बघता बघता गारठलेला हिवाळी जानेवारी संपत आला.
उत्तरायण सुरु झालय. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबरही शिस्तीत गारठले. शिशिरही व्यवस्थीत नांदला.
झाडांनीही मुकाट्याने हिवाळी मरणकळा सोसत,भरपूर पानगळ केली आणि आता नव्या उमेदीने नुतन पालवीकडे डोळे लावून बसली आहे सगळी जेष्ठ वनसंपदा. दिवसभर ऊन अंगावर लेवत बागडणारे पक्षीही कोवळ्या उन्हाच सकाळ-संध्याकाळच वेळापत्रक पाळू लागलेत. जरासं उन तापत नाही कि आभाळानेही निळ्या रंगाशी कट्टी फू करत करड्याशी हातमिळवणी केलेली दिसतेय.
हिरण्यच्या रस्त्यावरचे दोन्ही बाजूचे डोंगर आता पिवळटलेत. रस्ते धुळवटलेत. गवतं, झुडपं कोरडेठाण झालेत. नाही म्हणायला चिवट बाभळी, बोरी, लिंब, वड हातचा हिरवा रंग राखून आहेत.आता पुढचे चारेक महीने तरी एकही ढगरुपी देवदुत या नभी दिसेल याची सुतरामही शक्यता वाटत नाहीये. तरी बरं ऊन्हाने अजून म्हणावं तसं चराचराला किर्रपणे वेठीला धरलं नाहीये.
रस्त्यालगत यावर्षी आम्ही लावलेल्या रोपांचा या जागेतला पहिला उन्हाळा. सहा-यासाठी लावलेल्या कामट्या आणि त्याला बिलगलेली आणि बाहेरुन वाळलेली बाळरोपं फार निगुतीने सांभाळली पाहिजेत आता.
थोडी दुपार चढत नाही की भटक्या जनावरांनी सावलीची जागा हेरलीच समजा.
पावसाळ्यात हिरव्या रंगांनी भुलवून टाकणारं गवत आता पिवळ्या-तपकिरी रंगांनी मोहात पाडतय. एकुणातच सगळ्या आसमंतावर करड्या निळसर आणि पिवळट तपकीरी रंगाचा अलवार साज चढलाय.
दुरच्या डोंगरांवर सैराट ग्लिरीसिडिया जाम फुललाय. ग्लिरीसिडियाचं फुलणं म्हणजे ऊन्हाळ्याची नांदीच असते.
एकक झाड म्हणजे बेतासबात रंग-रुप आणि गुणही. पण याची लॅव्हैंडर कलरची गुच्छी फुलांनी फांदीनफांदी लगडली की फार सुखद दिसतात ही झाडं.
घनदाट प्लॅन्टेशन असेल तर एखादी गुलबट-जांभळी ओढणीच डोंगरावर पसरल्यासारखी दिसते. पण हे नैत्रसूख काही अंतरावरुनच. जवळ गेलं की फर्राटेदार झाड, त्याला आलेली अंदाधुंदी फुलांचे गुच्छ, सुवास वगैरे काही नाही.जरासा भ्रमनिरासच होतो म्हटलं तरी चालेल.
पण ते काहीही असो अजून पुढचे दोनेक आठवडे तरी पळती थंडी, उतावळं ऊन यांचा लपंडावच चालणार आहे. तरी म्हणावस वाटतं राजे जागे रहा गर्मियां आने में ही है.
अक्षरशः ऊन्हाळा म्हटलंकीच पोटात खड्डा पडतो, घसा सुकतो. हातापायाला घाम सुटतो...वगैरे.
ऊन्हाळ्यातला सगळ्या हवाहवासा गारवा कोणता असेल तर येऊ घातलेल्या बारीश की नजदिकीयां.
दारात ऊभ्या असलेल्या हिरवट, ओल्या पावसाळ्याच्या कल्पनेनेच कोरडा, करडा ऊन्हाळा सुसह्य होतो नाही ?
No comments:
Post a Comment