हिवाळी संकट.
भरपूर थंडी पडली की तुपा-लोण्याचे गोळे खायची स्वप्न पडतात आणि प्रत्यक्षातही येतात. रतीबाच्या दुधाची प्रतही सुधारते या दिवसात. साहजिकच साय खूप जमते. मग साय जमवणं, विरजण लावणं व नंतर त्या साई-दह्याला घुसळून लोणी काढणं. मग लोणी कढवून रवाळ साजूक तुप काढणं..एक मस्त प्रोसेसच असते आठवडाभर चालणारी.🤗
पण थंडीचा कडाका वाढला की बेताचं आंबट दही मिळवणही मुश्कील होऊन जातं. तसचं ते रवीने घुसळलेल्या दह्यातून लोण्याचे गोळे उचलणही फार कठीण होतं. म्हणजे रवीने घुसळलेल्या दह्याला लोणी खूप येतं पण ते लोणी ताकापासून एकजीनसी असं मोकळंच होत नाही. ताकाचं भांडं, रवी, हात, ओटा, अंगावरचे कपडे ताक-लोण्यामुळे सुस्नात होतात पण लोण्याचे लपके काही हाती लागत नाहीत. मग कोमट पाणी,गार पाणी,फ्रिजमधे ठेवणं असे उपाय करावे लागतात. पण तेही फोल ठरतात. मग हात बरबटवत हळूहळू ते कणीदार लोणी जमवायचा, कढवायचा खेळ संपवावा लागतो. माझं बरय, मी त्या लोणेरी हातांनी हात-पाय-चेहरा लगेच चोळून घेते. असो.😇
आमचे बाबा स्वतःहून रवीनेच फार ऊत्साहाने साय घुसळायचे आणि पाणी टाक टाकून ताक पांचट करुन ठेवायचे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात लक्षच ठेवावं लागायचं त्यांच्या कडे.🙄
मलाही तशीच आवड आहे. लोणी काढायला मिक्सर तर मी आजपर्यंत वापरला नाही. चारजणांच कुटुंब पण चार रव्या आहेत माझ्याकडे. मुळात लाकडी वस्तुंची आवड आणि गेलं कुठल्या तरी जत्रेत की काहीतरी आणायचच हा खाक्या. एका लाकडात कोरलेली रवी जड पण दमदार असते. रवी बनवताना लाकूड कुठलं वापरायचं याचं ही काही शास्त्र असावं नाही ?🤔
पुर्वीच्या काळी तिनचार फुटी नक्षीदार, दोरखंड गुंडाळला जाईल अश्या देखण्या लाकडीच रव्या असतं. दह्याचे डेरे असतं. आणि घरा बाहेरच्या ओट्यावरच बसून गृहिणी लोणी काढायची. लोण्याचा टोपलंभर लपका घरात आणि ताकाचा डेरा दारात. मग गरजू ताक मागून नेत असत. ताकाला जाताना भांडं लपवू नये अशी म्हणही आहे. असो.☺️
तर जुन्या पध्दतीनेच रवीने विरजलेल्या दह्यापासून ताक काढणं हे फार थेरपेटीक वाटतं मला. आमच्याकडे येणा-या RYE'S ना हे काम मी आवर्जून देते. तेही फार आवडीने हे काम करतात. कौतुकाने घरी कळवतात. भारतीयांच्या तुप खाण्याच्या कथा तर जगप्रसिध्दच आहेत. तसचं आपल्या कृष्णाच्याही शिंक्यातलं दही-लोणी चोरुन खायच्याही. 😀
खरंच त्याकाळी साय-दही-लोणी कसं सांभाळत असतील ? मातीच्या मटक्यातलं दही-लोणी शिंकाळ्यावर म्हणजे हवेशीर उंचीवर लटकवून निगुतीने सांभाळलं जात असेल का बरं?🤔
पण काहीही म्हणा कहरी उन्हाळा सोडला तर रुम टेंप्रेचरच्या मटक्यातल्या शुभ्र, कवड्या दह्याला तोड नाही.😋
उत्तर भारतात बहुतांश लोकं सायीला विरजण न लावताचं साय गरम करुन फैट मोकळी करुन घेतात आणि त्यालाच तुप म्हणतात. मीही एकदा करुन पाहिलं आहे तसं. डेयरीतल्या बेचव तुपासारखं ते तुप लागतं.
ना आपल्या म्ह-हाटी रवाळ,कणीदार आणि सुगंधी-साजुक तुपाला जगात तोड नाही, ना ही रवीने सायदही घुसळवत अलगद लोणी ताकापासून वेगळं करण्यालाही..बघण्यालाही.🤗
No comments:
Post a Comment