हिरण्य सुरु केलं तशी विचारांना वेगळीच दिशा मिळत गेली. स्वतःही पलीकडचा विचार करु लागलो. शहराच्या भरभराटीसाठी आपलं काही चर्चा मुटभर योगदान देता येईल का असंही मनोमन वाटू लागलं. ठरावीक चारदोन प्रस्थापित जूनी पर्यटन स्थळं सोडली तर पर्यटकांना, स्थानिकांना आकर्षण वाटेल असं नव्याने काही फार घडत नव्हतं. मग आमचा आवाका आणि उपलब्धता बघत एकेक सणं-इव्हेंट्स म्हणा यांना परत वेगळ्या स्वरूपात आणि सर्वांना सामावून घेणा-या रुपात हिरण्यलाच साजरे करु लागलो. त्यातूनच हिरण्य हुरडा(१९९९), होळी(२००७-८), अभिजात महाराष्ट्र(२०१४) असे कार्यक्रम सुरु झाले-केले.
तर गेल्या चारेक वर्षांपासून शहरवासीयांसाठी म्हणून पतंगोत्सव सुरु करायचा मानस होता. त्यासाठी पहिली ट्रिप हैद्राबादच्या पतंगोत्सव बघण्यासाठी ऐन संक्रांतीत केली. आयडिया पटलीच होती पण हुरडा फेस्टिव्हलच्या धबडग्यात दुसरं काही नवीन सुरु करणं कठीणंच वाटायचं.
तरीही मागच्या संक्रांतीला धावतपळत पण अहमदाबादचा दणकेबाज आणि डोळे दिपवणारा 'उत्तरायण' हा महोत्सव बघून आलो. दुरदृष्टीचे राज्यकर्ते मनात आणलं तर काय करु शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता बारमाही खळखळणारी (एकेकाळची कोरडी ठाण-रेताड) साबरमती. तिच्या दोन्ही काठांना चारेक किलोमीटरपर्यंत अत्यंत देखणा आणि धोरणीपणाने डेव्हलप केलेला बांधीव रिव्हरफ्रंट. एका काठाला नवं अहमदाबाद तर दुस-या काठाला जूनं शहर. मधे खळखळ साबरमती आणि तिचे दोन्ही प्रशस्त काठ-घाट सुबकपणे बांधलेले. निटसं झाडी, लायटिंग.. वेगवेगळे स्वच्छ-नेटके टप्पे आणि त्या ऐसपैस टप्प्यावर साजरा होणारा रंगबिरंगी पतंगोत्सव'उत्तरायण'. १३ जानेवारीला संपणारा हा उत्सव एक आठवडा आधीच सुरु होतो. एक मोठी जत्राच असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशी-विदेशी पर्यटक,स्थानिक लोकं या काळात खास पतंगोत्सव बघायला,पतंग उडवायला रिव्हरफ्रंटला हजेरी लावतात. संध्याकाळी कल्चरल कार्यक्रम असतात. बाकी खाणंपिणं, हस्तकला दुकानदारी असली नेहमीची मौज तर असतेच. हे सगळं नवीन शहरी भागात होतं तर रात्री जून्या शहरातनं हजारोंच्या संख्येने आकाशात उडते दिवे सोडण्यात येतात(१३ जानेवारीलाच फक्त). अत्यंत मनोहारी दृश्य असते ते. म्हणजे दिवसा निळ्या नभी हजारोंनी पतंग उडतात तर रात्री हजारोंनी दिवे उडतात. संपुर्ण भारतात आणि जगात सुध्दा हा गुजरातचा पतंगोत्सव दुमदुमत आहे आणि राहीलही.
या निमित्ताने पर्यटन वाढतं,इकॉनॉमी सुधारायला हातभार लागतो. समाजात एकी आणि चैतन्य निर्माण होतं..फायदे बरेच आहेत.
तर आपल्या औरंगाबादेत असं काही सुरु करता येईल का असं सारखं वाटायचं. शासन दरबारी म्हटलं तर गोष्टी होतात म्हटलं तर होतही नाहीत.
आता हेच बघा ना. गेले वीसेक वर्षांपासून वेरुळ महोत्सव सुरु होता. कुठला तरी दुष्काळ,भुकंप यामुळे तो सलग ४-५ वर्ष बंदच पडला. मागच्या वर्षी करोडोंचा चुराडा करुन एक अत्यंत सुमार आणि ठणठणपाळी महोत्सव अहमिकेने केल्या गेल्या. यंदा तर होणार..होणार..असं म्हणत, आता प्रशासनाच्या हातात वेळ कमी म्हणून तो कैंसलच केला आहे.
अक्षरशः आमच्या या पर्यटन नगरीला कुणी वाली नसल्यासारखीच शासनाची वर्तणूक आहे.
असो.
तर आम्ही आणि आमच्यासारखे बरेच जणं आपापल्या परीने, समविचारी काही माध्यमं पकडून आम्हाला जे वाटतंय,पटतंय आणि शक्य आहे ते करतोय.
तर या वर्षी पतंगोत्सवाचा घाट घातलाच.
जोडीला महाराष्ट्र टाईम्स हे आमचं नेहमीच माध्यम होतेच.
नेहमीप्रमाणेच वेळ कमी, कामं जास्त, घरच्या अडचणी, रोजचा व्यवसाय सांभाळत एकदिवसीय पतंगोत्सव साजरा केलाच.
जमेल तशी तयारी सगळ्यांनीच केली. प्रिंट मिडिया, सोशल मिडियातर्फे सर्वांपर्यंत पोहंचायचा प्रयत्न केला.
उत्तम ते द्यायचं-करायचं हे तर धोरणंच आहे.
नवीन काही करायच्या आधीची धाकधूक मनात होतीच. वयामुळे ती anxiety हल्ली वाढतच चालली आहे की काय असं वाटतय.
पतंगोत्सवाची वेळ सकाळचे १०- दु. ४ अशी होती.
साडे दहा होत नाही की पतंगोत्सवाचे पहिले उत्साही सहभागी म्हणून पाच वयस्क महिला अक्षरशः किलबिलत आल्या.साधारण वय सत्तरीला पोहोंचणारं. अगदी उत्साहाने तयार होऊन,धम्माल करायची असं ठरवूनच शहरातून रिक्षा करुन आलेल्या हिरकण्याच जणू. संसारीक जबाबदा-या पार पाडून आपलं आयुष्य आता मजेत,आनंदात जगू इच्छिणा-या या बोलक्या महिला काही क्षणातच माझ्या मैत्रीणी झाल्या. जाताना भोगीचा आनंद ख-या अर्थाने भोगून चाललो आहोत म्हणाल्या. जाताना आमच्या पतंगोत्सवाने त्यांना ताजंतवानं आणि तरुण केल्यामुळे पुन्हापुन्हा धन्यवाद दिले. आणि त्याच काय, आलेल्या एकूण एक व्यक्तीने हीच भावना आमच्याजवळ बोलून दाखवली.
अशा वेळी सुरवातीला व्यावसायिक यश पैशातून न मापता कीती सकारात्मक उर्जा आपण निर्माण करतोय, आनंद किती देवू शकतोय हेच फार महत्वाचं असतं.
पतंगबाजीबरोबरचं सणाचे जेवण म्हणून इतर जेवणाबरोबरच बाजरीची तिळभाकरी, खिचडी-कढी आणि मिश्र भाज्यांचा मातीच्या मटक्यात शिजवलेला गुजराती उबाडियु आवर्जून ठेवला होता. उबाडियुलाही लोकांनी दाद दिली.
लहान-मोठे,पतंग उडवणारे-बघणारे सगळ्यांनीच हा पतंगोत्सव मौजमस्तीत यशस्वी केला आणि आमचे, आमच्या आणि महाराष्ट्र टाईम्सच्या संपूर्ण टीमचे श्रम सार्थकी लागले.
No comments:
Post a Comment