Wednesday, 24 January 2018

मागोवा उबाडियुचा


आमचे नातलग,मित्रपरिवार आणि अगदी चोखंदळ कस्टमर्ससुध्दा हिरण्यला आले की भरपूर गप्पा होतात. विशेषतः हुरड्याच्या सिझनमधे आगटीवर भाजलेला हुरडा, चुलीवरच्या भाकरी आणि खापरावरची हातावर फैलवलेली ऐसपैस पुरणपोळी पाहिली की मग तर विविध प्रांतातल्या वैशिष्ट्यपूर्ण रेसिपीज, बनवायच्या, खायच्या पध्दतींची मनसोक्त चर्चा होते. नवीन गोष्टी कळतात.

तर असच चारेक वर्षांपूर्वी सुरत-वापी पट्ट्यात मिळणा-या उबाडियुची चर्चा झाली.
मोठाले ठोकळे चिरलेल्या कंद भाज्या आणि पापडी काही विशिष्ट मसाले लावून माठात टाकून आगटीवर शिजवायच्या आणि हिरव्या चटणीबरोबर त्या भाज्या-भाजी खायची. हायवेवर ठिकठिकाणी याचे ठेले लागतात म्हणे. खास हिवाळी पौष्टिक पदार्थ.

औरंगाबाद-हिरण्यला पतंगोत्सव करायचं कधीचं घाटत होतंच तर मागच्या वर्षी निश्चयानेच गुजरातचा पतंगोत्सव बघायला अहमदाबादला निघालो. व्हाया वापी ब्रेक जर्नी केला. वेळ कमीच होता हातात. कसही करुन चौदा तारखेला अहमदाबाद गाठायचच होतं.वापीच्या नातलगांच्या उबाडियु खाऊन-बघून जायच्या आग्रहाला मनात असूनही बळी न पडता पतंगोत्सवाच्या आशेने पहाटेच वापी सोडलं.
सकाळची हिवाळी वेळ. हमरस्ता पण शांत. ठिकठिकाणी उबाडियुचे ठेले लागलेले पण फारच सकाळ असल्यामुळे सगळे ठेले निपचित होते. अगदी दारी येऊन उबाडियु न खाता जाणं पटत नव्हत पण इलाज नव्हता. शेवटी एका ठेल्यावर आगटीची धुगधुगी दिसली आणि थांबलोच. मोडकं तोडकं बोलत एक प्लेट उबाडियु घेतला, तिखटजाळ चटणीबरोबर संपवला. फारसा काही पटला नाही हा उबाडियु.
काय काय टाकलय याची जमेल तशी फुटकळ चर्चा त्या ग्रामीण ठेलेवालीशी केली आणि निघालोच.
पुढचे दोन दिवस अहमदाबादेत घालून परतीला लागलो. आम्ही सहसा ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने परतत नाही. परतताना सापुतारा रेंजमधला रस्ता घेतला. अगदी गुजरात सोडायची सीमा लागली आणि रस्त्यालगत एक आगटी पेटलेली दिसली. उबाडियु शिजयलाच ठेवला होता. जरा हिंदीच टिपणही जमलं. काय, कसं करतात, मसाले कुठले वापरतात हे विचारुन घेतलं आणि उबाडियु न खाताच निघालो. मंद आचेवर उबाडियु शिजायला निदान तासभर तरी लागतो म्हणे.

हिरण्यला आल्यावर उबाडियुच्या दोन-तीन ट्रायल्स घेतल्या. त्या व्यवस्थित जमल्या. मग फ्रोझन मासेही असेच शिजवून पाहिले तेही जमले. फ्रोजन असल्यामुळे जरा पाणी-पाणी झाले पण प्रयत्नशील राहिल्यास नक्कीच मस्त जमतील.

मग मागच्या वर्षी होळीनिमित्त हे तेल विरहितच हेल्थ फुड 'उबाडियु' जेवणात ठेवलं. लोकांना आवडलही खूप.
यावर्षी झटपट पतंगोत्सव ठरला. मग तर उबाडियु हवाच. परत एकदा प्रयोग केला. तोही जमला. तर यावर्षीच्या पतंगोत्सवात उबाडियु आवर्जुन ठेवला. तोही फार लोकप्रिय झाला.

साधारणतः संपूर्ण भारतात संक्रांत-उत्तरायण साजरं केलं जातं. सण साजरा करण्याच्या पध्दती विविध आहेत पण एक गोष्ट सगळीकडेच आहे ती म्हणजे बाजरी आणि मिश्रभाजी खायची पध्दत.
महाराष्ट्रात, गुजरातेत, दक्षिणेत, उत्तरेत या दिवसात मिश्र भाज्यांची भाजी खायची पध्दत आहेच आहे. उबाडियु हा त्यातलाच प्रकार आहे. थोडंफार उंदियोशी साधर्म्य असणारा तरीही वेगळा प्रकार आहे.

अख्खी सुरती पापडी, बटाटे-रताळू आणि एका जांभळट कंद मुळ्याच्या ठोकळा फोडी घेऊन,धुवून त्याला हि. मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, ओवा, धणेपावडर, मीठ, लिंबू चोळून ठेवायचं. मग एका स्वच्छ मध्यम माठाला आतून जाडथरात गवत लावायचं(आम्ही मक्याची पानं लावली..सेफ आहेत)मग माठ ब-रापैकी गच्च भरेपर्यंत हे भाजी मिक्स टाकायच, परत गवतानी-मकापानांनी तोंड दाबायचं कडेनी सिल्व्हर फॉईलने तोंड बंद करुन एका खोलगट आगटीत हा माठ उलटा ठेवून(तोंड खाली) त्याच्या बाजूनेही जरा गोव-रा लावून मंदपणे या भाज्या अंदाजानेच शिजवून घ्याव्यात. अंदाजे वीस-तीस मिनिटं लागतात.(आमच्या हुरड्याच्या आगट्या जास्त खोलगट आणि प्रखर असतात)आगटीवरचा माठ बाजूला काढून तसाच दहा मिनिटं दबू द्यावा.
फॉईल फोडली की मसाल्यांचा अगदी घमघमाट सुटतो. हलक्या हाताने प्लेटमधे दोन डाव ही तेलविरहीत, वाफेवर शिजलेली चटकदार भाजी आणि सोबत हि.मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची डाळं घातलेली हिरवी चटणी. थंडीत एकदम बहारदार लागतो हा गरम आणि झणझणीत उबाडियु.

आम्हाला पापडी मिळवणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही गोड मटार शेंगा,तुरीच्या शेंगा, बटाटा, रताळू,फ्लॉवर, गाजर, वांगे या भाज्या वापरल्या. मसाला आणि परफेक्ट शिजणं जमलं की काहीही छान लागतं. तरीपण मटार-तुर शेंगा पटकन फुटतात आणि वांगे जरा जास्त शिजतात. एकदा टेक्निक जमलं की व्हेरियेशन काहीही करता येईल. जरुर करुन बघा.

हुडहुड्या थंडीत गोव-या, कोळसा, काटक्यांच्या खरपूस जाळावर माठाचा वास अंगात भिनवत शिजणारा उबाडियु बघूनच पोट भरतं.
व्यक्तीशः मला हा प्रकार साईड डिश म्हणून कींवा स्टार्टर म्हणून जास्त आवडला. तळकट स्नैक्स् पेक्षा हा नावीन्यपूर्ण प्रकार कधीही छानच.
नेटवर याची माहिती बरीच आहे. गैसवर पण करताना दाखवतात. पण आगटीका मजा ही कुछ और है. उबाडियुला उंबाडियु पण म्हणतात.

No comments:

Post a Comment