Friday, 22 December 2017

Know thy body.

Know thy body.

गेली चाळीस वर्ष झाली मी पित्त प्रकृती आणि पित्ताच्या अटॅक्सचा सामना करत आहे. शाळकरी वयापासूनच मला हा त्रास सुरु झाला. या काळात मी साधं वरण(फोडणी न दिलेलं) फार खायची. आणि लहानपणापासूनच मी चर बकरी आहे.

आर्ट स्कूलला गेल्यानंतर रात्र-रात्र जागत रेडियोवर, टेप रेकॉर्डरवर गाणी ऐकत असायमेंटस पुर्ण करत असे. गणपती उत्सवात नाटकातही भाग घेत असे. नाटकांची प्रैक्टिस रात्री चालायची. या सगळ्या जागरणाचा परिणाम म्हणूनही हे पित्ताचे अटॅक्स नियमित येत असत. काही तरी चरबर खाल्याचं निमित्त होई आणि जे पहाटेपासून डोकं दुखणं सुरू होई ते ब-याच उलट्या होऊन सगळं पित्त बाहेर पडेपर्यंत थांबतच नसे. अगदी जीव जायची वेळ यायची त्या घणघण डोकं दुखण्यानी आणि आतडी पिळवटणा-या उलट्यांनी. साहजिकच कॉलेज, नाटकाची प्रैक्टिस बुडवावी लागायचीच. पण दुस-या दिवशी मी इतकी फ्रेश असायची आणि तजेलदार दिसायची की कुणाला खरंच वाटायच नाही की काल मला इतकं बरं नव्हतं म्हणून. त्यांना खोटंच वाटायचं माझा टवटवीत चेहरा बघून. नेहमीचच झाल्यावर  हळूहळू ही तब्येत माझ्या पचनी पडली. थोडंफार डोकं दुखलं की एनासिन घेऊन दुखणं काही काळ तरी थोपवायचं पण असे दोनेक आठवडे गेले की मग ते म्हणतात तसं last straw सारखं काही तरी चरबर खाण्याचं, उन्हाचं, जागरणाचं निमित्त व्हायचं आणि यायचाच एकदिवसीय तुफानी पित्ताचा अटॅक.
मग चेह-याला,भिवयांना,गालांना झुणझुणणारं व्हिक्स चोपडायचं, गरम वाफ घ्यायची, हॉट वॉटर बैगने डोकं शेकत दुःख कमी करायचा प्रयत्न करायचा. पण काही केल्या पित्त पुर्णतः बाहेर पडे पर्यंत जिवाला नाहीच शांतता मिळायची. अगदी मासिक पाळीसारखेच हे अटॅक्स नियमित येत. हळूहळू माझ्याही हे पचनी पडलं. मी पण मग जरा सावध व जागरुकपणे वागू लागले. पण मग हे अटॅक्स वर्षातून चारेक वेळा तरी येऊच लागले. तेही मी सहन करायची. पण मग मला मुलगा झाला आणि माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला आजारी पडता येणार नाही. आपल्याला अटॅक आला तर आपल्या मुलाकडे कोण बघेल याची एक वेगळीच काळजी आईपणाच्या आहेरात आली. साधारण या वयात,काळात बाहेर खाणं, उशीरा जेवणं सतत होत असायच. म्हणजे इतकं की मुलांच्या आजारपणातलं जागरण म्हणजे माझा अटॅक ठरलेलाच.

कंटाळून मग आयुर्वेदिक उपचाराकडे वळले. नांदेडचे प्रसिद्ध डॉ. कट्टी तेव्हा औरंगाबादला प्रेक्टिस करायचे.
त्यांना सगळी हिस्टरी सांगितली. कधी आणि कुठल्या कारणाने माझं पित्त खवळेल याचा नेमच राहिला नाही हे सांगितलं. प्रचंड डोकं दुखतं,थंडी वाजून येते,
हाडनहाड खिळखिळं करत इतक्या उलट्या होतात की मी काय सगळ्या नातलगांनी देखील माझ्या पित्ताचा धसका घेतलाय. डोकं तर घण पडताहेत असं दुखतं.
त्यांनी सांगितलं तुमचं शरीर सध्या त्या नेहमीच्या दह्याच्या भांड्यासारखं झालयं. काही काळानंतर दह्याच्या भांड्यात दही लावताना विरजणाची गरजच पडत नाही इतकं ते भांडच विरजणमय होतं. तसंच तुमचं शरीर या घटकेला झालं आहे. काहीही खा..पित्त होणारच. आणि तुमचा त्रास मला समजतो.
'पित्त खवळणे' या शब्द प्रयोगातच त्या त्रासाची इंटेन्सिटी आहे. समुद्र खवळतो तसंच शरीरातलं पित्त खवळतं. आपल्याकडे आहे या वर इलाज. मग पुढची काही वर्षे मी त्यांची ट्रिटमेंट घेतली. वसंत ऋतूत वमन केलं, नियमित औषधं घेतली. ब-यापैकी आराम मिळाला आणि मलाही माझ्या शरीराचे गुण-दुर्गुण हळूहळू कळू लागले. पथ्य-कुपथ्याच्या बाबतीत मी
ब-यापैकी जागरुक झाले. तरी पण या पित्तापासून माझी पुर्णतः सुटका नाहीच झाली.
अजूनही वर्षातून तिन-चार अटॅक्स येतातचं. त्याचही टाईम टेबल मला आता कळू लागलय.
तेलकट-तुपकट-गोडाधोडाची दिवाळी झाली की नोव्हेंबर-डिसेंबर ठरलेलाच तसंच कहरी उन्हाळी ऊन, आंबा आणि चाट पदार्थ असलं खाणं झालं की जून-जूलैचा महिना देखील ठरलेलाच.
नवीन असताना नवरा काळजी करायचा,मुलही आईचा त्रास बघून बावरायची. Now everyone knows it.
They just leave me alone.
एकदा पित्त खवळलं की त्याला थांबवणं शक्यच नसतं आणि थांबवूही नये.
In a way it's a good thing that body throws out the excess acid-dirt from your body.
म्हणून तर दुस-या दिवशी शारीरिक थकवा सोडल्यास  मी फ्रेश आणि तजेलदार दिसते.

पण या नियमित टाईम टेबलामुळे झालय काय की या काळात कुठे प्रवासाला,कार्याला जायचं असलं की मी धसकलेलीच असते. उगाच परगावी, ठिकाणी ऐटैक आला तर काय ? त्यामुळे व्हिक्स, पेनकिलर आणि उन-वा-यासाठी ओढणीचा ड्रेस has become the integral part of my travel kit.
बाहेरगावी तब्येत बिघडणं म्हणजे आपल्या बरोबर
दुस-यांचाही हिरमोड करणं आहे.
त्यामुळे हल्ली हा पित्ताचा अटॅक आला (एवढ्यात जरा पित्ताचे उमाळे कमी वाटताहेत.. touch wood !) की या त्रासाला वैतागण्या पेक्षा मी खुषच जास्त असते. चला एकदाचं पार पडलं पित्त प्रकरण आता निदान महिनाभर तरी बिनधास्त खायला-फिरायला मी मोकळी. आणि मीच काय घरातले सुध्दा असच व्यक्त होतात हल्ली. आजच जरा माईल्ड अटॅ आला. ते बघून सकाळीच नवरा म्हणून गेला बरं झालं आता एकतीस डिसेंबरला फिरायला जायला आपण मोकळे. नशीब नांदेडला हा त्रास नाही झाला. अर्थात फार कमी वेळा मला हा त्रास परगावी झाला आहे. तरी पण पथ्यावर लक्ष ठेवावंच लागतं. आपलं शरीरही आपल्याला काहीतरी बिघडतय याचे सिग्नल्स देतच असतं फक्त आपल्याला ते जाणवून घेता आले पाहिजेत.
माझ्या पोटातून आवाज येतात, ढेकर येतात, चेह-याची रया जाते आणि पालथं झोपलं की निरुपद्रवी सापांचीच स्वप्न मला हमखास पडतात. या गोष्टी लगोलग होऊ लागल्या की मला समजतंच की yess..The d'day is just round the corner.
आपल्या प्रकृतीची जातकुळी एकदा आपल्याला  समजली की गोष्टी थोड्या सुलभ होतात.
We must keep a tab on our bodys reactions and responses.

माझं हे जीर्ण दुखणं आणि मला असलेली आयुर्वेदाची गोडी यामुळे माझा माझ्यापुरता याचा बराच आभ्यास झालाय असं मला वाटतं. ठोबळपणे शरीराच्या कफ,पित्त आणि वात अशा तीन प्रकृती असतात. प्रकृती धर्माप्रमाणे सहसा रंग-रुप-स्वभाव असतो माणसाचा. आणि ते ब-यापैकी खरं आहे.
आरोग्याच्या ब-याचशा गोष्टी पोट आणि पचन यावरंच अवलंबून असतात. त्यामुळे सुयोग्य आणि सुपाच्य अन्नप्राशन हा फार महत्वाचा घटक आहे आपल्या उत्तम आरोग्यासाठी.
अति आंबवलेले पदार्थ, शिळे पदार्थ, वारेमाप प्रिझर्वेटीव्हज घातलेले बेकरी प्रॉडक्ट्स्, रेडीमेड तळलेले पदार्थ, व्हिनेगर घालून केलेले पदार्थ, डिप फ्राईड पदार्थ, पचायला जड असणा-या मिठाया अगदी टाळायच्याच. तुरीच साधं वरण(तेल-तुप नसलेलं) रात्री टाळणं तर कधीही योग्यच आहे. उशीरा जेवणं, जेवल्यावर लगेच झोपणं या गोष्टी टाळल्यास तब्येत काय वजनही बरंच कंट्रोल होतं.

हे सगळं अनुभवताना एक गोष्ट लक्षात येते की जुन्या राहणीमानातल्या बहुतांश गोष्टी भारतीय तापमानाला,
भारतीय जीवनपद्धतीला अनुसरून योग्यच आहेत. हल्लीच आपण ग्लोबल व्हायच्या नादात काहीही खातो आणि कसही वागतो.

आपल्यासारख्या ऊष्ण देशात शेल्फ लाईफ असणा-या वस्तु टिकवायच्या असतील तर प्रिझर्वेटीव्हज् जास्त प्रमाणात वापरणं गरजेचच आहे. आपली लोणची,मुरांबे आपण जास्तीची साखर-मीठ-तेल वापरुन टिकवतो आणि ती खातोही माफक प्रमाणात.
हल्लीची संध्याकाळची ब्रेड-पावाची, आंबट-चिंबट चाट फारच घातक आहे आरोग्याला. तसच ते फ्रिजमधलं शिळं खाणं. मला तर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलय तुम्ही शिळं खाणं बंद करा अर्धे आजार पळतील.
आपल्याकडे कष्टक-यांच्या घरात आजही दोन्ही वेळचं सगळं जेवण ताजं केलं जातं. सुर्यास्ताच्या आधी जेवणं ही तर भारतीयांची परंपरा आहे. तर सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पध्दतींमागे एक लॉजीक आहे, शास्त्र आहे. ते जर आपण जाणून घेतलं,आत्मसात केलं तर घराघरातल्या ब-याच व्याधींवर नियंत्रण येऊ शकतं.
That's why they say Ayurveda is and should be a way of life.

दिवाळीच गोडधोड, लग्नसराईतलं सैराट खाणं, आमचा हुरडा फेस्टिव्हल, नवलाईचे डिंक लाडु आणि काल रात्रीचा पंजाबी कुटुंबाचा मध्यरात्रीपर्यंतचा अतिरेकी पाहुणचार.
थंड-गरम पेयं,आंबट-गोड-वाफवलेलले-तळलेलले स्नॅक्स, चटपटीत चतुरस्त्र जेवणं..निमित्त बघत पित्ताने बरोबर आज डोकं वर काढलंच.

खरंच आपण शरीरावर फार अत्याचार करतो.
हल्ली घरच्या आणि हॉटेलच्या जेवणात काही फरक राहिलेला नाही. सुस्थितीतील गृहिणींना देखील गृहकृत्यदक्षतेमधे हम भी कुछ कम नही हे दाखवत हॉटेलसारखं जेवण घरी करण्यात फार स्वारस्य आलेलं आहे.
येतील त्या, तितक्या पाहुण्यांच स्वागत वैविध्यपूर्ण ग्लोबल पदार्थांनी करणं फारच कौतुकास्पद झालंय हल्ली. आणि त्यापाई शिळंपाकं, विरुध्द आहार, वातावरणाशी सुसंगत याचा कसलाही धरबंद राहिलेला नाही.
एखाद्या मेजवानीच्या दोनचार दिवस आधीच काही मिष्टान्न-पदार्थ करुन ठेवण्यात कुणालाही गैर वाटत नाही. देशी-विदेशी पदार्थांनी,जिन्नसांनी ठासून भरलेले घराघरातले दोन-दोन मोठ्ठाले फ्रिजेस अक्षरशः कौटुंबिक अनारोग्याचे द्योतकच वाटायला लागलेत.

शहरीकरण, आर्थिक गरजा यामुळे राहणीमानात अमुलाग्र बदल झालाय. गृहिणी देखील नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या आहेत. सतत जून्या वळणाने रहाणं अशक्य आहे. तरी पण भानावर रहात सजगपणे जगणं फार आवश्यक आहे.
उत्तम आरोग्याला पर्याय नाही. तसही पुर्वजांनी म्हणूनंच ठेवलय ना 'जान है तो जहान है', and Health is wealth' म्हणून.

No comments:

Post a Comment