्या हे आईला विचारायला मुलं दोन तिनदा फोन करतात. सामान्य स्मरणशक्तीच आता विस्मरणात जाईलस वाटतंय.
यामुळे स्वकेंद्रितपणा इतका वाढतो की घरात आईला-बायकोला सकाळपासून बरं नाहीये हे सांगितल्याशिवाय कळत नाही पण मैत्रीणीची कालची खरेदी किंवा मित्राची बॉसबरोबरची मिटिंग कशी फसली हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट असतो बहुतांश पब्लिकला.
तसच ते शिक्षणासाठी-नौकरीसाठी दुरावलेल्या मुलांशी रोज काय बरं बोलायचं असतं पालकांना ?
विशिष्ट कारणांसाठी काहीकाळ रोज बोलणं समजू शकतं. हजार मैलावर रहाणारा आपला मुलगा-मुलगी अमूक वेळेला आपल्याला रोज फोन करणार म्हणजे करणारच याचा कोण अभिमान असतो पालकांना! लग्नानंतरही आईवडीलांशी रोजच फोनवरनं काहीतरी बोलणारी मुलं म्हणजे आदर्श मुलं वाटतात हल्ली सगळ्यांना.
तसच त्या नवविवाहित सुना देखील नविन संसार,
जोडीदाराचं सानिध्य, नोकरी, थोडीफार घरगृहस्थीची कसरत करत रतीबासारखं सासू-सास-यांशी जुजबी का होत नाही पण दोन वाक्य रोज बोलणार म्हणजे बोलणारच. म्हणजे पुर्वी एकत्र कुटुंब व्यवस्थेत सुनबाईच्या हातचाच चहा रोज घेण्यासारखंच स्टेटस् या डिस्टन्स कॉल्सला आलंय. And it is supposed to be the ideal showcase of your tunning.
कुटुंबात संवाद-वाद जरुर असावा. नवीन नात्यातही संवाद जर मोकळेपणाने होत असेल तर दुधात साखरच. पण रतीबाने रोज फोन करणा-या सुनेने काही कारणाने दोन दिवस आमच्या आईंना-मम्मींना फोन नाही केला तर आईमम्मीला लगेच अस्थिर वाटायचं काय कारण ?
पण हल्ली हे जरा असंच होतयं. कुठलीही गोष्ट अनैसर्गिकपणे राबवली आणि ती मधेच खंडीत झाली की चुकलाच काळजाचा ठोका.
जशी नात्यातही सहजता असावी तशी सहजता संवादात, वागणुकीतही आली म्हणजे कुठल्याही काचेकोर नियमांशिवाय दृढ विश्वासाचं नातं तयार होतं.
फार ढुढाचार्यासारखं बोलते-लिहिते आहे का मी ?
मला अजून सून-जावाई येणं दुर आहे पण मुलं मला-आम्हाला सोडून नेहमीच दुर रहातात.
दुर असलेल्या मुलांशी काळजीपोटी, कारणानुसार अधून मधून बोलतो आम्ही पण एकमेकांच्या दैनंदिन तासिक घडामोडी नियमित शेयर करण्यासारखं खरच काही नसतं हो.
माझे वडीलही याच विचाराचे होते. ते एकाकीपणातून मला रोज फोन करायचे पण मीच जर स्वतःहून कधी सातत्याने फोन केले तर म्हणायचे..काही प्रॉब्लेम आहे तुला? रोज फोन करतेस ते म्हणून.
या सगळ्या अतिरेकातली वाईट्ट गोष्ट कुठली असेल तर एकमेकांना भेटण्याची उत्सुकुताच संपून जाणं. उत्सुकता संपली की आयुष्य फार निरस होत जातं.
No comments:
Post a Comment