Wednesday, 14 February 2018

सुया..मनी...पोत....

सुया..मनी..पोत...
आमच्या गैस एजन्सी तर्फे एल पी जीचं सेफ्टी क्लिनिक घ्यायला मी वाळूजला गेले होते. तर परतताना ही सुयापोतवाली दिसली. थांबवून लगेच फोटो काढला. फॉर ओल्ड टाईम्ससेक सुया, मणी आणि चक्क पोतही विकत घेतली. विक्रेतीही फारशी घासाघीस न करता सकाळीसच घसघशीत विक्री झाली म्हणून खुश झाली. आपुनने भी जादा दिमाग नही लगाया. भाई व्हैलेंटाईन डे जो है.

आयुष्यातली पहिली सुया पोत मणीवाली नांदेडला पाहिलेली. नांदेड भागात आंध्रा-तेलंगणामुळे बहुतांश कष्टकरी चमकदार आणि एकसारख्या शिसवी रंगाचेच असतात. तर या महिला तशाच तुकतुकीत पण जर्द काळ्या रंगाच्याच असायच्या.
अटकर बांधा, चापुनचेपून नेसलेलं गर्द रंगाचच काठपदरी नऊवार, केसांचा आंबाडा, खोटेच पण चमकदार भरपूर दागिने अंगभर.
कधीमधी पाठीला सुती कापडाने बांधलेलं लेकरु, डोईवर पाटी, पाटीत मुलखाचे चमचम बेगडी दागिने.
मोरण्या, कानातले, अंगठ्या, बिल्वर, जोडवे,
क्लिपा, दात कोरणी, आकडे, गंगावनं, रिबीनी, पावडरी, कंगवे, सुया, दाभणी, आरसे, सागरगोटे, काळ्या मण्यांच्या पोती, चमकीचे मणी..थोडक्यात एक फिरतं जनरल स्टोअरच म्हणा की.
गल्ली बोळात फिरत, दारोदार जाऊन आवाज देत विक्री करणारं. बरं यांची वेळही ठरलेली फिरायची. दुपारची निवांत वेळ. बाया बापड्या फावल्या वेळात एकमेकीचं बघून करतात भरपूर खरेदी.
किती जुनी प्रथा आहे ही.
महिला उठसूट बाजारात जायच्या नाहीत म्हणून दारीच दुकान घेऊन यायचं. तेव्हाच्या टोपल्या आणि दागिन्यांच्या डिस्प्लेचं फळकूटही फार युनिक असायचं. आता विक्रेते, खरेदीदार, वस्तु आणि डिस्प्ले सगळचं आधूनिक झालयं.

औरंगाबादला नवीन रहायला आलो तेव्हाही आमच्या कॉलनीत या महिला फिरायच्या पण नांदेडच ठसठशीत देखणेपण त्यांच्यात नसायचं. पण आम्ही खरेदी मात्र औरंगाबादीच जास्त केली असावी.
विशेष म्हणजे या बायका बहुदा घराघरातनं केसांची गुतवळं पण ढिगांनी न्यायच्या आणि काही दिवसांनी गंगावनही करुन आणून द्यायच्या. तसच बहुदा पिवळ्या दहा पैशाच्या नाण्यातून बांगड्या देखील करुन देत असाव्यात. तांब्याच्या तारेनी किंवा चक्क सुईदो-याने नाक, कानही टोचून देत असत.
आम्ही तर दर उन्हाळ्यात सागरगोटे घेत असू यांच्याकडनं. आईने गंगावनही करुन घेतल्याच आठवतयं. घरोघर भिंतीवरच्या तिरप्या आरश्यामागे डाव्या हाताला गुंतवळ ठेवली जायची आणि उजवीकडे कंगवा ठेवला जायचा. लांब मोठ्या केसांच्या शेपट्याच त्याकाळी कोण कौतुक होतं. लांब केसवाल्या, गो-या मुली म्हणजे लग्नबाजारातलं चलनी नाणं असायचं. रजनीगंधा चित्रपटात झुपकेदार वेणी हलवत चालणारी विद्या सिन्हा पाहिली की मला या सुया-पोत-मणीवाल्या आणि त्यांची गंगावणं आणि त्याकाळची लांबवेणीची क्रेझच आठवते.
असो. तर गरज नसतानाही घरातल्या ढीगभर
सुया-मण्यात अजून चार गोष्टींची भर पडली.
पण काही म्हणा अडगळीतल्या नॉस्टेलजीक गल्लीत फिरताना मजा आया.
सुया..मनी...पोत....

No comments:

Post a Comment