Friday, 23 February 2018

पुन्हा एकदा मनस्वी दगूड.

सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने नुकतंच दोघंही होट्टलला जाऊन आलो. होट्टल म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं,देगलूर तालुक्यातील आडबाजूचं अत्यंत छोटं गाव. इथून एक किलोमीटरवर तेलंगण-आंध्रा आणि वीस तीस किमीवर कर्नाटक बॉर्डर आहे.
इथे आणि इथल्या परिसरात कल्याणी चालुक्यांच समृध्द राज्य होतं आणि होट्टल त्यांच राजधानीचं ठिकाणं होतं. कलासक्त चालुक्यांनी इथल्या परिसरात खूप मंदिरं बांधली त्यातला देखणा पण अतिशय दुर्लक्षित असा एक मोठा मंदिर समुह होट्टल इथे आहे.

परिसरातली हितचिंतक-राजकारणी, इतिहास प्रेमी आणि कलावंतांनी आपला विकास आता आपणच करायचा या हेतूने या वर्षी हा पहिला होट्टल महोत्सव अतिशय मेहनतीने आणि यशस्वीपणे साजरा केला.

इथल्या भागातला (तेलंगणा,आंध्रा,मराठवाडा बॉर्डर आणि उत्तर कर्नाटका) दगड खूप छान आहे. अत्यंत टणक, एकजीव आणि काळाभोर.
जवळच्याच कंधारचे तिन मजली काळे कभिन्न दगडी वाडे आजही याची साक्ष आहेत.

आमची आई आणि मावश्या कंधारला गेल्या की आवर्जून तिथून खलबत्ते,पाटे-वरंवंटे आणि जाती मागवत. जात्यांच एवढं कवतिक व उपयोग नव्हता पण काळ्या दगडातले खलबत्ते आणि शिकलक-यांकडून अडकित्ते, किसण्या, विळ्या मात्र आठवणीने मागवत, आणत.

तर आज महोत्सवात सामिल होताना मंदिर परिसरात फिरताना मंदिराला लागूनच वडारांच्या झोपड्या दिसल्या. मंदिराच रिस्टोरेशनच काम जोरात सुरू आहे. मोठाल्या घडीव शिळा इस्ततः पडलेल्या आहेत.

खरंतरं माझ्याकडे दोन खलबत्ते आहेत. एखादा पाटा वरंवंटा बघावा म्हणून खोपटात डोकावले तर पाटावरवंटाही नव्हता, नाही जातं होतं त्यांच्याकडे. ओबडधोबड चारेक खलबत्ते मात्र होते. पण एका चुलीजवळ एक सुरेखपणे कोरलेला काळाभोर, तेलपाणी पिऊन चमकदार झालेला वापरातला एक खलबत्ता मात्र होता.
अक्षरशः पाहता क्षणीच मनात भरला.
अजून दोनेक तासात असा करुन द्या, नसता तेलपाणी पिऊन घोटीव झालेला हाच खलबत्ता मला द्या म्हटलं तिथल्या बाईला.
...जिचा हाय ती भाईर गेलीया. ह्यातलाच येखादा निवडा, लगी अशीच नक्षी करुन ठेवत्ये एक घंट्यांत.
लगेच निवडला आणि एक दगडी दिवा पण करुन ठेवायला सांगितला.

दोनेक तासात परतले तर सुरेख नक्षीचा अवजड खलबत्ता तयारच होता. दिवा मात्र नाही करता आला.
किती दिवसांच स्वप्न पुर्ण झालं. कंधारपासच्या दगडाचा सुबक आणि नक्षीदार खलबत्ता मिळाला. आणि मिळून मिळून कुठे मिळावा तर चालुक्यांच्या होट्टलच्या शिवमंदिर परिसरात. कल्पनेनीच रोमांचित झाले.
आले एकासाठी आणि घेऊन चालले दुसरंच.

आयोजकांनी आमच्या येण्याचं तर कौतुक केलंच पण होट्टल परिसरातल्या खलबत्ता खरेदीचीही हसून नोंद घेतली.
घरी आणल्यापासून इतकं कौतुक चालू आहे या खलबत्त्याचं की काही विचारु नका.
वाळू भरडून झाली, पालापाचोळा कुटून झाला. तेल चोपडून गार-गरम पाण्यानी आंघोळी झाल्या. डझनांनी फोटो झाले. आता पहिल्यांदा वाटण म्हणून शेंगदाण्याची चटणी करणार आहे. आता हे लिखाण पण त्याच कौतुकाचा भाग आहे.

पण काही म्हणा पुराण काळापासून चालत आलेल्या, नैसर्गिक स्तोत्रापासून बनलेल्या या पारंपरिक वस्तु वापरताना सात पिढ्या स्मरण होत बारा हत्तींच बळ अंगी भिनतं हो !

No comments:

Post a Comment