Saturday, 17 February 2018

दरवळ बकुळीचा.

बकुळाबाई ही माझी सगळ्यात मोठी आत्या. वहिदा रेहमान पाहिली की मला तिची आठवण येते. फार सुरेख दिसायची. माझ्या वडिलांची सगळी सख्खी भावंड खूप देखणी, शिवाय सगळ्यात धाकटी आत्या..कृष्णाआत्या. तर ही बकुळाआत्या सगळ्यात मोठी आत्या सगळ्यात फारच देखणी होती.

लहानखूरा, बारीक बांधा, गोरा पण खेड्यातल्या वास्तव्यामुळे रापरेला रंग, धारधार नाक, पातळ घट्ट ओठ, रुपेरी केस, चोपून नेसलेलं नऊवार साडी,
दोन्ही खांद्यावरनं पदर.
पुस्तकी रुपरेषेने बघाल तर एकदम देखणी पण एक व्यक्ती म्हणून बघाल तर कायम ओठ वाकडे मिटलेले,
कपाळाला आठ्या, चेह-यावर राग, बॉडी लैंग्वैज ताठर आणि दुराव्याची.

घरची गरीब परिस्थिती, आणि पहिलीच मुलगी म्हणून अगदी दहाव्यावर्षीच हिचं लग्न झालेलं. शिक्षण अजीबात नाही. नहाण आल्यावर सासरी पाठवली तर दोनेक वर्षातच परतली. आम्ही आमच्या आयुष्यात तिला बालविधवा बाईआत्या म्हणूनच कायम संबोधलं.
पण ते तसं नव्हतं. तिच्या नव-याचे दुसरीकडे संबंध होते म्हणून ही डोक्यात राख टाकून जी माहेरी परतली ती परत तिकडे गेलीच नाही.
आजीही तरुण आणि आजोबांच्या मानाने खमकी होती. आपली पोरगी आपल्याला जड होत नाही म्हणून आततायीपणे हिला माहेरीच ठेवून घेतलं.(म्हशीची शिंग म्हशीला जड होत नस्त्येत..-हाय बकुळे इथ्थच)

यथावकाश बाकीच्या तिन्ही भावांची लग्न झाली,
बहिणीचही लग्न झालं. भावांचे संसार फुलले, बहरले ही आपली आईची जोडीदार म्हणूनच आमच्याकडे कायमची राहीली.

या मायलेकींचं (मायबाई) वास्तव्य जास्त करुन हिमायत नगरलाच होतं. तिकडे एकास दोघी खूप सोवळं करायच्या, करायला लावायच्या.
एकोणीसशे पन्नासच्या पुढे माझे आजोबा गेले मग आजीने वपन केलं, चोळी घालणं सोडून दिलं, कायमचं पांढरं पातळ नेसायला लागली, सगळा स्त्री सुलभ शृंगार त्यागला वगैरे..वगैरे. झालं. यांच सोवळं अजूनच कडाडलं.
पण ही बाईआत्या मात्र निटसं रहायची. काय चारेक पातळं, ब्लाऊजेसच्या जोड्या असतील त्याच. आणि दोनचार खोट्या बांगड्या पण असाव्यात. कारण हिनेच त्या सुया-पोतवाल्या बायकांकडून पितळी नाण्याच्या पाटल्या करुन घेतल्या होत्या बहुधा. तर ही आत्या कानातले, चपला तरी वापरत होती का नाही हेही मला आता आठवत नाही. इतकी ही आत्या आमच्यापासून अंतर राखूनच रहात असे. आणि असे फटकारलेले फक्त आम्हीच नाही तर ती सगळ्यांपासूनच फार झटकून, फटकून रहात असे.
बाईआत्या सहज कुणाशी काही बोलत आहे, संवाद साधत आहे, हसत आहे, घरात काही लगबग काम करत आहे अशी दृश्य तर मला आठवू म्हटलं तरी आठवत नाहीये. मला तर तिचा स्पर्श देखील आठवत नाहीये. आजीच्या लुळपुळू पिंढ-या मी दाबून द्यायची.
आत्तासुध्दा हे लिहिताना मला नवल वाटतय की जी बाई महिनोन्महिने आपल्याकडे रहायची ती चप्पल घालायची का नाही हे देखील आपल्याला आठवत नाहीये, माहित नाहिये.

या माझ्या आत्याने कधीच कुणाशी सुसंवाद साधला नाही. ना तिच्या बहिणीशी ना भाऊ-भावजयांशी ना कोणी मैत्रीणीशी आणि ना ही बहुतेक आईशी पण.

आजी कीतीही त्रासदायक वाटली तरी बरेचजणं तिचं समजून उमजून प्रेमाने करायचे पण या बकूळाबाई म्हणजे कोणालाही नकोच असायची. तसा तिचा त्रास काहीच नसायचा पण कायम फक्त मी, आम्ही(ती आणि तिची आई), आमचंच ती बघायची. दुस-यांना मदत म्हणून तर ती काडीचही काम करायची नाही. भाऊ सगळे खाऊन पिऊन बरे होते तरी दोन-तीन खोल्यातले संसार, चार-चार मुलं, येणारे-जाणारे साहजिकच भावांची पैशानी आणि भावजयींची कष्टाने ओढाताण व्हायचीच. त्यांनी घरातल्याच तरुण बहिणीकडनं अपेक्षा करणं रास्तच असायचं. पण माझ्या या आत्याने आमच्याकडे न कधी झाडून काढलं, न कधी भांडी घासली-लावली,न कधी भाज्या निवडल्या,
न ही कधी गहू-तांदूळ निवडले न कधी स्वैपाक केला. कायम आईच्या शेजारी बसून रहायचं आणि दुर्लक्ष केल्यासारखं दाखवत सगळीकडे लक्ष देत रहायचं आणि फक्त आपलं आणि आपल्या आईचं काम करायचं. जिथे बसायच्या तिथलच झाडून कचरा बाजूला लावून द्यायचा. पाणी टंचाई असली की आपल्या आंघोळी,धुणी आधी हट्टाने उरकून घ्यायची. गावाहून आलं की प्यायचं पाणी, सतरंज्या,पांघरुणं आपापलं वेगळं ठेवायचं (आमचंच आल्यासरशी हस्तगत केलेलं) आम्हाला चुकुनही हातही लावू द्यायचा नाही. समज आली तशी मग आम्हीही खुन्नसने वागायचो.
आमच्या लहानपणी माझ्या आईची तर फार तडतड व्हायची कामांनी पण माझ्या या आत्याने कधीही तिला घरकामात मदत केली नाही. उलट आपलं आपल्या आईचं वेळेवर आंघोळादी, जेवणखाणं झालं नाही की आठ्या वाढवायच्या, रागराग करायचा, कधी धुसफुस करायची आणि मग उदबत्ती, साखर, रुपया मागून घेऊन जवळच्या कुठल्याही मंदीरात जाऊन बसायचं. थोडक्यात तुमच्या संसारी अडचणी तुमच्या राशीला.
ही कधीच समंजसपणे वागायची नाही,बोलायची नाही का रहायचीपण नाही.
आम्ही चार भावंड, आई-वडील, आईची पंगु आई आणि वयस्क वडील, आमचं रहाणं शहरातलं म्हणून,आजा-यांना भेटायला म्हणून पाहूण्यांचा अखंड राबता असायचा आमच्याकडच्या सरकारी तीन खोल्यात. पण म्हणून या बाईने कधी वेळप्रसंग बघून आमची वेणी घातली नाही, का बाबांना कधी जेवायला वाढलं नाही, का कधी दुपारचा चहा केला नाही, का मेथीच्या दोन जुड्या कधी निवडल्या नाहीत.
याऊलट माझी आजी कधीतरी समजून जमेल तसा मदतीचा हात पुढे करायची तर ही तिचा रागराग करायची. शिळं तर कध्धी खायच्या नाहीत दोघी मायलेकी. पण हीच आत्या हिमायत नगरला सडा, झाडझुड, कपडे धुणं ही कामं करायची म्हणे असं काकूंनी मला एवढ्यात सांगितलं. पण तिथेही ती कधी ना चुलीजवळ फिरकली ना कधी कोणत्या भाच्याला-भाचीला जवळ केलं. भाऊभावयांसारखंच तिने सगळ्या भाचरांची, लग्न, सणवार, बाळांतपणं अगदी तटस्थपणेच अनुभवली.

उत्तर आयुष्यात आजीला आपण आपली मुलगी आततायीपणे कायमची माहेरी ठेवून घेतली याचा फार पश्चाताप झाला. म्हशीची शिंग म्हशीलाच जड होतात ती अशी. पण कळलं तेव्हा वेळ निघून गेली  होती.

मला हल्ली तिच्या या अशा वागणूकीचं खूप वाईटही वाटतं. अख्ख आयुष्य कायमच एका वठलेल्या खोडासारखं काढणं किती कठीण आहे. तेही आसपास अशी फुलबाग फुलताना. सगळच फुलणं काही सुबत्तेवर नसतं. भावजायंच नटणं-थटणं, सौभाग्यवतीचे सणवार, पती सहवास, मुलं होणं..एकूणच जन्माचं बेसीक सार्थक पुर्ण करणारे भाऊ-भावजयांचे सुफळ संसार. कुठेतरी मन कुरतडलं जात असेल, शरीर आसुसत असेल. पण घेतला वसा टाकणार नाही सारखा संसाराकडे पाठ फिरवायचा निर्णय नाही म्हटलं तरी जिवाच्या भारी नक्कीच झाला असणार.
अधून मधून घरातल्यांनी नवराबायकोत तसप्या घडवून आणायचे प्रयत्न केले पण दर वेळेस कुणाच्यान कुणाच्या आडमुठेपणामुळे विफल झाले. नंतर त्याही गृहस्थांनी दुसरा संसार थाटत हिच्याकडे पाठ फिरवून विषयच मोडीत काढला.

स्वतःचा म्हणावा असा छदामही मालकीचा नसणं, कायम आईबरोबर गाड्याबरोबर नळ्याच्या यात्रेसारखं संसारी भावंडांकडे फिरणं..नाही म्हटलं तरी एक छुपी खदखद असणारंच मनात. त्या दोघीही आल्या की आई त्या दोघींनाही किमान दोन दोन पातळं घेऊनच द्यायची. आत्याचे ब्लाऊज शिवून द्यायची. तरी पण अगदी तरुणपणापासूनच कुणीही का म्हणून विचारु नये अशी स्वमर्जीने खरेदी करायचं आर्थिक स्वातंत्र्य आयुष्यभर नसणं ही फार मोठी व्यावहारिक आणि सृजनशील कोंडी आहे. तसच वेळोवेळी मनातलं कुणाशीही बोलता न येणं, तशी परिस्थिती नसणं,विश्वासही नसणं ही देखील फार मोठी भावनिक कोंडी असते. कदाचित भावांचे देखील आपापले व्याप आणि चिंता सांभाळत या दोघींना बसल्या जागी खायला-प्यायला-ल्यायला मिळतय, तर अजून काय हवं या भावनेनी दुर्लक्ष झालं असेल.
पण अख्ख आयुष्य सर्वार्थाने भरल्या घरात शरीराने राहूनही एक स्त्री स्वतःहून कायम हद्दपारीचं, रुक्ष आयुष्य जगली याचं मला हल्ली फार वैषम्य वाटतं.

माझी आजी तरी आईला कधी मदत करायची, र ट प करत पेपर वाचायची,आमच्या चौकश्या करायची पण माझ्या आत्याने कधीही पेपर हातात देखील धरला नाही. देवाचे एखादे स्तोत्र म्हणलेली देखील ती मला आठवत नाही.

का अशी वागली असेल ती ?
एक स्त्री उभं आयुष्य अशी निरसतेने जगू शकते ?

आज आपण पहातो व्यवसायात अग्रणी असलेल्या महिला देखील स्वैपाकाकडे, बाल,वृध्द संगोपनाकडे,
बागकाम-घरकामाकडे, एखाद्या छंदाकडे ताण कमी करणारा विरंगुळा म्हणून बघतात. एक थेरपेटीक वर्क म्हणूनही अशी कामं करतात. आणि हे कालातीत सत्य आहे तरी ही माझी आत्या सर्वावर राग ठेवत स्वतःच का करपत गेली असेल बरं ?
बरं नाही भाऊ भावजयींचे संसार मग झाडं-पानं-फुलं,
शिवण-टिपण,पुजा-पोथ्या-भजनं...मन रमवायला कुठलही छंदाच तळं चांगलंच असत की!
का बरं ही बाईआत्या अशी कोरडीठाण, अशिक्षित आणि सृजनशीलतेच्या काठावरच राहिली ?

मला हल्ली फार वाईट वाटतं तिच्या विषयी.
एका स्त्रीला एक साधा हिरवा-निळा-पिवळा ब्लाऊज पीसही बाजारातून स्वमर्जीने आणणं कधी शक्य झालं नाही, जिला आयुष्यभर मेंदीच्या साध्या चार रेषा हातावर कधी रेखता आल्या नाहीत त्या महिलेला समजून घेण्यात आपणच खूप कमी पडलो याची फार रुखरुख माझ्या मनात असते.
  
बकुळीची नखभर फुलं उगवतात कधी आणि कोमेजतात कधी कळतही नाही आपल्याला.
पण आसमंतातला सुवास मात्र त्यांच आसपासच आस्तित्व जाणवून देत असतो.
तसच ही बालपणी असून नसून सारखी या खाक्याने दुर्लक्षलेली आमची बकुळाआत्या हल्ली मनात सतत दरवळत असते.

No comments:

Post a Comment