नाजूक चणीची, खुटखुटीत अशी खेड्यातली एक मध्यवयीन महिला.
वैजापूर तालुक्यातील एका छोट्या खेड्यात रहाणारी. काल नव-याला जराशी रक्ताची उलटी झाली म्हणून वैजापूर, शिर्डी असं फिरुन औरंगाबादच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एडमिट केलय. कालपासून पहाते आहे तिला. माझ्याही सासूबाईंना सध्या वार्धक्य संबधीत व्याधींसाठी कालच एडमिट केलय.
आज मी घरातलं आवरुन दवाखान्यात आले तर लगेच माझ्या चौकश्या करत भळभळता संवाद करु लागल्या.
दोन मुलं, एक मुलगी..मालक आत आयसीयुत.
जावाई फारच नांगट(?) हाई मपला. लगी लेकीला माहेरी धाडतच न्हाई. वावरात लई कामाला लावीतो.
गंज वीस वर्स झाली लगनाला. दोन लेकरं हाईता. पण ह्योच असा नांगट हाई. कुट्ट बी लेकीला पाटवीत न्हाई. माहेरालाबी येक रातबी ठेवीत नाई. मपल्या मालकांनी,पोरांनी लई समजावीलं पन ह्यो सुदरतच न्हाई बगा.
लगीन ठेरतानाच पावने म्हन्ले होत्ये सासू खट हाय आन पोरगं बी जरा ह्येच हाय. मालक म्हन्ले वावर हाय,घर हाय..पोराचा टैम सरला की व्हईल सुदं. आता विस वर्स झाली पन याचा टैम काई सरचना. मपली पोरं बी लय समजावतेत त्याला..आरं आमच्या बाया बी माहेरी जात्यात, लगनाला जात्यात..तुबी पाटवीत जाय. आमची बी यकच भैन हाये.
पन ह्यो ऐकचना. कदी दिले सास-याने पैशे आन मपली ल्येक गेल्यी कदी लग्नाला की लगी तिला मारीतो. लई प्येतो बी. पोरीच्या जीवाला तं लगी बश्ण माहितच न्हाई. दिवसभर लगी कामातच -हाती. घरात बी, वावरात बी.
आता बाईच्या जातीला वाट्ते नव्हं लगनाला जावं, जत्रेला जावं, माहेराला जावं..हाय की नाई ?
काय करता म्याडम..जावई लगी खट निगाला.
मपला जीव लगी तिळ तिळ तुटितो वो पोरीसाटी.
पन काय करता ? पोरगी द्येऊन बशीलो. आता तं पोर्गी बी म्हनती येव्ढी वर्स ग्येली आता पुड्ची बी सरतीलं.
सगळं चांगलय मपलं पन ह्यो पोरीसाटीच जीव जळीतो वो...
माझ्या जवळ एकासूरात,एकादमात एक खोल जखम भळभळ मोकळी झाली. खरंतर आतमधे त्यांचा नवरा आयसीयुत आहे पण बाहेर बाईंच्या जीवाला घोर पोरीचा लागलाय.
कालची फक्त नजर ओळख आणि आजचं आयसीयुमधल्या वेटिंग लाऊंजमधलं सहप्रवासीपण. पण बाई इतक्या soulmate सारख्या बोलक्या झाल्या की मी चकीत झाले. एका टप्प्यावर ति-हाईतांजवळ अशी दुःख जास्त निर्झरासारखी खळाळत प्रवाही होतात का ?
खेडोपाडी, घरोघरी लग्न झालेल्या मुलींच्या बहुतांश अशाच कथा आहेत. खरोखर अजूनही बहुतांशाच्या बाबतीत लग्न म्हणजे लॉटरीच आहे. पुरुषांच्या या अशा बेमुर्वत कर्तृत्वामुळे लाखों-करोडो तेजस्वी आणि सृजनशील विद्युलता कुठे नाहीशा होतात कळतही नाही.
No comments:
Post a Comment