Friday, 29 December 2017

लोगों को धोका कभी हो जाता है...

आज राजेश खन्नाची जयंती.
सोशल मिडिया अगदी भरभरून वहातय.
आमच्या शाळकरी वयात चित्रपट आणि त्याचा सम्राट म्हणून राजेश खन्नाचच बेलाग राज्य होतं.
खरतर आम्ही प्रेम, प्रेमभंग, वैर, बदले या असल्या भावनांपासून बरेच दुर होतो तरीही राजेश खन्ना दिलो दिमाग पे छाया था हे सत्य आहे.
हे असं वय विसरुन वाटायला लावणं,जादु करणं हेच मला वाटतं सिनेसृष्टीच यश आणि पाया आहे.

माझे आईचे वडील त्याकाळी मराठवाड्यातले नामांकित स्वातंत्र्य सैनिक. विचार आणि आचारांनी पुढारलेले व व्यवसायाने वकील असलेले. माझी आजी कमरेखालून पांगळी होती त्यामुळे तिच्या मेडिकल ट्रिटमेंटसाठी ते दोघही बरेचदा आमच्याकडेच दिर्घ वास्तव्यासाठी रहात असत. त्याच काळात आईचा एक मावसभाऊ पण कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरातच खोली करून रहात असे. तर आजीच्या दवाखान्यातल्या अनेक वा-यासाठी तो मामा बरेचदा मदत म्हणून आमच्याकडे येत असे.
तेव्हा आनंद चित्रपट शहरात लागला होता. कसं ते आता आठवत नाही पण तो मामा,आजोबा,माझी बहिण आणि मी असे चौघच आम्ही या सिनेमाला गेलो. आनंद बघून आमची रडारड झाली असेल बहुधा. पण राजेश खन्नाचा नेहमीचा स्टायलिश एलिमेंट त्या सिनेमात नसल्यामुळे आम्ही दोघीही जरा नाराजही झालो असूत.
परत एखाद वर्षानी राजेश खन्नाचाच 'अपना देश' शहरात लागला.
आम्ही आपला सोईस्कर अर्थ काढला. आजोबा आपल्या बरोबर जर आनंद बघू शकतात तर अपना देश का नाही? दोन्हीतही राजेश खन्नाच आहे की. त्यात पुन्हा आपले आजोबा देश स्वतंत्र करायला हिरिरीने लढलेले स्वातंत्र्य सैनिक. सिनेमाचं नावही अपना देश.
झालं आम्ही हट्टच धरला आणि आजोबा व आम्ही दोघी गेलो ना अपना देश बघायला. बहुदा आनंदचा अनुभव आणि सिनेमाच नाव बघून तेही फसले असावेत.

स्टाईल मारु राजेश खन्ना, फटाकडी मुमताज आणि फोडणीला गरीब-श्रीमंत-अन्याय..वगैरे. आम्ही भलतेच रमलो. पण जेव्हा राजेश-मुमताजचा झगमगाटी, नाटकी असा 'दुनिया मे लोगोंको धोखा कभी हो जाता है' हा सेमी कॅब्रे असणारा नाच-गाणं सुरु झालं आणि आजोबा वैतागले आणि भर थेटरमधे म्हणाले..हे असलं तुम्ही बघता का आणि मलाही बघायला आणलं का ?
चला घरी. त्यांचा संताप संपे पर्यंत गाणं,नाच संपला. सिनेमा पुर्ण पाहिला. घरी आलो. आल्या आल्या त्यांनी आईला जागरुक केलं आणि यापुढे आम्ही हट्टाने कुठले सिनेमे पाहतो यावर जातीने लक्ष ठेवायला सांगितलं.

मला वाटतं त्याकाळात बॉबी, ज्युली, सत्यम् शिवम् सुंदरम् आणि फिरोज खानच्या काही चित्रपटांसाठी घरुनच फार तगडी सेन्सॉरशिप असायची. फिरोज खानचे चित्रपट सोडल्यास बाकी तिन्ही चित्रपट बघण्याच्या,बघू देण्याच्या रोचक, रंजक कथा पन्नाशीतली प्रत्येकच व्यक्ती सांगू शकेल इतकी समाज घातक हवा त्या चित्रपटांनी निर्माण केली होती.
असो वक्त वक्त की बात रहती है.

पण गंमत काय झालीये की हे गाणं ऐकलं की मला आता स्वातंत्र्य सैनिकच आठवतात इतका धोका त्या गाण्यानी-नाचानी मला दिलाय.
अहो माझं काय घेऊन बसलात ?
त्या बेगडी पण आसक्त स्टारडमने राजेश खन्नालाही अपरिमित धोका दिलाय.

No comments:

Post a Comment