Friday, 23 February 2018

अतिथी तुम कब आओगे ?

एवढ्यातच माझी सगळ्यात मोठी चुलत बहिण माझ्याकडे तिनचार दिवस राहून गेली.
तिचा आणि आमच्या कुटुंबाचा विशेष असा घनिष्ठ सहवास आणि प्रेम आहे. माझ्या आईला आम्ही दोघी बहिणी फार पाठोपाठ झालो. त्याच काळात ही शाळकरी मुलगी शिकायला म्हणून खेड्यातनं आमच्याकडे नांदेडला आली आणि आमच्या घराचा आणि कुटुंबाचाच एक भाग कायमची झाली.

आज तिचं वय एक्काहत्तर आहे. तीन वर्षापूर्वी तिचे यजमान गेले. मुलं आपापल्या घरी, संसारात सुखी आहेत.

तर ही उषाताई अतिशय काटक, कामसू, स्वभावाने लावकी वगैरे. तिच्या विषयी मी दिर्घ व्यक्तीचित्रण लिहीनच, पण आज फक्त या दोन तिन दिवसातली झलक शेयर करते.

७१वर्षाच्या उषाताईने गेल्या काही महिन्यात दोन क्विंटल चणे, उडीद, मुगाची डाळ जात्यावर खुशीखुशीत काढली आहे. तेही एकहाती आणि महिनाभरात. मी तर ऐकूनच थक्क झाले.
सध्या मी योगासनांचा क्लास लावला आहे त्यामुळे वाढलेली वजनं, स्पॉन्डेलिसिस, स्लिप डिस्क, लो बैक पेन, फ्रोजन शोल्डर हे शब्द चाळीशी पुढच्या महिलांच्या बाबतीत सध्या रोजच ऐकत आहे.
या फिजिकल डिसऑर्डर्स काय हे शब्द देखील तिच्या आसपास फिरकलेले नाहीत इतकी ती या वयात देखील काटक आहे.
माझ्या घरी येऊन बारा तास देखील होत नाही की उत्साहाने खुर्चीवर चढून स्टोअररुममधलं माझं तांब्या पितळीचं कलेक्शन पाहून कौतुक करुन झालं. सकाळीसच घरची बाग फिरुन झाली. कुंदा-अबोलीचे हार-गजरे मला करुन दाखवत, शिकवून झाले. म्हणजे माझी लिस्ट तयारच होती तिच्याकडनं काय काय शिकायचं याची.
हिरण्यला गेलो तर हिरण्यचा अख्खा तलावासकटचा, चढउताराचा परिसर एकदाही हाशहुश न करता
फिरुन झाला. झाडाला बांधलेला लाकूड-दोरीचा झोकाही झोकात खेळून झाला. तेही उभ्याने. मीच जरा घाबरले पडेल म्हणून.
घरी येताना हिरण्यवरनं चमको-याचे गड्डे नांदेडला न्यायला म्हणून आठवणीने मागून घेतले. गुंजा, अबोलीच बी आणि वावडिंगाची फळही नांदेडला तिच्या घरी लावायला म्हणून बांधून घेतली.
हिरण्यवरनं येताना झाडांवरुन पडलेले बदाम बॉक्स भरुन आणले तर हिने त्यातले दहाबारा बदाम चिकाटीने दगडावर फोडून लगेच आम्हाला खायला दिले.
नवीन खलबत्ता वाळूने झक्क रुळवून दिला.
देगलूरहून मी नऊवार इलकल खरेदी केलं तर ते कसं नेसायचं हे मला उठबस करत न दमता दोन तीन प्रकारांनी आनंदाने शिकवलं. ते शिकवताना दोरीवरच्या उड्यांची दोरी दिसली आणि दोरी आणि झोका दिसला की मी शांत बसूच शकत नाही गं म्हणत पंधरा वीस उड्या सटासट मारुन देखील झाल्या.
मराठवाडी स्वैपाक, म्हणी, मराठवाडी चित्रविचित्र चालीरीती, व्रतवैकल्य आणि कौटुंबिक गोष्टींची तर भरपूरच ह्रद्य देवाण घेवाण झाली.

तरी पण गुलबक्षीचा हार करुन दाखवणं, सरगुंड्यांची खीर मी करणं, धपाटे, खारोड्या तिने करणं, प्रोजेक्ट गोधडी अशा ब-याच गोष्टी करायच्या राहूनच गेल्या.

माझ्याकडच्या धातूच्या, लाकडाच्या, दगडांच्या, मातीच्या गोष्टी तर जितक्या अपुर्वाईने तिने पाहिल्या तेवढ्या आज पर्यंत कुणीही पाहिल्या नाहीत.
तुझ्याकडे इतक्या पहाण्यासारख्या वस्तू आहेत की कीतीही पाहिलं तरी डोळे आणि मन भरतच नाही म्हणत माझ्या संसाराला मनापासून कौतुकाची थाप दिली.
स्वैपाकातही मी आता छान एक्सपर्ट झाले म्हणून मातृप्रेमाने नव-यासमोर नावाजलं तेव्हा तर आईच्या जागी तिलाच बघत मीही सदगदीत झाले.

कुठलाही पाहुणा तिन दिवसांनंतर शिळा होतो अशी समजदार म्हण जरी असली तरी,
या अशा निरपेक्षपणे लावक्या आणि चैतन्यानी सळसळणा-या व्यक्ती पाहिल्या की खरोखर अतिथी तुम कब आओगे असं ह्रदयापासून विचारलं जातं नाही ?

दोरीवरच्या उड्या,हिरण्यला झोका,बदाम फोडून दिले,गजरे,नऊवार शिकवली.अबोलीची,गुंजाच्या बीया,आळूचे कंद,वावडिंगाची फळं

गुलबक्षीचा हार, सरगुंड्यांची खीर, खरोड्या राहिल्याच, गोधड्या

No comments:

Post a Comment