Monday, 8 January 2018

धागा..धागा..अखंड विणू या.

नुकतीच परदेशी पाहुण्यांबरोबर पैठणला जाऊन आले.
जुनं गाव-वाडे, पैठणी विव्हींग सेंटर आणि नाथसागर असा प्रोग्रॅम होता.
हैन्डलूम्सवर बनलेल्या उत्तम प्रतीच्या रेशमी आणि
ख-या जरीच्या पैठणी विणण्यासाठी इथले ढालकरी कुटुंबीय सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या नजाकतदार आणि इंट्रिकेट विणकामाची दखल राज्यीय आणि राष्ट्रीय पातळीवर वारंवार घेतली गेली आहे.
एकदम साधं कुटुंब. व्यवसायाचाही फार मोठा व्याप नाही. पण हातात जादू आणि मेहनतीची तयारी. पटकनी मनात भरेल अशी पैठणी पन्नास हजारांपुढचीच.
अजून तरी जूनीच डिझाईन्स प्राधान्याने करण्यात येतात. बांगडी मोर, साखळी मोर-पोपट, अस्वली, आकृती ही पारंपरिक नक्षीच पदर,काठांवर जरीने आणि उठावदार रेशमाने उतरवली जाते. साधारण मध्यम डिझाईन असेल तर रोज तीन ते चार इंचच साडी विणून होते. भरगच्च नक्षीकाम असलेला रंगबिरंगी पदर करायलाच एखाद महिना तर सहज लागतो. 
बहुतेक साड्यांचा कच्चा माल सारखाच असतो पण पोतावरील मेहनतीमुळे, कलाकुसरीमुळे पैठण्यांच्या किंमती महाग होत जातात.
चटपटीत भारतीय रंग, जरतारी काठ-पदर-बुट्टे आणि नक्षीदार वेलींवरचे चित्तचोर मोर -पोपट..
अहाहा...कुणालाही हव्याहव्याशा वाटतील अशाच या राजस पैठण्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाट वाकडी करुन पैठणला येऊन खरेदी करायला काहीच हरकत नाही. नव्हे साडी प्रेमी महिलांची ती नैतीक जबाबदारीच आहे असं मला वाटतं. त्यांच्याकडच्या पैठण्या आपल्याला आवडल्यातर उत्तमच नसता आवडीच्या रंगसंगती, डिझाईन प्रमाणेही ढालकरी कुटुंबीय पैठण्या बनवून देतात.

पैठण.
गोदावरीकाठी वसलेली एकेकाळची भरभराटीची व्यापारपेठ. खूप उलाढाल्या होत इथे. पेशवे इथल्या सावकारांकडनं व्याजी पैसे उचलत. तिन मजली दगडी-विटी वाडे बघूनच त्याकाळच्या वैभवाची खात्री पटते. मराठवाड्यातल्या तेरचा कपडा व इतर माल पैठण मार्गे भरुचला जात असे आणि तिथून समूद्रमार्गे अरबस्तान, ग्रीसला जात असे. धार्मिक वैशिष्ट्या बरोबरच पैठण आध्यात्मिक आणि व्यापारी दृष्टीनेही महत्वाचं ठिकाण होतं. दुर्दैवाने सध्या जरा सगळ्या बाजूने उतरती कळा लागली आहे
आता ढालकरींची नवी पीढी पण याच व्यवसायात उतरली आहे ही फार चांगली आणि उमेदीची गोष्ट आहे.
मी इथे त्यांचा नंबर देत आहे. जमल्यास त्यांच्या छोटेखानी युनिटला जरुर भेट द्या, कीती मान-पाठ मोडून विणकाम चालतं ते बघा. आवडल्यास निदान एकतरी पैठणी खरेदी करा.
नसता मोठी नामांकित दुकानं आहेतच या पैठण्या आवाच्या सव्वा किमतीला विकायला तयार.

No comments:

Post a Comment