पुन्हा एकदा मोरण्यांविषयी.
मी उजव्याबाजूचं नाक टोचून दिड वर्ष होऊन गेलं.ब-याच विचारान्ती,अभ्यासानंतर फार हौसेने व हिंमतीने मी नाक टोचवून घेतलं. मला दक्षिण भारतीयांसारखी ठसठशीत मोरणी घालायला आवडतं. पण प्राथमिक तयारी म्हणून ज्या एकखडी मोरणीच्या तारेने नाक टोचलं तिच मोरणी जवळपास वर्षभर नाकात ठेवली. मग एक चांदीची गोळी आणि डंबेल्ससारखी लेटेस्ट फैशनवाली मोरणी वापरायला सुरवात केली. मग मुंबईच्या चकरेत फिरकीवाली साऊथ इंडीयन टाईप मोठी मोरणी आणली आणि यथावकाश नाकात घालूनही घेतली. सोनाराने सांगितले आता ही मोरणी निघणं शक्यच नाही फक्त सारखी फिरवत रहा म्हणजे छिद्र मोठं होईल. पण कसचं काय गुजरातमधे नर्मेदे किनारी गेले तर तिथे ही मोरणी एकदम हातातच आली. मग लगेच उरक दाखवत राजपिपल्यात एक मोरणी घेतली तीही नाकात अडकवली. पण या तारेच्या आणि मोठं डिझाईन असलेल्या मोरण्या टॉवेलने खसाखसा तोंड पुसताना लगेच बाहेर निघतात. तशीच ही पण आली. दरम्यान माझीही मोरणी घरच्या घरी घालून बघायची भिती गेली होती. आपली चांदीची मोरणी परत स्वतःच घालून घेतली.
मग नांदेडला गेले तिथे एक फिरकीची,एक तारेची अशा दोन मोरण्या घेतल्या. परत घरी येऊन सोनाराकडून घालून बघायला लागले तर फिरकीची दांडी लांबीला माझ्या नाकाच्या स्किन पेक्षा छोटी निघाली. सोनार म्हणला ही मोरणी तुमच्या नाकाला नाही बसणार. तारेचीच पण जरा मोठाड डिझाईनची दुसरी मोरणी घातली तर तिच्या ऐसपैसपणामुळे परत टॉवेलमुळे मोरणी बाहेर.
च्यामारी असा वैताग आला या मोरण्यांचा आणि त्या डिझाईन्सचा आणि त्या हौसेचा.
मधे भांडी बाजारात गेले होते तर एक बुंदेलखंडी बाई झक्क चौकोनी मोरणी घातलेली दिसली. चौकशी केली तर चल तुला दुकानच दाखवते म्हणत उत्साहाने घेऊन गेली.
या दुकानात जरा वैविध्यपूर्ण डिझाईन्स दिसले. टोकदार सोनेरी(तांब टाकलेलं सोनं) पाकळ्या आणि पांढरे खडे असलेली चांदणीसारखी मोरणी घेतली. लगेच घातली.
पण दुस-याच दिवशी जे नाक दुखायला लागलं कि बास. रुंद चांदणीची कचकचीत टोकं नाकात वरुन रुतली व सगळी नाकपुडी दुखायला लागली. लगेच मोरणी काढून टाकावी लागली.
एव्हाना विविध डिझाईन्सची दैनंदीन वापरातली निरुपयोगीतता लक्षात येत चालली होती आणि मोरणी घेताना आपण सारासार विचार न करता, बुध्दी गहाण टाकल्यासारखं वाट्टेल त्या मोरण्या खरेदी करत सुटलोय याचं हसू आलं.
परत दोन आठवड्यानी एका प्रसिद्ध मोरणी दुकानात गेले. ठसठशीत गोलसर खड्यांची मोरणी खरेदी केली. निटसपणे घातली.
इथे दुकानात विक्रेत्या बाई असतात म्हणून जरा मोकळेपणाने चर्चा झाली.
आधीच मला देमार सर्दी झालेली. त्यामुळे चेह-याला मसाज करणं, नस्य करणं चालूच होतं. त्यात योगाक्लासचं नाकपुड्या बंद करुनचे विविध प्राणायमं. तेल, साय, हळदीचे माझे घरगुती फेशियल्स, शिवाय टॉवेल, रुमालाची खसख...
ऐटीत विराजमान झालेल्या या थोराड मोरणीचीही विकेट जायला एवढी कारणं पुरेशी होती.
तर गेल्या चारपाच महिन्यापासून मी मोरणी प्रकरणानी त्रस्त झालेली आहे. यात सगळा घोळ कुठला असेल तर चुकीची पण वैविध्यपूर्ण डिझाईन्स निवडीचा.
तारेच्या मोरणीला छोटसच आणि गोलसर डिझाईन पाहिजे. फिरकीच्या मोरणीला मोठाल्या डिझाईन्सचे वैविध्य चालू शकते. आणि जडशीळ मोरणी, नथ असेल तर त्याला सपोर्ट करणारी कानाकडे जाणारी साखळी मस्ट आहे नसता अदिवासींसारख्या नाकपुड्या लोंबतात.
Believe me..खेडोपाडी अशाच फिरकीच्या पण वैविध्यपूर्ण डिझाईन्सच्या मोरण्या सरसकट मिळतात आणि वापरल्याही जातात.
सातदाणी, रिंगतारा, बेलाचं पान, चांदणे, चंद्रकोर, बेसर, मेहबुबा अशा रोमांटीक नावाच्या फिरकी मोरण्या सर्रास आपल्या प्रांती खेडोपाडी मिळतात.
जे मला सहा महिन्यात अनुभवाने कळलं ते शहाणपण ऑलरेडी तळागाळातील समाजापर्यंत मुरलेलं आहे. त्या महिला ज्या मोरण्या वापरतात त्या कायमच्या असतात म्हणूनच ती डिझाईन्स सुटसुटीत आणि गरजेनुसार, सोयीस्कर अशी हायली इव्हॉल्व्ड् झालेली आहेत. आणि नुसती मोरणीचं का ? आपले बहुतांश पारंपरिक दागिने असेच गरजेनुसार, सोयीप्रमाणे इव्हॉल्व्ह झालेले आहेत.
नाकाच्या, कानाच्या साखळ्या. जडशीळ कानातल्यांनी कातडं लोंबू नये, दुखू नये, त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून वापरले जातात. तशाच त्या हेयर पिना, फुलं..केस घसरु नये म्हणून वापरतात. टप्पोरं शिर्ष फुलं डोईवरची चुनरी घसरू नये म्हणून वापरतात. हातातल्या पाच अंगठ्या आणि पायातले पाची बोटांचे दणकट जोडवी सहजासहजी घसरू नयेत, हरवू नयेत म्हणून त्यांना साखळ्या असतात आणि त्या साखळ्या हातातल्या बांगड्या किंवा पायाच्या तोरड्यांना जोडलेले असतात.
असं कलात्मक आणि गरजेचं इव्हॉल्युशन दागिनेच काय प्रत्येकच वापरातल्या गोष्टींसाठी झालं आहे असं म्हणता येईल. चौकसपणे अभ्यासलं तर चकीत होतो आपण.
म्हणूनच ही पारंपारिक डिझाईन्स वा दागिने कालातीत अशी टिकतात आणि मर्मबंधातली ठेवही होतात.
तर असो. काय ती हजारपाचशेची मोरणी/ण्या पण हे असं भलतंच शहाणपण देऊन गेली बघा.
No comments:
Post a Comment