Monday, 4 December 2017

बंजारा भरतकाम.

भरतकामाची आवड आणि अभ्यासू वृत्ती असली की कुठलही भरतकाम आवडतचं. त्यात आपल्या बंजारा लोकांच रंगबिरंगी पण रांगड असं काम तर लक्षवेधकच असतं.
सहसा भटके, ग्रामीण लोकं सहज उपलब्ध गोष्टींतून, नेमक्या पध्दतीनेच त्यांच्या प्रांतात, त्यांच्या राहणीमानाला सुयोग्य अशीच कला आत्मसात करतात. सहसा तशीच वापरात आणतात.

मधे 2-3वर्षांपूर्वी मराठवाडी महिला बचतगटांच सरकारी प्रदर्शन भरलं होतं. सरसकट खाद्यपदार्थ, हातसडीचे धान्य,वाळवणं याचाच भरणा जास्त होता. तरी उस्मानाबाद जिल्हातल्या बंजारा भरतकामाचा स्टॉल लक्षणीय होता. शहराच्या मानाने अत्यंत वेगळं भरतकाम आणि तेही वाजवी दरात त्यामुळे भारंभार या भरतकाम केलेल्या अडीच-तीन फुटांच्या पट्ट्या खरेदी करुन ठेवल्या.
या ग्रामीण लोकांना कीतीही सांगितलं तरी ते त्यांचं ठराविक पध्दतीचंच काम करतात. दहा-बारा मिटरच्या चुणीदार घाग-याला समोरच्या भागात बॉर्डर म्हणून ह्या रुंद पट्ट्या वापरतात. भरतकाम सुबक व पक्क व्हावं म्हणून दोन-तीन पदरी कापडावर हे काम करतात. प्रिंटेड घाग-याला वरुन ही रुंद चटपटीत रंगात भरतकाम केलेली बॉर्डर लावतात.
तशाच त्या आरसे-आबले लावलेल्या अरुंद पण चटकदार पट्ट्या. साधारण अडीच-तीन फुटांच्याच असतात. डोक्यावरच्या ओढणीचा डोक्याकडचा भाग जड-वजनदार करायला आरसे लावून या पट्ट्या जड केल्या जातात. आणि ओढणीला वरुन जोडल्या जातात. आबलेदार छोटे चौकोन-आयात चोळीला समोर,बाहीला लावायला म्हणून असतात. त्यांच्या जत्रेत-बाजारात देखील असेच तुकडे विकायला येतात. अत्यंत सफाईने भौमितिक फॉर्मस वापरुन केलेलं हे भरगच्च भरतकाम मला तरी फार भावतं.
पण आपल्याला भुरळ पडलेल्या या तुकड्यांचा शहरी कपड्यांवर वापर करणं कठीण जातं.
एकतर आपण तलम आणि पातळ कपडे वापरतो. त्यामुळे जोडाचं,वजनाचं गणित जमत नाही आणि कपड्याचा फॉलही बिघडतो.
आपली बाही,कुडत्यांची लांबी,रुंदी फैशनप्रमाणे कमी जास्त असते त्यामुळे या पट्ट्या ड्रेसेसवर वापरणं एक चैलेंजच असतं. बरं भरतकाम देखील इतकं सलग असतं की मधूनच पट्टी कापणही शक्य होत नाही.

मुळात शहरी, नागरी लोकं भरतकाम जितकं निगुतीनं करतात तेवढे हे लोक करत नाही. जाडीभरडी, सिंथेटिक, रंग जाणारी कापडं-दोरे वापरतात. सिमिट्री न बघता ज्या रंगाचा दोरा हाती लागेल त्यानी काम करायचं. छापणं वगैरे तर फार दूरची गोष्ट. पण त्यामुळे होतं काय की त्यांच्या अंगावर,त्यांच्या ड्रेसेसवर या रंगीत गोष्टी उठावदार दिसतात. झगझगीत स्टॉल्सवर तर फारच मोहक वाटतात. लोभ सूटुन आपणही भराभर खरेदी करुन टाकतो. पण ड्रेस डिझायनिंगची, शिवायची वेळ आली की कपाळाला हात मारायची वेळ येते. तरी एखाद दुसरा ड्रेस बनवलाच जातो या पट्ट्या वापरुन बाकीचे तुकडे मात्र कपाटाचे धन होतात.

No comments:

Post a Comment