Tuesday, 6 February 2018

इक हसी शाम को...

छोट्या व फुटकळ आजारपणात अगदी चार दिवस जरी घर घर करून राहील्यानंतर सुहाने मौसम मे बाहेर पडलं की फार बरं वाटतं. सगळ्याच बाजूने हलकं फुलकं वातावरण असेल तर विचारायलाच नको.मन आणि शरीर अगदी फुलपाखरू होतं.

थंडी पळालेली.
Much..Much..Much awaited योगासनांचा क्लास सोमवारपासून लावलेला. ब-या पैकी अंग लवतय त्याची खुशी. सध्या दोघंच घरी त्यामुळे स्वैपाकाचा जो काही ताण असतो, घेतल्या जातो तो ही नाही. झकास स्कुटर काढली. नाकात, कानात, केसात वारं भिरभिरवत आमच्या जून्या पुराण्या गावात फिरले. छोट्या गल्ल्यांमधून फिरवायला स्कुटरसारखं सुखी वाहन नाही.

नकटीच्या लग्नाला विघ्नच फार सारखं ते नाकाच्या मनासारख्या मोरणीचं बरेच दिवसापासून काही जमेचना. नाक टोचून दिडेक वर्ष झालय पण काहीना काही फुस्कट निघतय आणि नाहीच मिळत आहे मनासारखी मोरणी. जाऊ त्या गावातनं,खेड्यातनं मोरण्या आणून झाल्या पण त्या साताठ पैकी एकीचही टिपणं मनाजोगं अजून तरी जमलंच नव्हतं ते आज एकदाच जमलं.
हुश्य!
मस्तपैकी पांढ-या खड्यांची ठसठशीत मोरणी नाकावर नांदती झाली एकदाची.चला आता त्या तेजस्वी, शालीन आणि लोभस एस.सुब्बालक्ष्मीसारखं थोडंतरी दिसायचा मार्ग मोकळा झाला आपला.
Yess..She is my idol in this nose peircing project. मी तर दक्षिण भारतीय स्त्रियांसारखं दोन्ही बाजूंनी नाक टोचून घेणार होते पण सुज्ञ घरातल्यांनी,
मुलीने आणि मैत्रीणींनी वेळीच आवरलं. असो.
मोगैम्बो आज खुश हुवा.

गावातलं जूनं नामांकित हलवायाचं दुकान. थांबून शेवेचे प्रकार घेतले. एक नवीन प्रकार दिसला म्हणून चौकशी केली तर 'खुरमी' म्हणून लहानचणीची चांगल्या तुपातली बालूशाही आहे म्हणे. चाखली तर मस्तच खुसखुशीत प्रकार होता. युं जिभेवर विरघळला.
आपल्या आईवडिलांनी ज्या दुकानातून चारदा पैशाचा विचार करत, दोनदा पोटाला चिमटे घेत आपल्याला मिठाया खाऊ घातल्या त्या दुकानात खरेदी करताना एक ह्रद्य नॉस्टेलजीयाच अनुभवायला मिळतो.
तेलकट, मेंचट, थुलथुलीत हलवाई जिलब्या व राज्यातल्या सुप्रसिद्ध नारिंगी इम्रत्या अत्यंत सटीकपणे पाडत होते. पण ब-या पैकी उघडेवागडे बसलेल्या हलवायांना ऑकवर्ड वाटेल म्हणून फोटो काढायचं सुज्ञपणे टाळलं.

परतताना एकदोन परराज्यीय प्रदर्शनं पाहिली.
तिथेच एक शालेय मैत्रीण (त्याकाळचीdie hard Rajesh khanna fan)भेटली. म्हणजे मीच ओळखलं तिला. जुजबी गप्पा मारल्या. तिच्या भावंडांच्या,मावश्या,मामा,आई-वडिलांच्या चौकशा केल्या तर सगळे जणं औरंगाबादलाच आहेत हे कळलं. आयुष्यभर एकाच गावात रहाणारे आणि पोटापाण्यासाठी दुस-या गावात, देशात रहाणारे यांच्या बालपणीच्या, तरुणपणीच्या
गावाविषयीच्या नॉस्टेलजीयाविषयी मला अपार उत्सुकता आहे.
व्यक्तीशः मी औरंगाबादला रहाणं, जूने इलाखे नवीन नजरेनी पहाणं,अनुभवणं, मग बालपणीच्या आठवणी आणि आत्ताचं वाटणं या अशा गोष्टीत फार रमते. इतकी डिपली कनेक्टेड मी दुस-या गावाशी होऊ शकले असते का असाही प्रश्न मला बरेचदा पडतो. त्यामुळे तरुणपणीच गाव सोडून बाहेर पडलेल्यांना,
आयुष्यात, करिअरमधे यशस्वी झालेल्यांना आपलं गाव इतक्या असोशीने आठवत असेल का ?
का नवीन जागी खोलवर मुळं गेल्यामुळे फारसं काही वाटत नाही. स्थलांतर हा फारच चिंतनीय विषय आहे हे मात्र खरं. माझा एक मामा आणि त्याचा एक मित्र औरंगाबादला उमेदवारीच्या काळात वर उल्लेखलेल्या दुकानात गप्पा टप्पा मारत इम्रती खायचे,करिअरची स्वप्न रंगवायचे. ते दोघेही माझ्या आईच्या माहेरचे. तर आज सत्तरीला पोहंचलेले हे दोघ आजही बालपणीच्या खेड्यात जाऊन रहायचं स्वप्न बघण्यात छान रममाण होतात. तर हे असं मनात एखादं गाव जागवत दुस-या गावाचं होऊन रहाणं कठीणच आहे तर.

विचारांच्या नादात खरेदी न करायची प्रतिज्ञा प्रदर्शनात कधी आणि कशी मोडल्या गेली कळलही नाही. खरेदी केल्यानंतर नंतर फार खजील झाले. त्यामुळे येताना रस्ताभर स्वतःला देमार टपल्या मारतच परतले. भारताच्या वस्त्र उद्योगाची शान असलेले विव्हज् आणि प्रिंटस् पाहिले की भान हरपतचं. पण त्यामुळे एक सुहानी शाम को कसम मोडीच गालबोट लागलं ते लागलंच.

No comments:

Post a Comment