सध्या हुरडा फे्स्टिवल फक्त हिरण्यलाच नाहीतर सगळीकडे जोरात सुरु आहे.☺️
रस्त्यालगत ज्यांची शेती, धाबे आहेत ते सगळेजणं हुरडा विकतात हल्ली.
सतत दिर्घकाळ ताजाच हुरडा मिळण्यासाठी टप्याटप्याने बियाणं पेरलं जातं मग बाकी सगळा खेळ पावसावर अवलंबून. पण यंदा शेतक-यांचा होरा चुकला आणि मागचे काही चारेक दिवसांपासून आणि पुढचे आठ-दहा दिवस हुरड्याचं खूप शॉर्टेज आहे.🤔 छोटेखानी व्यवसाय तात्पुरते तरी बंदच झाले आहेत. निदान काही दिवसांसाठी तरी.
मस्त थंडी पडली आहे. सुट्ट्यांची खिरापत आहेच जोडीला. नववर्षाची चाहूलही आहे. एकुणच हिरण्यवर बराच लोड येत आहे. सतत चौकशांचे फोन वाजताहेत. व्यक्तीशः मला जरा वैतागल्यासारखं होतय. कीती तेच ते बोलणार ? घरातली कामं करायला, फेबूवरच्या पोस्टींचा विचार करायला वेळ नाही असं होतयं.
सतत कुणी ना कुणी पाहुणे, व्हिआयपीज हिरण्यवर येतात. त्यांना अटेंड करणं..थोडक्यात हा पंधरवाडा तर अक्षरशः हुरडामय होतो. उसंत अशी नाहीच मिळत.
असो. व्यवसायातून डोकं वर काढायलाही वेळ नसणं हे प्रगतीचच लक्षण आहे नाही का ?
So no more kurkur.🙄
साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी हुरडा म्हणजे फक्त हिरण्यलाच असायचा. वीकेंडला इतकी गर्दी असायची की रविवार म्हणलं की एक रणकंदनच असायचं. मैनेजमेंट बघताना फार नाकीनऊ यायचे सगळ्यांच्याच.
मुलं लहान असताना अगदी सुरवातीच्या काळात तर आम्हाला अनुभव नसल्यामुळे फारच तारांबळ उडायची हुरडा फेस्टिव्हलमधे.
सकाळी लवकर उठून भराभर बटाटा-पालेभाज्यांच्या पराठ्यांचा नाश्ता करायचा. तेच मुलांसाठीचं जेवण म्हणून बांधून घ्यायचे. मुलं, त्यांचं थंडी-वा-याचे कपडे, थोडीफार आभ्यासाची पुस्तकं, वेळ प्रसंगी आपली तिथल्या स्वैपाकघरात मदत व्हावी म्हणून घरातलंच हात बसलेलं सोलाणं, कटर आणि पोळपाट लाटणं न विसरता हिरण्यला घेऊन जायचं. कस्टमर्स यायच्या आधी पटापट परिसरातली, वॉशरुम्समधली सफाई फेरफटका मारुन बघून, मनाजोगी करुन घ्यायची.
सलाड्सचा एक लॉट काढून द्यायचा आणि नंतर बुफेवर जातीने लक्ष ठेवत स्वतः सर्व्हिस द्यायची. स्वतः उभं राहिल्याने चांगला-वाईट रिस्पॉन्स इंस्टंट कळतो.
साधारणतः पब्लिक बारा-एक वाजेपर्यंत हुरडा(हरियाल बुट,स्वीटकॉर्न,पेरु,बोरं,चटण्या,
गुळ,दह्या बरोबरचा अनलिमिटेड गरम हुरडा...हे एकवेळचं जेवणंच असतं) खातात. परिसरात, आसपास भरपूर भटकतात, खेळतात. चारच्या पुढेच जेवण घेतात. कीतीही तयारी करा भटकून-खेळून दमलेल्या हजारच्या आसपासच्या पब्लिकला गरम जेवण, पोळ्या,भाक-या देताना तारांबळ उडायचीच. बरेचदा प्रसंग पाहून पोळपाट-लाटणंही हातात घ्यावं लागायचच. दिवस कधी उजाडायचा आणि कधी मावळायचा हे देखील कळायच नाही. सगळ्यांकडूनच फार जोशपूर्णपणे ही वेळ निभावली जायची. अर्थात नंतर कृतकृत्यतेचा थकवाही यायचा खूप.
पण हल्ली भरपूर लोकं हुरडा विकतात. आमच्याहीकडे आता अशी कल्लोळी गर्दी होत नाही. व्यवस्थापनावरही जम बसलाय आणि माझ्याही वृत्तीतही बदल झालाय आताशा. कीतीही पॉझिटिव्ह असू देत दिवसभरची कलकल, गोंधळ अगदी नकोसा वाटतो. आपण आपल्यात कामात, विचारात गर्क असावं आणि तोंडी लावण्यापुरतं हिरण्य असावं असंच वाटतं हल्ली. अर्थात घरातले आणि हिरण्यवरच्या इतरांना ही मुभा नाहीचये. पण मी ती सवलत घेतली आहे.
पाच-पन्नास फोनी चौकश्या मार्गी लावणे आणि एक दिवसाआड हिरण्यला चक्कर मारणे एवढचं मी सध्या करते आहे.
म्हणजे कोणे एकेकाळीच्या ह्रद्य आठवणीत रमत, त्याच्या पोष्टी पाडण्या इतपत मी निवांत झाले आहे यावर्षीच्या हुरडा फेस्टिव्हलमधे.
No comments:
Post a Comment