Thursday, 23 November 2017

धागेदोरे.

एका शिवून घेतलेल्या कुडत्याला जुन्या पध्दतीची कापडी प्रेस बटणं लावायची आहेत म्हणून एकाला फोन करुन पत्ता विचारला आणि निघाले.
ज्या गोष्टीसाठी मी फोन केला ती गोष्ट आणि अशा शिवणाशी रिलेटेड अनेक गोष्टी एकेकाळी माझ्या आयुष्याच्या अविभाज्य गोष्टी होत्या.
माझी आई हौशी पण व्यावसायिक शिवण शिवायची.
काळ सत्तर ते अठ्ठ्यांशी पर्यंतचा. अगदी नेमाने आठवड्यातून दोनदा तरी बाजारात जावंच लागायचं. तेही पायी.
कधी सुया, दोरे, लेसेस, बटणं, हुक्स, अस्तरं, बक्रम,
ईलैस्टिक्स आणायला म्हणून तर कधी ओव्हर लॉकिंग, पिको, काजं करुन घ्यायची म्हणून तर कधी मशीनचं तेल, वादी, सुया, बॉबीन्स आणायचे म्हणून तर कधी बिघडलेल्या मोटरचं काम म्हणून.
ही कामं करणारी गल्ली बोळातले सगळी दुकानं,
दुकानदार परिचयाचेच व्हायचे. तेव्हा ओव्हर लॉकिंगची मशीन नवीन होती. रंगार गल्लीतल्या एका मुसलमानी टेलरिंगच्या दुकानातच ओव्हरलॉकिंग,काजं,पिको करुन मिळायच. तिथला एक मितभाषी पोक्त मास्टर कटर जळण्यावरती एक घरगुती औषध करुन द्यायचा गरजूंना. बहुदा फुकटच. त्याचा एक सावळासा भाचा का मुलगा ओव्हरलॉकिंगची मशीन फार सफाईने चालवायचा.ही मशीन खर्रर्र खटक् करत कशी चालते आणि दोरा कसा भर्रकन सगळीकडनं फिरुन कपडा लॉक होतो हे बघणं सुध्दा मजेशीर असायचं. शिवणाचं सामान म्हटलं की ही लोकं मला अजून आठवतात. अजूनही काही जूने दुकानदार मला पाध्येबाईंची मुलगी म्हणूनच ओळखतात.
आत्ता हे लिहिताना सुध्दा आतल्या खोलीतून आईच्या शिवणाचा आवाज येतोय असं वाटतय. बॉबीन भरायचा फर्रर्र दबका आवाज, पातळ कपडा शिवतानाचा खडखड आवाज,जाड कपड्यावरचा दमदार आवाज, वळणादार टिपांचा थांबत,थांबत आवाज तर लंब्या टिपेची धाडधाड एक्स्प्रेस..खर्रर्र.. खर्रर्र... खर्रर्र.. आणि शेवटी दोरा कापून कात्री ठेवल्याचा आवाज.
नंतर मशीनवर कापड टाकून स्टुल सरकवणं आणि आले म्हणत स्वैपाकघराकडे वळणं.
Oh my god ! I never knew these sounds have itched so deeply in my mind.

असो.
दुकान शोधलं. सगळं सामान होतं त्यांच्याकडे. सुया, रिळं, बटणं, बक्रम, अस्तरं, तेलं, कात्र्या, वाद्या, बॉबीन्स, मशीनचे इतरही पार्टस आणि कापडी प्रेस बटणं करुन देणारं मशीनही. शहरातल्या एका कोप-यात शिवणाचा व्यवसाय करणा-या एक बाई स्वतःकडच्या पैशाचा अंदाज घेऊनच आल्यासरशी बरीच खरेदी करत होत्या. दुकानदारही जाणकारच होता. तरी पण न राहवून त्या जून्या मुसलमानी
दुकानाविषयी त्यांना विचारलं तर काही माहीत नाही म्हणाला.

खरेदी करुन परतले. आणि घरी आल्यावर नव-याला सांगितले अरे तूला माहिती आहे का आज या बटनांच्या शोधात मी अडीच किलोमीटर चालले.
अरे खरंच. बघ हे फिटबिटंच सांगतय.

आठवणींचे हे ऋणानुबंधी धागेदोरे आपल्याला कसे गुतंवतील आणि कुठवर पोहंचवतील काही सांगता येत नाही.

No comments:

Post a Comment