एक सुकोमल, सुस्वरुप बालिका जन्माला येते आणि कालांतराने नवसाने घरात धाकला पाहुणा आणला जातो...
आणि एका बालिकेचं समजदार फुलपाखरु होतं.
पायातले पैंजण अन परकर ब्लाऊज आणि हदग्याची गोलगोल गाणी...
आणि एका पोरीच नाचरं फुलपाखरु होतं.
शाळेतली घोकंपट्टी, गैदरिंगमधला नाच आणि मैदानावरचा चषक...
आणि एका मुलीचं उमदं स्वप्नाळू फुलपाखरु होतं.
अभ्यासाचा ताण, मासिक पाळीचा त्रास, ब्रेसियरचा काच...
आणि एका मुलीचं फुलपाखरु गुमसुम होत जातं.
जिद्दीची ऐडमिशन,भावनिक हिंदोळे, समाजाची रित...
आणि एका मुलीचं फुलपाखरु गोंधळून जातं.
विवाहवेदी, मनाची हुरहुर, शरीराची स्पंदन, पोटात चाहूल...
आणि एका मुलीचं फुलपाखरु मोहरुन जातं.
फुलपाखराचंच ते फुलपाखरू...रंगबिरंगी हळुवार स्वप्न घेऊन आलेलं...
आणि एका मुलीचं जबाबदार फुलपाखरु होतं.
फुलपाखरांचीच फडफड, थोडीशी वणवण, बरीचशी तडफड...
आणि एका मुलीचं फुलपाखरु आतल्या आत मिटून जातं.
जे निसटलं ते देत रहाणं, एका फुलपाखराला आपल्यासारखंच विहारताना पहात रहाणं...
आणि एका मुलीचं फुलपाखरु रिक्त-विरक्त होत जातं.
फुलपाखराचं फुलपाखरु...
त्या फुलपाखराचं परत फुलपाखरु...
परत त्या फुलपाख......
फुलपाखरांची कथा-व्यथा संपत नाही.
बाईचं फुलपाखरु होणं थांबत नाही.
No comments:
Post a Comment