ट्रिंग..ट्रिंग..
ट्रिंग..ट्रिंग...ट्रिंग...
अगं..तो फोन..
ट्रिंग.. ट्रिंग..
आहो..करा तुम्ही तुमची कामं..
अगं पण तो फोन ?
ट्रिंग.. ट्रिंग...
वाजूद्या..वाजल..वाजल आन् बसल गपचीप...
तुम्ही आप्ली करा पूजा..मग काय तं ? होनं..दिवस न्हाई, रात्र न्हाई कधीही आपला वाजतच -हातयं..
चहा पियु देईना का पुजा करु देईना..कामं कमी आन् वाजनंच जास्त म्हन्ल्यासारखं..आहे कीनाई ?
परवाच वसंतपंचमीला सरस्वतीची पुजा सर्वत्र केली गेली. जरा या वर्षी नवीनच सुरु झालाय हा पायंडा. कदाचित सोशल मिडीयाचा परिणाम असेल. तर ते असो.
हल्ली मला कुणाच्याही बोलीभाषेचं, बोलण्याच्या ढबीचं, ठसक्याच भलतच अप्रुप वाटतयं. वेगवेगळ्या प्रांतीय भाषेत आणि वाकप्रचारांनी भरपूर असलेल्या बोली भाषेत सहजपणे बोलणारे कुणी ग्रामीण लोकं दिसले,भेटले की त्यांना किती बोलतं करु आणि नाही असं मला होऊन जातं.
आमचे बरेचसे नातलग मराठवाड्यातले आणि मराठवाडी भाषेत बोलणारे आहेत. पुर्वी जरा हास्यास्पद वाटायचं आणि शहरी चारचौघात तर लाजीरवाणही व्हायचं.
वाटायचं काय हे आपले नातलग अगदी रेटून चारचौघात यायलीस का? जायलीस का असं बोलताहेत ?
आपण चुकतोय हे ह्यांना कळत नाही का ? मग शिक्षणाचा काय उपयोग..वगैरे वगैरे असं बरंच काही वाटून जायचं. तसंच मग त्यांना शहरी त्रयस्थ, शिष्टपणे वागवलंही जायचं.
पण हल्ली अशी मनमोकळी, निर्भिडपणे बोलणारी माणसं भेटली की मला अक्षरशः कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. परत परत त्यांना बोलकं, बोलतं करावसं वाटतं. त्यांचे विचार, भाषा, ठसका, ओठी सहजपणे येणा-या ग्राम्य म्हणी, मला आज वाटणारं त्यांचं-त्यांच्या भाषेचं, बिनधास्त एटिट्युडचं कौतुक, त्यांनी ते हसण्यावारी नेणं इतकं मोहक आणि चित्त चोरणारं आहे ना की हल्ली उठसुठ मला ग्रामीण भागातच फिरावसं वाटतय. तिथल्या सामान्यांशी संवाद साधावा असं प्रकर्षाने वाटतयं. ही माणसं जास्त खरी आणि भाषेला माया लावणारी आहेत असं वाटतय. खरोखर दर दहा मैलावर बदलणारी भाषा म्हणजे दर हजारी वेगळीच मायबोली, वेगळाच हेल-ठसका. Amazingly spectacular repertoire.प्रत्येकाच्या पोतडीतून वेगळेच जादुई शब्द आणि समंजस म्हणी.
अहाहा... देर से आये लेकीन दुरुस्त आये असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटतीये.
आजकाल ती शहरी माणसं तर नकोशीच वाटताहेत. अगदी कुठलाही शहरी-इलाईट कार्यक्रम, प्रवास, लग्न, सभा काहीही असु देत अगदी नकोच वाटतं त्या कडकडीत स्टार्चवाल्या समुहात जायला आणि तीच ती शिष्टाचारी इंग्लिश चिक्की खटखट मोडायला.
त्या उलट ग्रामीण पण थेट व्यक्ती मनमुराद, ऐसपैस भेटतात म्हणून जत्रा, मावंद, भागवत, किर्तनांकडे, खेडोपाडी जाण्याकडे, पैसेंजरच्या प्रवासकडे अगदी डोळे लावून बसल्या जातय हल्ली. आला चांस की नांदेडला पळते. एखादीशी-एखाद्याशी छान गप्पा रंगल्या आणि मधे कुणी आलं तरी वैतागण्या इतकी मी रममाण होते त्या संवादात, मनोमन टिपणं करण्यात.
आता हा संवाद, टिपणं काही फार थोर नसतात पण या लोकांच विनासंकोच मनापासून बोली भाषेत बोलणं खरोखर मनाला रिझवतं,फार आपलसं वाटतं.
आपल्यातलेच आपले ह्रद्य बदल किती थक्क करणारे असतात नाही.
No comments:
Post a Comment