Monday, 5 February 2018

गुरु.

एवढ्यात माझ्या सासूबाईंना बरंच बरं नव्हतं. दहा दिवस दवाखान्यात होत्या. तर आम्हा दोन जावांची, दिरांची दवाखाना, त्यांच खाणंपिणं निस्तरताना बरीच धावपळ झाली. पेशंटला अनुसरुन आमचं सर्वांच टाईम टेबल आखलं तरी घर ते दवाखाना,दवाखाना ते घर एवढच आयुष्य झालं होतं. काम फार नसलं तरी नाही म्हटलं तरी दमायला झालं. नेमकं त्याच वेळेस माझ्या एका कामवालीचा नवरा वरच्या जिन्यावरून पडला.त्यामुळे त्यालाही सरकारी दवाखान्यात ठेवलं गेलं. अजूनही तो दवाखान्यातच आहे. बरगड्या तुटल्यामुळे ऑपरेशन करावं लागलं त्यामुळे त्याचा दवाखान्यातला मुक्काम वाढला.
तर आमचा नुकताचचा दवाखानी अनुभव आणि बाईचाही दवाखानी प्रवास समांतर असा बरोबरीनेच झाला आहे. साहजिकच माझं मन सारखी आमची-तिची तुलना करत असायचं.

तर अजूनही तिचा नवरा सरकारी दवाखान्यातच आहे. एवढ्या तीन आठवड्यात तिने फक्त एकदा सुट्टी घेतली आहे. रोज दिवसभर कामं करुन, दोन मुलांच घरचं आवरुन ही रात्रीचा डबा व सकाळचाही डबा घेऊन संध्याकाळी दवाखान्यात जात असे. रात्रभर तिथे थांबून परत सकाळी कामाला परतत असे. सकाळचं-दुपारचं खाणं नव-याच्या उशाशी ठेवून दिवसभर तो एकटाच रहात असे.
नवरा म्हणजे एकदम जालीम कैरेक्टर. दारुडा,भांडकूदळ, संशयी,मारकुटा वगैरे छळवादी.
पहिल्या चारेक दिवसातच जनरल वॉर्डात बायकोविषयी सगळ्यांना नाही नाही ते सांगून झालं. मग चिडून एक दिवस ही गेलीच नाही दवाखान्यात. मग दुस-या दिवशी गेली तर परत भांडणं सुरु, शिवीगाळ सुरु.
...ताई लयी धांगोडा करत्यो तो. पु-या वॉर्डासमोर भांडितो.
अगं होते चिडचिड माणसाची आजारी असलं की.
...आजारी ? आजार म्हन्त्येत का ह्येला. नुसतं पाठीला मारं बशीलाय. आजारी मान्साचं डोकं नस्त्ये चालत. याचं तं लगी लयी चालतय पडल्या पडल्या.तु जेवण देत न्हाई म्हनं. आता माझ्या मागं दोन पोरं, दहा कामं..मी येकली काय काय करु. माहेराशी पन लयच भांडून बशीलाहे त्यो..कोनी विचारतना त्येला. रातचा,सकाळचा डबा नेत्ये. रातच्याला तिथेच -हात्ये. तरी मया म्हन्तो तुवा माजं मरनंच पायजे. मर म्हनलं.
तु सुटशील आन् मीबी सुटलं.
आपण किती जपतो दवाखान्यातल्या माणसाला. वेळेवर गरमागरम खाणंपिणं..भरवणं देखील. कपडे बदलणं,वेणीफणी..एक आटोपशीर संसारच चालवतो आपण आपल्या जिवलग पेशंट्साठी. पेशंटही तालेवार आणि शुध्दीत असेल तर हुकमानी सगळी यंत्रणा राबवून घेतो. करणारेही प्रेमाने, धाकाने, सुज्ञपणे वेळ निभावून नेतात.

काळजीने मीही हल्ली रोज चौकशी करते त्याची-तिची.तर आज ती सांगत होती..
...ताई..काल गेल्येतर दोन कार्टर(क्वार्टर) मारुन बशीला होता. शेजारचा मानुस सांगत व्हता कोनी दोन मान्स आलत्ये आन् त्ये बाटल्या देऊन ग्येल्ये.
अगं मग नर्सैस,डॉक्टर रागवले नाही का ? आणि त्यांना दिसलं नाही का हा पिताना,प्यायलेला ?
..ताई.. प्येनारे लय हुशार असत्येत. लपूनछपून कसंबी प्येतेतचं. येतका भांडिला माज्या संग कि काय इचारु नका. मी आपलं गपचीप आयकिलं. कुटं तोंट करता त्याच्यासंग. डॉक्टर लगी देयाचा घरी पाटवून.
मंग काय तं ! बरयं त्यो तिकडच हाय तं. मला तं लगी असं वाट्ते त्यानं लगी येऊच नाई घरी.जाय कुटं जायचं ते. लयी बेक्कार मानुस हाय त्यो.
वैतागून सांगण्यातलाही भावनावेग आता संपलेला.
नव-याला अरेतुरे संबोधत एकसूरात आणि तटस्थतेने सगळी कहाणी सांगून झाली.
जी छळवादी,त्रासदायक माणसं आयुष्यभर फक्त स्वतःचाच विचार करतात, स्वतःपलीकडे काहीही बघू शकत नाहीत ती माणसं असली काय नसली काय सारखंच वाटणार.

पण खरोखर उन्नीस बिस फरकाने बहुतांश कष्टकरी महिलांच्या आयुष्याच्या कथा या अशाच खडतर आणि विमनस्क करणा-या आहेत.ऐकून थक्क होतो आपण. कुठून एवढी हिंमत,धाडस आणत असतील या महिला ? जात-धर्म, पैसाअडका, शिक्षणाच्या परे असलेलं हे शहाणपण, सोशिकपण आणि धैर्य पाहिलं की वाटतं खरच परिस्थिती सारखा श्रेष्ठ गुरु नाही.
कुठे तळहाताच्या फोडाप्रमाणे पेशंटसला सांभाळत आळूमाळू जीव अजूनच हल्का करणारे आपण आणि कुठे पेशंटचा असा रोखठोकपणे विचार करणारे ते !

सरकारी दवाखान्यातला अजस्त्र कारभार, पेशंटची अशी आपल्या दृष्टीने होणारी हेळसांड, पेशंट्सही असे भारी कर्तृत्ववान तरीही ज्याची आयुष्याची दोरी बळकट तो कसाही जगतोच, बराही होतो.
असो.
मला मात्र हा तुलनात्मक अभ्यास करायचा आणि आपल्याला-त्यांना,मला -तिला जोखायचा एक चाळाच लागलाय.

No comments:

Post a Comment