कानाची पाळ आणि पोटाची नाळ..वाढवू तितकी वाढतंच जातात.
काल एका ठिकाणी ऐकलेली म्हण. सांगणा-यांनी नाळ म्हणजे भुक-आहार असं सांगितलं म्हणून ते फारच समर्पक वाटलं.
कधी लक्षातही आली नव्हती ही गोष्ट.
पुर्वीच्या लग्नाच्या, ब्राह्मण भोजनाच्या गोष्टी आपण कुतूहलाने ऐकायचो. अमक्या गावचे ब्राह्मण जेवणानंतर अटीतटीने पन्नास लाडू खातात, चार-पाच लिटर आमरस-खीर अक्षरशः भांड तोंडाला लावून संपवतात वगैरे..वगैरे. तर ते बहुतेक वेळा खरं असतंच. आहार-भुक ही एक गोष्ट अशी आहे ती खरंच वाढवू तितकी वाढतच जाते. दोनेकशे किलो वजनदार माणसांच्या आहारा विषयी आपण वाचतोच ना पेपर मधून नेहमी.
तसच ते कानाच्या पाळी बद्दलही खरंच असावं.
दिडेक वर्षापूर्वी मी नाक टोचलं. साऊथ इंडियन टाईपची भक्कम मोरणी घालण्यासाठी म्हणून.
तर नाकाचं, कानाचं छिद्र मोठं करायचं असेल तर काही प्रांतीय नुख्से असतात. कडुनिंबाची कोवळी काडी घालायची,लवंग घालायची..आंघोळीच्या पाण्याने त्या फुगतात आणि आपसूकच छिद्र मोठं होतं. मध्यंतरी काही राजस्थानी भटक्यांना भेटले. हे मोठाले वजनी झुमके कानात. एखाद्या खिळ्यासारखी कानाची छिद्र मोठी,रुंद झालेली, करवून घेतलेली. तर म्हणे मोर पिसाची मागची कडक पांढरी दांडी कानात घालून ठेवली की पाळीची छिद्र मोठी होतात.
अफ्रिकेतील काही जमातीत तर कानात पुरीच्या आकाराच्या लाकडी प्लेटस अडकवतात. खालच्या ओठातही एक तबकडी बसवतात. कशा ते माहित नाही. दरवर्षी धातूची एकेक वजनदार कडी वाढवत नेत महिलांची मान कायमची अति ऊंच करायचीही पध्दत एका जमातीत आहे.
चीनी महिलांचे लाकडाचे बुट आणि युरोपियन महिलांच्या कंबरा लहान ठेवायच्या पध्दतीही एवढ्यातच नामषेश झाल्या आहेत.
अफ्रिकेत पुरुषांसाठीही अशी काही बंधन-रिवाज होते-आहेत. पण त्याच प्रमाण नगण्य आहे. सगळी मॉडिफिकेशन्स बाईच्याच शरीराची.
एकेकदा विचार करत बसले की ते नाक, कान, गळा, हात, पाय..अगदी कुठलेच दागिने नकोशे वाटतात अगदी. असो.
तर आपल्या भारतातील एका प्रांतातील म्हणीत देखील जागतिक सत्य दडलेलं आहे हे पटलं.
नाका पेक्षा मोती जड ही पण म्हण आठवते आहे.
पण काहीही म्हणा, म्हणींचा मागोवा फारच रोचक असतो बुवा.
No comments:
Post a Comment