Monday, 12 February 2018

कुणी घर आवरुन देता का घर ?

निमित्त काही का असेना मनातली खळखळ लिहूनच काढली आहे बघा.🤗

काही काही जणांची घरं इतकी स्पॉटलेस क्लिन आणि टापटीप कशी काय असतात बुवा कळत नाही.😎 अंगण स्वच्छ, झाडं-झुडपं टुकीने तजेलदार. चपलाबूटांचा गोंधळ नाही. अस्ताव्यस्त डोयर मैट नाही. ताजे पेपर सुबक घड्यात. शिळे शिस्तीत शेल्फमधे. धुळकटलेली मासिकं नाही, रायटिंग पैडस नाही, न चालणारे पेनं नाहीत. व्हरांडा घ्या, हॉल घ्या, किचन घ्या, बेडरुम घ्या, जिने घ्या, गच्च्या घ्या, गाड्या घ्या..सगळं कसं टापटीप जणू आत्ताच सफाई झाल्या सारखं टकाटक. 🤔

बरं हे लोकं नुसतं घरच टापटीप ठेवत नाहीत तर ते स्वतःही इतके आटोपशीर ठीकठाक रहातात ना की त्यांना बघून वाटतं हे कधीतरी काही घरकाम करत असतील का म्हणून. केस जिथल्या तिथे, कपडे ठीकठाक. अहो अगदी नखाचा काय नेलपेंटचाही कपचा उडालेला नसतो यांच्या कधी. अगदी कौतुकाचा विषय आहे. मला तर कौतुकापेक्षा औत्सुक्यच फार आहे. How they can manage everything so swiftly ? 😙
बरं नोकरचाकर म्हणावेत तर तेही बेटे शिस्तीचेच असतात. चार चार नौकर पण न बोलता चुटूचुटू कामं करतात. बायका सुध्दा आवाज न करता भांडी घासणार.🙈🙉🙊
कुठेही ढिसाळपणा नाही सैलावलेलेपण नाही. सगळं कसं कडक स्टार्ची. अशा घरात रहावतं कसं या पेक्षाही, ही शिस्त आणि नेटकेपणा जमतो कसा याचच मला फार आश्चर्य वाटत. कसं जमत असेल हे यांना ? एकही माई का लाल अस्ताव्यस्त नसेल का घरात ? 😬

इतकं काम डोक्याने करताना आणि दुस-यांच्या हाताने करवून घेताना ही मंडळी दमत नाहीत का कधी ?🤷
दे दणादण पार्ट्या करतील, येणारे जाणारे असतील तरी या घरातले ओटे, डायनिंग टेबल बघाल तर चकाचक. आम्ही मेलं रताळ्याच शिकरण जरी केलं तरी सांडलवंड करुन ठेवतो आणि सुरळीच्या वड्यांचा पसारा तर अक्षरशः चार दिवस पुरतो.😩

मला तर अशा घरात मी गेले,अशा लोकांना भेटले तरी प्रचंड कॉम्प्लेक्स येतो की परमेश्वराने नक्कीच आपल्याला काहीतरी कमी दिलय म्हणून.🙅
आमचीही घरं तशी बरी निटनेटकी असतात पण इतकं स्पॉटलेस, पिनड्रॉप सायलेंट घर ठेवायचं म्हणजे श्वास रोखून प्राणायमातला कुंभक करण्यासारखंच आहे बाबा.😤

आमच्या तर बेडरुममधेच चारेक डझन पेनं निघतील,
सहासात डाय-रा, दहावीस पुस्तकं, अनेक चिठ्ठ्या चपाट्या, बिलं सापडतील. आरश्यावर दहाएक टिकल्या विराजमान झालेल्या दिसतील. बाहेरुन बेडरुममधे आलेला एक जिताजागता वेल तर विस-पंचवीस फूट खोलीतच वाढलाय. आम्ही आपलं दिवसागणिक त्याच वाढणं खुषीने बघतोय.☺️
कपड्यांची कपाटं, चपलाबूटांचे शेल्फ,मुलांच्या खोल्या तर विचारु नका. आणि स्वैपाक घर तर अखंडीतपणे व्यायल्यासारखंच कायम असतं.🤦
जन्म गेला ते काजळ आणि आय लायनर लावण्यात तरी आमच्यात अजूनही रेखीवताच नाही.🙄

अहो...नक्कीच त्या परीटघडी घरातील लोकांना विषेशतः गृहिणीला जगदंबे सारखे आठ हात आणि रावणासारखी दहा तोंड असली पाहिजेत. त्याशिवाय ही अशी करकरीत स्वच्छता अशक्य आहे.💪

जसं लग्नाच्या दिवशी नववधूला ती ब्युटीशियन इतकं छान नटवते की आपलीच पोरगी तिच्या आईबापाला ओळखू येत नाही.
तसच मला कधीतरी वाटतं या अशा कडक इस्त्रीवाल्या घराच्या मालकीणीला म्हणावं बयो लागलं तर पाच दहा हजार घे पण माझं घर निदान काही काळासाठी तरी तुझ्या घरासारखं परीटघडीच करुन दे. बघू तरी कसं दिसेल ते माझं बाळं. 🙆
आणि नजर लागायची तर नक्कोच करु काळजी. पसारा रुपी तिट लावायला अस्मादिक आहेतच.🙋

No comments:

Post a Comment