भारता मधली एक अग्रणी चित्रकार.
एखाद्या वावटळीसारखं पण समृध्द पण उणंच आयुष्य जगलेली.
चित्रांच्या विषयांसाठी भारतीय निसर्गानी, रंगांनी आणि सर्व सामान्य माणसांनी मोहीत झालेली. पण व्यक्तीशः मात्र युरोपियन पध्दतीच्या मुक्त विचारांनी जगणारी.
म्हणूनच तिच्या चित्रात सामान्य, नगण्य माणसं आणि प्रसंगही फार वेधक दिसतात तसेच ते चैतन्याने सळसळणारे असे सेल्फ पोर्ट्रेट्सही स्तिमित करतात. अजिंठा चित्र शैली आणि भारतीय मिनियेचर पेंटिंग्जचा प्रभाव तिच्यावर फार दिसतो.
व्यक्तीशः मला तिने रंगवलेल्या काळ्या,सावळ्या मुली-महिला,त्यांचे मंद, रंगीत चुणीदार पेहराव आणि पांढ-या रंगाचा नेमका वापर फार आवडतो. तशीच ती माणसांची लयबध्द रचना. अगदी साधे विषय, साधी माणसं तरी अमृता शेरगीलने स्वतःच्या नजरेनी, कलात्मक रचनेनी, रंगलेपनाने त्यांना अजरामर करुन ठेवलय. आणि म्हणूनच भारतातली पहिली मॉडर्न आर्टिस्ट म्हणून तिचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं.
अमृता शेरगीलची बरीचशी चित्र दिल्लीच्या नैशनल म्युझियम आहेत. ही पेंटिंग्ज पाहिल्यावर तिला मिळालेल्या अल्प आयुष्याची चुटपुट लागल्या शिवाय रहात नाही. ती दीर्घायुषी झाली असती तर भारतीय चित्रकलेत फार मोलाची भर पडली असती हे तिची अल्प काळातली चित्र बघून वाटत रहातं.
No comments:
Post a Comment