Monday, 8 January 2018

धागा..धागा..अखंड विणू या.

नुकतीच परदेशी पाहुण्यांबरोबर पैठणला जाऊन आले.
जुनं गाव-वाडे, पैठणी विव्हींग सेंटर आणि नाथसागर असा प्रोग्रॅम होता.
उत्तम प्रतीच्या हैन्डलूम्सवर बनलेल्या रेशमी आणि ख-या जरीच्या पैठणी विणण्यासाठी इथले ढालकरी कुटुंबीय सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या नजाकतदार आणि इंट्रिकेट विणकामाची दखल राज्यीय आणि राष्ट्रीय पातळीवर वारंवार घेतली गेली आहे.
एकदम साधं कुटुंब. व्यवसायाचाही फार मोठाव्याप नाही. पण हातात जादू आणि मेहनतीची तयारी. पटकनी मनात बसेल अशी पैठणी पन्नास हजारांपुढचीच. अजून तरी जूनीच डिझाईन्स प्राधान्याने करण्यात येतात. बांगडी मोर, साखळी मोर-पोपट, अस्वली, आकृती ही पारंपरिक नक्षीच पदर,काठांवर जरीने आणि उठावदार रेशमाने उतरवली जाते. साधारण मध्यम डिझाईन असेल तर रोज तीन ते चार इंचच साठी विणून होते. भरगच्च नक्षीकाम असलेला रंगबिरंगी पदर करायलाच एखाद महिना लागतो. 
बहुतेक साड्यांचा कच्चा माल सारखाच असतो पण पोतावरील मेहनतीमुळे, कलाकुसरीमुळे पैठण्यांच्या किंमती महाग होत जातात. चटपटीत भारतीय रंग जरतारी काठ-पदर-बुट्टे..आणि नक्षीदार वेलींवरचे चित्तचोर मोर -पोपट..कुणालाही हव्याशा वाटतील अशाच या राजस पैठण्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाट वाकडी करुन पैठणला येऊन खरेदी करायला काहीच हरकत नाही. नव्हे साडीप्रेमी महिलांची ती नैतीक जबाबदारीच आहे असं मला वाटतं. आता ढालकरींची नवी पीढी पण याच व्यवसायात उतरली आहे ही फार चांगली गोष्ट आहे.

No comments:

Post a Comment