काल जरा भरतकामाचा मुड होता. लग्नसराई आली आहे. बरेच कपडे शिवून तसेच पडले आहेत. थोडंफार भरतकाम काम करावं म्हणून रेशमांचा पसारा काढला.
या प्रांतात बरेच दिवसात लक्षच दिलेलं नव्हतं. अक्षरशः रंगीत खिचडी झाली होती रेशमाच्या बॉक्समधे.
ब-याच लडी आवरल्या पण काही छोटेमोठे धागेदोरे तसेच गुंतलेले राहिले. हे वेळखाऊ काम मात्र निवांत टिव्हीसमोर बसूनच करण्यासारखं आहे हं.
तर ही मोठ्ठी रेशमी गुंतवळ बाजूला ठेवताना मला माझ्या आज्जीची आठवण झाली. आज्जी म्हणजे वडिलांची आई. कमरेतनं पार वाकलेली,काष्ठवत झालेली, वपन केलेली, कायम शुभ्र पातळात असलेली कर्मठ, करारी व रझाकारांना पुरुन उरणारी खणखणीत म्हातारी बाई. माझी एक सर्वात मोठी आत्या बाल विधवा झाल्यामुळे आमच्याकडेच कायम राहिली.
म्हणजे या मायलेकी जोडीनेच रहायच्या, फिरायच्या.
या दोघींचं जास्त वास्तव्य गावीच असायचं पण वर्षा-दोन वर्षातनं आमच्याकडे औरंगाबादला यायच्या आणि आल्या की साधारण तीनचार महिने रहायच्या. खेडेगावचं वळण म्हणून या दोघी गावी फार कडकडीत सोवळं करायच्या,पाळायला पण लावायच्याच.
पण आमच्याकडे औरंगाबादला आल्या की जरा मवाळ व्हायच्या. आमचंच सहाजणांच लेकूरवाळ कुटुंब, शहरी वातावरण, बाबांची सरकारी नोकरी, सरकारी घर, आईचं शिवण, नांदेडहून येणा-या-जाणा-यांचा राबता, शिळं नळाचं पाणी, बाटल्यातलं दुध, ब्रेडचा अनिवार्य वापर..इत्यादी. त्यामुळे गावचं सोवळं इथे पाळणं अशक्यच आहे हे समजून त्याही जरा समंजसपणे घ्यायच्या. पण गेलं गावी परत की येरे माझ्या मागल्या.
मग तिकडचे काका-काकु-बहिणीही वैतागायच्या. ते म्हणायचे ठेवून घ्या त्यांना तिकडेच. ब-या रहातात गुमाने तुमच्याकडे.
शहरात त्या खूपच परावलंबी होत असतं. त्यामुळे इथे कुठलीच आततायी कृती करता येत नसे.
उत्तर आयुष्यात माझ्या आजीला या अतिरेकी सोवळ्यातला फोलपणा कळला होता आणि वयामुळे चांगलं चुंगलं खावं-प्यावं वाटायचं, सोवळही झेपायचं नाही. झोपायला गादी,आंघोळीला गरम पाणी, खायला तुपसाखर, ब्रेडलोणी, जैम-साखरांबे इत्यादी.
मराठवाड्यात त्याकाळी वपन केलेल्या स्त्रिया फार जिवाला व मनाला मारुन रहात असत.
धाबळीवरचं झोपायचं, गार पाण्याची आंघोळ,
तेलातुपाचं खायचं नाही, प्रवासात पाणीही प्यायचं नाही, कुठलाच शृंगार नाही वगैरे..वगैरे.
शहरात आलं की जरा राहणीमानातही व वातावरणातही फरक पडायचा. सगळाच बदल बरा वाटायचा. त्यामुळे आमच्याकडे यायची उत्सुकता असायचीच. पण येऊन जेमतेम महिना झाला की आता आम्हाला नेऊन घाला असा धोशा सुरु करायची. सारखं आपलं बोटं मोजत एकादश्या,प्रदोष,पौर्णिमा,अमावस्या मोजायच्या आणि आता आम्हाला अमूक तिथीला सोडाचं असं पालूपद लावायची.
दोघीही बाबांना जरा घाबरायच्या. त्यामुळे आजीची सगळी भुणभुण दुपारी आईजवळ. घरातली सगळी कामं आटोपून सकाळी अकरा नाही वाजत की आई आजीला जागेवरचं जेवण देऊन शिवणाला बसायची. आणि आजीला मात्र सकाळची कामं झाली आणि जेवण झालं की अख्खा दिवस रिकामा पडायचा.
मग आजी रोजचा न्युज पेपर मागून मोठ्याने वाचायची.
हा काळ भिंद्रनवाले-ऑपरेशन ब्लु स्टारचा होता.
रोजच्या ठसठशीत बातम्या फक्त पंजाब, दिल्ली आणि तिथले गोळीबार,मारामारी ह्याच असायच्या.आज इतके मेले,तितके जखमी झाले. अक्षरं जुळवून ती ठळक बातम्या वाचायची. पण रोजचा देणं ना घेणं असलेला संदर्भहीन तोचतोचपणा बघून म्हणायची..
जाऊद्या..किती का मरेनात. आपल्याला काय करायचय ?
बस ! आपल्याला आता फक्त वाढोण्याला जायचयं.
वाढोणा म्हणजे मराठवाड्यातलं,नांदेडजवळचं
आताचं हिमायतनगर. आमचं आडबाजूचं,रुक्ष गाव.
एकदा डोक्यात विचार चक्र सुरु झालं की लगेच वाकलं शरीर घेऊन शिवण शिवणा-या आईजवळ जाऊन बसायची. इथे येऊन कीती दिवस झाले याचा हिशेब द्यायची. आणि आता कसं तिला गावाकडे गेलंच पाहिजे हे पटवून द्यायची. एकतर ती बरीच थकलेली,वाकलेली होती. तेंव्हाच्या पैसेंजर रेल्वेज्, यांच निर्जळी कहरी सोवळं..
म्हणजे घेऊन जाणाराही भरवश्याचा व खमकाच लागायचा. त्यामुळे यांच्या मर्जीने यांची जा ये करवणं अशक्यच असायचं. दिवाळी,उन्हाळा बघून त्यांना पाठवायचं हे ठरलेलंच असायचं. पण माझी आज्जी फार हट्टी होती. नांदेडहून जो कोण आमच्या घरी येईल त्यांच्या मागेच लागायची मला नांदेडपत्तूर सोडा म्हणून. अहो मला फक्त नांदेडला सोडा, पुढं माझं मी जाते. यंदा गावी खूप पाऊस झालाय म्हणे, अमूक-तमूक जत्रा आहे..मला जावचं लागते..शिवरात्रीला परमेस्वराचं दर्शन घ्यावचं लागते..वगैरे..वगैरे अनेक कारणं.
She just had many reasons to go back.
बरं तिथे तरी टिकतील का ? तर नाही. झाले दोन महिने की लेकाकडे जाईन, तुपरोटी खाईनच्या थाटात इकडे परत यायची तयारी. तिकडची ना इकडची कुठलीच सोय बघायची नाही. आलं मनात की मला नेऊन घाला..मला पोचवा.
या मला नेऊन घालाचा धसका तर इतर नांदेडकर नातलगांनी इतका घेतला होता की कामा निमित्त आलेले लोकं परस्पर निघून जात. आम्ही देखील आतून खाणाखुणा करुन त्यांना वाटेला लावत असू.
मग ही चिडून तिकीटाचेही पैसे द्यायची तयारी दाखवायची. फक्त नांदेडच्या स्टेशनात उतरवा मग जाते माझी मी अशीही लालूच दाखवायची. अगदी शिवण टाकायला येणा-या महिलांनाही तुम्ही कुठचे हे ती सहेतुक विचारायची.
तर हे असं सगळं असताना माझ्या आईच्या मागे शालुनी..तुला सांगते बघ..असं म्हणत रोज दुपारी भुणभुण लावायची.आई पण शिवण न थांबवता बरं-बरं करत, समजावून सांगत खिंड लढवायची.
पण तिला माझ्या आईचं फार कौतुक. रंगरुपाचही आणि गुणांचही. आईची शिवणाची धडपड, घरातले कष्ट आजीला जाणवायचे. मग तेच ते बोलून कंटाळली की म्हणायची दे तुझं एखादं काम मला. ते तरी करते बसल्या बसल्या. मग आई तिच्यासमोर कपड्यांच्या चिंध्या(पांढरे-प्लेन रंगीत, प्रिंटेड, युनिफॉर्मचे चौकडी,अस्तरांचे, तलम-भरडे इत्यादी)
हुक्स-बटणांची खिचडी, लेसेसचा गुंता,
रिळं-रेशीम-लोकरींची गुंतवळ ठेवायची आणि मग बसल्या-बसल्या आजी त्याचं जमेल तसं (नजरेनी कमी,स्पर्शाने जास्त) सॉर्टिंग करुन ठेवायची, निटसं गुंडाळून ठेवायची, चिंध्या साफसूफ करुन सरळ करुन व्यवस्थित घड्या घालून गाठोडं बांधून ठेवायची.
हो..मराठवाड्यात गाठोडी बांधायची फार परंपरा आहे. निटसं,आटोपशीर गाठोडं बांधणा-या माझ्या काही बहिणी फार स्वतःच कौतुक करुन घेतात.
तर हे करेस्तवर संध्याकाळ व्हायची. मग चहाच्या निमित्ताने आई उठली की स्वतःच्या धाबळीवर स्थानापन्न व्हायला परतताना आजी पुन्हा एकदा गावचा पाऊस, जत्रा, लग्न, मयतांचा पाढा वाचायची आणि 'चला आता उद्या रेल्वेत बसवून द्याच'चा निष्फळ फतवा काढत ती जागेवर जाऊन उद्याची वाट बघत बसायची.
तर आजची माझी रेशमांची आवराआवर आणि ही रंगीत गुंतवळ पाहिली आणि हे सगळं आजी-आत्या प्रकरण आठवलं.
आमची ही मोठी आत्या फार फटकून वागणारी होती. पण आईबरोबर तीही इकडून-तिकडे तिच्याच बरोबर फिरायची. पण कधीही, कुठेही सौजन्याने रहायली नाही. शेवटी मुलाचा संसार आणि भावाचा संसार असा फरक रहातोच.
माझ्या आईची धडपड आज्जी पर्यंत पोहचली पण तिच माझी आत्या ना कधी मदतीला आली ना कधी काही शिकली. अख्ख आयुष्य रंग उडालेल्या कपड्यासारखं गेलं तिचं.
पण तिच्यावरही लिहायचं आहे मला एकदा.
कसं का असेना पण आपल्या बागेतलं एक झाडं असच वाळून जातं-गेलं याच मला फार वैषम्य वाटतं हल्ली.
No comments:
Post a Comment