Monday, 29 January 2018

एक ह्रद्य क्षण.


हिरण्यच्या हुरडा फेस्टिव्हलसाठी कुठून कुठून लोकं येतात. नवीन ओळखी होतात. विस्मरणात गेलेली लोकं परत भेटतात. आई-वडीलांच्या आठवणी काढणारेही भेटतात. एकूणच छान वाटतं या सगळ्यांना भेटून. पुन्हापुन्हा जुन्या आठवणी निघतात.
तर काल शहरातील एका नामांकित हॉस्पिटलचा स्टाफ गेट टुगेदरसाठी आलेला.
चाळीस वर्षांपेक्षा जास्त जुनं गायनेकॉलीजचं हॉस्पिटल. नवरा-बायको दोघही नावाजलेले डॉक्टर. माझ्या बहिणीची आणि माझ्या दोन्हीही डिलेव्हरीज इथेच झालेल्या. कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात बाळंतपणा विषयी जिव्हाळ्याच्या आठवणी असतातच. तो दिवस, ती खोली ,ते डॉक्टर्स, तो स्टाफ,
ते चार-आठ दिवस, खूप खुषी-आनंद, कधी चिंता...
All in all we mothers remember everything vividly.

मला पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी आहे. पहिल्या बाळंतपणात आपलं काय-कसं होईल म्हणून चिंता तर दुस-या बाळांतपणात जन्माला येणा-या दुस-याच काय-कसं होईल याची चिंता आणि घरी जो पिटुकला मुलगा आहे त्याचं आता या दवाखान्याच्या आठेक दिवसात आणि नंतरही दोन बाळ जीवांच कसं काय होईल याची चिंता. मला वाटतं मातृत्वा बरोबरच अखंड चिंताही जन्म घेत असाव्यात.
असो.

माझ्या वडीलांच घर हॉस्पिटलच्या जवळ असल्यामुळे पहिल्या वेळेस सगळ्याच गोष्टी आटोक्यात होत्या. पण मुलीच्या वेळेस मुलाची पहिली शाळा नुकतीच सुरु झाली होती. जेमतेम तीन आठवडे झाले होते. शाळा हा प्रकार, तिथली बावरलेली मुलं, रिक्षावाले काका, घरी आईचं नसणं आणि नवीन पिटुकल्या पाहुण्या बरोबर आईचं दवाखान्यात रहाणं. एका जेमतेम तीन वर्षाच्या मुलासाठी हे खूप मोठं स्थित्यंतर होतं. त्यात मुलीच्या आजारपणामुळे माझा तिथला स्टे वाढला. तसं बाबांच घरही जवळच होतं पण दिवसभर कन्हाय तिथे रमायचा नाही. मग आम्ही त्याला शाळेतून डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच उतरवून घ्यायचो. दुपार असल्यामुळे ओपीडी संपून हॉस्पिटल शांत झालेलं असायचं. हा शाळेतून आलाकीच आवाज व्हायचा.सगळे शू..शू..म्हणत दापायचे. मग तो मागे रहाणा-या नर्सेसच्या क्वार्टर्समधे बेधडक जायचा. त्यांचीही शाळकरी मुलं होती. त्यांच्या बरोबरच जेवायचा,
खेळायचा, भाजलेल्या भुईमूगाच्या शेंगा, चॉकलेट्स खायचा.(शेंगा तर अजूनही तुडुंब खातो) तीही सगळी कुटुंब अगदी त्याच्या येण्याचीच वाट पहात असायचे. खुप लाड करायचे त्याचे. एकूणच दवाखान्यातले सगळे दिवस मजेत पार पडले.

तर आज त्या हॉस्पिटलचा सगळा स्टाफ पिकनिकसाठी हिरण्यला आलेला. कन्हाय पण हिरण्यलाच होता. फोन करुन एका ग्रुप फोटोसाठी(माझा मातृत्वी उत्साह) बोलावलं तर,
आई...अग कसला फोटो ? मला काही आठवत नाहिये.
अरे..पण मला आठवतय ना. ये तू पटकन.
आईसाठी आलं ते लेकरु. एक छान फोटो काढला. डॉक्टर दांपत्य, नर्सेस मावश्याही खुष झाल्या. परत जुन्या आठवणी निघाल्या. सगळ्यांनी कन्हायला आशिर्वाद दिले.

आपलं मुल या विश्वात आणताना ज्यांची मदत झाली, सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी आपलं मुल पाहिलं त्यांच आपल्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्व असतं नाही ?

No comments:

Post a Comment