आज असाच फिरायला जायचा कंटाळा केला. बहुतेक वेळा अशा वेळी जर सुस्ती असेल तर जरा जास्तीचं लोळून घेतलं जातं.पण आज मी टक्क जागी होते. म्हटलं चला फिरणं नाही तर नाही हिवाळी पहाटेतली आपली बाग तरी नजरे खालून घालू.
शिस्तीच्या,कामसूपणाच्या धबडग्यात आसपासच्या इतक्या सुंदर आणि मनोहारी गोष्टी आपल्या नजरेआड होतात की आपण त्याची कल्पनाही करु शकणार नाही.
हल्ली छान गारठा असतो. तरी मी साडेसहा पर्यंत बाहेर पडतेच. सुर्याच्या आगमनाची वर्दी आल्यामुळे रात्रही झटपट आवरतं घेत असते. थंडी और देरीसे निकलनेवाला सुरज, त्यामुळे बहुदा पक्षीही टेक ईट इझी घेत असावेत. मी हमरस्त्याला लागले की सगळे बगळे माझ्या डोक्यावरनंच पश्चिमेकडून पुर्वेकडे उडत जातात. पुढे एक नाला आणि मोठं वाळेल झाड आहे. तिथे ते बहुधा पहिला स्टॉप घेतात. रात्रीच्या विश्रांती नंतरची ती त्यांची पहिली उडान असते बहुतेक. आणि ब-यापैकी दुरुन येत असावेत हा माझा होरा.
शाळा सुटल्यासारखे सगळेजणं जथ्थ्याने पण लयदारपणे उडत जातात. पण चकार आवाज नसतो. माझ्या डोक्यावरुन जाणारी त्यांची ती दमदार पण निरव उडान बघायचा मला छंदच लागलाय या हिवाळ्यात. अगदीच पाच मिनिटं देखील मला उशीर झाला की चुकामुक ठरलेलीच. म्हणजे मीच मनातल्या मनात म्हणते अरेच्या आजचा आळस महागात पडला. त्यांच्या तर मी गावीही नसेन.
मग ठरावीक रस्त्यावरचं, ठराविक अंतर फिरुन आलं की तसाच चहा करायचा,काही कामं उरकायची आणि साधारणतः आठच्या मागेपुढे नेहमीचीच जागा, खुर्ची, चहा, कप, चष्मा आणि मोबाईल घेऊन बसायचं.
गरमागरम दोन घोट घेतले की नजरेच्या टप्प्यातलीच ठाकठीक ठेवलेली बाग बघायची,निरिक्षण करायचं, फेसबूकवर टाकायचं. काडीमात्रही बदल होत नाही.
पण आज ठरवूनच उठले मागच्या भरताडी बागेतच बसून चहा घ्यायचा म्हणून.
कामसू सुगरण उठली. खाली आली. लाईट लावला,फ्रिज उघडून दुधाचं पातेलं काढलं. तुपाळ सायपोळी सायीच्या भांड्यात जमा केली. मातीच्या हंडीतलं दही विरजण म्हणून त्यात टाकून झाकून ठेवलं. कालचं उरलेलं इडली बैटर बाहेर काढलं. नाश्त्याची तयारी म्हणून त्यात नाचणीचं पीठ कालवून ठेवलं. मिस्टरांचा काढा करण्याला आज सुट्टी दिली. तोवर चहा झाला.
खुर्ची बाहेर पेरूच्या झाडाखाली ठेवली व आरामशीर फाफटपसारी बाग बघत चहा घेत बसले.
मागची बाग म्हणजे नावडत्या राणी सारखी. कुणी बघायला नाही का बोलायला नाही. आपापल्या नशीबाने झाडं वाढताहेत, फुलताहेत.
हे बघा..एखाद्या पुरेपूर नऊ महिने,नऊ दिवस भरलेल्या गरोदर स्त्री सारख्याच, वजनदार पेरुंनी फांद्या अगदी अवघडून जडावल्या आहेत. तो पहा एखाद्या सवाष्णीच्या कुंकवासारखं ऐकमेव पिवळ-नारिंगी फुल अंगी मिरवत लालभोपळ्याचा वेल मोकाटपणे इस्ततः पसरलाय.
तुम्ही कितीही पट्टीचे चित्रकार असलात तरी निसर्गातले रंग शब्दात पकडणं कठीण आहे.
पिवळलेल्या गवती चहाचं कालचं शिरकाण केलयं. हा पहा गनिमासारखा पाय-यांमधनं औदुंबर चांगलाच फोफावलाय. भिंतीजवळच असलेली अबोली अबोलपणेच पण रंगी फुलांनी लक्ष वेधून घेत आहे.
आणि तो बघा पानगळी पण उंचापुरा आवळीचा वृक्ष या सगळ्यांपाठी छत्रपतींसारखा खंबीरपणे उभा आहे.
पपई, चिक्कू, जास्वंदी, तगर आपापल्या वैयक्तिक भागधेयानीशी वाढताहेत,फुलताहेत. कुणी बघो ना बघो.अख्खा परिसर निरव.माझ्या तिथे असण्याची कुणालाच दखल नाही.
फुलचुखे पण अजून घरातलीच कामं आटोपताहेत का ?
किती छान आयुष्य ना प्राणी-पक्ष्यांच !
तुझं तु जग माझं मी जगतो/जगते.
कुणासाठी राबणं नाही, मरणं नाही, चंदनासारखं झिजणं नाही. आर्थिक तोषीस नाही. धस लावून घेणं नाही. कुणाला घडवणं नाही. कुठलाही गलेलठ्ठ वारसा ठेवायची तगमग नाही.
मुलांची शिक्षणं, लग्न, बाळांतपण...काहीही जंजाळ नाही का टापटीपीचा, कामसूपणाचा, कर्तबगारीचा डंकाही नाही.
शरीराच्या प्राथमिक गरजा भागवायलाच काय तो संघर्ष वा कर्तबगारी असेल ती असेल बाकी आयुष्य म्हणजे घे पंखावरी आणि मार भरारी.
नाहीतर आपण ?
कीती त्या अपेक्षांच्या, समजुतींच्या पुरचुंड्या काठीला बांधतो आणि आयुष्याच्या प्रवासाला निघतो.
Indeed life is too simple and beautiful,
if we determine to take it easy.
No comments:
Post a Comment