किराणा भरताना. दुध घेताना, धोब्याचे हिशेब नोंदवताना...
नजरेत भरते तारीख आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची.
दहा दिवसावर ऐनिव्हर्सरी आली आहे..
चला लागलं पाहिजे तयारीला.
सेलेब्रेशन ! हो..हो..तेच ते रतीबाचं साजरीकरण.
शिरस्त्याप्रमाणे exclusive dinner, exotic restro मधे.
हं..पण रेस्टॉरंट मात्र दरवेळेस वेगळंच असतं हा.
काय घालावं-नेसावं ही नेहमीचीच चिंता करत मी कपाट पालथं घालून हा ढीग उपसते.
हिरवी..निळी..पिवळी..झगझगीत इंडियन का म्युट वेस्टर्न..
गोरा रंग खुलवणारी आणि ऐसपैस बांधा चपखलपणे लपवणारी काळीच साडी मी निवडते.
पार्लरची अपॉइंटमेंट.
हेयर कलर, वॅक्सिंग, फेशियल, बॉडी मसाज..
कोरड्या, विरळ रुपेरी केसांना रंगवून
मी मसाज टेबलावर ब-यापैकी नागडी-उपडी पडते.
अरोमा तेलात बुडालेले मऊशार हात बोलत, बोलकं करत तलमपणे वळणावळणाने शरीरभर फिरत रहातात.
स्पर्श सुखाची एक मृदू पण अनोखी लहर
शहारत अंगभर, मनभर सळसळत जाते.
Madam तुमची स्किन मस्त, Madam तुमचा रंग छान, तुमचे डोळे चमकदार..वजन जरा कमी करा सांगत मसाजवाली मनात घर करत विश्वासपात्र होऊन जाते.
Manicure, peducure करत तिलाच विचारुन एक ट्रेंडी शेड नखांसाठी, एक ओठांसाठी..
थुलथुलीत मांड्या..पाठीचा कणा खाऊन टाकलेल्या मांसल वळ्या..ओघळलेलं पोट..विसविसलेले वक्ष..
निब्रटलेले कोपरे..काळवंडलेली मान..
अयाई..गं...
बयो..चार पैसे जास्त घे पण अख्खा देह उजळून दे.
Yes madam.
त्याच सखीकडून वायर्ड पैडेड ब्रा..शेपर्सची माहिती घेऊन मी बाहेर पडते आणि मनाजोगी खरेदी करुन आल्हाद घरी येते.
त्या दिवशी..
सकाळपासूनच फोनवर शुभेच्छांचे अविरत गुच्छ येतात.
सासर-माहेर, मित्र मैत्रिणी..सगळे फोन हेच अटेंड करतात कारण मी ह्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट जीव ओतून बनवत असते.
सांजेला एखादी जूनी-नवी लकेर घेत बेडरुमचं दार लावून दिलोजानसे मी तयार होते.
हा संगमरवरी रंग, हे हरिणाक्षी डोळे, हे नाजूक मऊसुत हात, फताडी पण बेमालूम लपवू शकतीलशी पावलं..
हाय..हाय..Not at all bad @52
सांजेला डॉट आठला मी तयार होऊन बसते.
कामामुळेच नेहमीचंच उशीरा येणं.
बाहेरुनच परिचित हॉर्न..
घाईतच मैचिंग पण रिकामं क्लच घेऊन मी तडफेने निघते.
मंद प्रकाश, दबकी हालचाल, माफकच संवाद..
काटाचमच्यांची हळूवार किणकिण ऐकत उगा इकडेतिकडे बघत एकमेकांच्या नजरी चो-या पकडत आम्ही डिनर घेतो. सर्रकन कार्ड स्वाईप करुन घरी येतो.
पुढची रात्र डायमंड ब्रेसलेटला किणकिण करायची फारशी तसदी न देता सरुन जाते..
आणि पहाटे पर्यंत एक समई देव्हा-यात नेहमीसारखी मंद जळत रहाते.
No comments:
Post a Comment