सहसा हिरण्यला राहिलं की आमच्याच परिसरात हळूहळू रमत गमत असा मॉर्निंग वॉक होतो. पण आज ठरवून उत्तरेकडे तलावाच्या बाजूला गेले. एकटीचं. नाही..आमचा बिब्बा आला नं निमुटपणे माझ्या बरोबर.
अगदी निरव पहाट. सुर्यही अजून डोंगरामागेच आहे तरी इकडे लाईटच्या तारांवर असंख्य स्वालो पक्ष्यांची शाळा भरली आहे. मागच्या,पुढच्या तारंतार या ठिपकी पक्ष्यांनी देखणी आणि जिवंत झाली आहे. गुबगुबीत छाती-पोट उगवतीकडे करत पहिली सुर्य किरणं झेलायला सगळे एक कतारसे बसलेले. फारसा आवाज नाही, जागेवरुन भांडण नाही. या नक्षीदार तारांचे कीती तरी फोटो काढले तरी जे नजरेला भावलं ते नाहीच मोबाईलच्या कैमे-यात पकडता आलं. एवढुले चिमणे जिव तरीही आभाळ पांघरत गिरक्या घेतात.
पुढे गेले तर एक मोठी साबर चिवचिवत होती. घनगर्द निवडुंगातून अनेक पक्षी बिनधास्त आत बाहेर करत होते. माझ्या चाहुलीची अडचणच झाली त्यांना.
तशीच पुढे तलावा नजीक जात राहिले तर डोक्यावरुन कोमोरंट पाणपक्ष्यांची माळ उडत गेली. कवायती सारख्या एकजूटीने मोठ्या वळणदार गिरक्या घेत घेत दुरवर पाण्यात-वर अख्खा जथ्था लैन्ड झाला.
धपधब आवाज करत पाण्यात बुड्या मारल्या. जागा बदलत,मासे गटकावत मनसोक्त पोहले, डुंबले. आणि मग सुर्यकिरणांची तिरीप बघत पंख वाळवायला देखील बसले. सुर्याकडे पाठ-पोट करत आल्टुन-पाल्टुन बसत,घोगरे आवाज काढत बसलेले हे मासे खाऊ, मनमौजी कामोरंटन्स 'early bird'वाल्या मासेमार माणसांना बघवले नाहीत. आरोळ्या देत त्यांनी त्यांना उठवलंच. न कुरकुरता त्या सगळ्या कामोरंटन्सनी एक उडान घेतली. परत एखाद्या लयदार रेषे सारखं नजाकतीने उडत अख्ख्या तलावाला दोनेक वळसे मारत ठिपके-ठिपके होत दुरवर मार्गस्थ झाले.
सामुहिकपणे फडफड करत पाण्यावर त्यांच लैन्ड होणं आणि हुरहुर लावत अतिशय रेखीवपणे त्यांच मार्गस्थ होणं. जेमतेम अर्ध्या तासाचा खेळ पण चित्त प्रसन्न होऊन गेलं.
गेल्या तिस-चाळीस मिनिटांपासून निशब्द सोबत करणारा 'बिब्बा' मात्र पंख सुकवणारे हे इंडियन शैग(कोमोरंट) बघून बिथरला आणि त्यांच्या मागे निष्फळ पाण्यात धावला.
बिब्बाच्या ऐवजी जर कुणी माणूस असता तर कीती बोलला असता बरं ?
प्राणी-पक्षी उपजतच शहाणे असतात हं.
हे बघा ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याचे फुटलेले नळ.
जिथे जिथे पाणी वाया चाललय तिथे बुलबुल,साळुंक्या पाणी पिताहेत, अंग ओलावताहेत. लगेच एखाद्या वाळेल फांदीवर बसून पंख साफसूफ करत अंग वाळवताहेत. पक्षी म्हणत असतील काहो पक्षीणीला की आज जुम्मा है इसिलीये नही नहाना है म्हणून ? म्हणजे उगाच मनात विचार आला.
अगदी साधी जांभळट बेशरमीची फुलं आणि पाण्यातली काटकोळी झुडपं, पण या कोवळ्या उन्हात ती फुलंही अगदी तलम वाटताहेत आणि शेलाटी झाडं कैलिग्राफिक वाटताहेत.
वर आलेला सुर्य हिवाळा असूनही तळपतोय. पाणी तर इतकं चकाकत आहे की सगळे फोटो अंदाजपंचेच काढणं चालू आहे.
परतताना वाळलेल्या काट्याकुट्या, गवत, खडक, झाडं-फुलं, सावल्या आणि किंगफिशर, वेडे राघू, वैग टेलर्स, हळद्या या पक्ष्यांनी खूप मोहात पाडलं पण असंख्य फोटो आणि व्हिडीओज काढल्यामुळे मोबाईल डिस्चार्ज झाला, त्यामुळे वॉकला न्याय देत तरा तरा परतले.
Wednesday, 27 December 2017
Early bird...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment