एका अगदी जवळच्या नातलगांच्या निधनामुळे औरंगाबाद जवळच गोदावरी किना-यावरील कायगाव टोके इथे अंतिम विधी करण्यासाठी म्हणून जायचा प्रसंग आला.
या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलेली. आधी अस्थि विसर्जन म्हणून आणि नंतर दहावा म्हणून अशा दोन चकरा झाल्या.
सध्या घाटावरच्या क्रियाकर्मांवरचा दशक्रिया हा चित्रपट खूप चर्चेत आहे. मी हे पुस्तक खूप आधी वाचलेलं होतं तसच घाटावरच्या अस्थिंमधून सोनं-नाणं शोधून,विकून आपली उपजीविका करणा-या झालक-यांविषयी देखील बरच वाचलं होतं. साहजिकच झालकरी बघायची मला उत्सुकता होतीच.
तर पहिल्या दिवशीच झालक-यांच्या कामाचा अंदाज आला. एका देहाच्या साधारण पोतभर अस्थि निघतात. खेडोपाडीचे, शहरातले लोकं मयतांच्या अस्थि जमा करुन इथे येऊन घाटावर नदीत विसर्जित करतात. कलेवराबरोबर काही सोनं-चांदी-नाणी देखील दहन करायची हिंदु धर्मात पध्दत आहे. प्रत्येक जाती, उपजातीच्या पध्दती प्रमाणे,आर्थिक संपदेप्रमाणे व इच्छेप्रमाणे (त्यातही स्त्री आणि त्यातही ग्रामीण असेल तर जास्त सोनं असतं) कलेवराला सोनं वाहिलं जातं. दहनामुळे हे धातू वितळतात पण अस्थितच रहातात. तर जेव्हा नदीत आत जाऊन अस्थि पाण्यात सोडल्या जातात तेव्हा हे सोनं नाणं पण आपसूकच पाण्यात पडतं. त्या सोन्याच्या,पैशाच्या अभिलाषेने हे झालकरी कमरे पर्यंतच्या पाण्यात उभं राहून ही पाण्याखालची अस्थियुक्त वाळू सतत चाळतात आणि सोनं-नाणं शोधतात.मिळालेलं सोनं सोनाराला विकून संसाराला हातभार लावतात. हाच त्यांचा उपजिवीकेचा व्यवसाय आहे. दिवसातले पाच-सहा तास पाण्यात उभं रहाणे आणि येतील तश्या अस्थिंच्या विसर्जनाला मदत करणे।(मुख्यत्वे पुरुष हे काम करतात) महिला- मुलं टोपल्याने पाण्यातली अस्थियुक्त वाळू रोळायचं,चाळायचं आणि सोनंनाणं शोधायच काम करतात.
दुस-या चकरेत जरा या लोकांशी बोलायच्या हिशेबानेच पाऊलं उचलली.
आम्ही जरा पहाटेच गेलो होतो त्यामुळे घाटावर सामसूम होती पण तासाभरातच वर्दळ सुरु झाली.
पण झालकरी दिसेनात. नऊ-दहा वाजे पर्यंत पटापटा सगळे झालकरी कुटुंबीय जमले. पाच-सात पुरुष, साताठ बायका तिनचार मुलं. सगळे स्वच्छ तयार होऊन, बायका ठसठशीत भडक कुंकू लावून आलेल्या. एव्हाना एकही रक्षा विसर्जन करणारी पार्टी आलेली नव्हती त्यामुळे आल्यासरशी सगळे झाडाखाली निवांत गप्पा मारत,चुना-तंबाखू लावत बसले. फोटो काढत मीही जरा त्यांच्यात जाऊन बसले. जरा संवाद साधला. त्यांच्यातल्याच दोन छोट्यामुली दोरीला लावलेल्या लोहचुंबकानी गळ टाकून पाण्यातले नाणे जमा करायला बांधीव घाटाकडे पळाल्या.
त्यांच्यातले एक-दोघं छान बोलके होते. भरपूर माहिती सांगितली त्यांनी.
या घाटावर मुख्यतः अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या अस्थि येतात. साधारणतः दिवसाला चाळीस कलेवरांच्या अस्थिंच विसर्जन होतं इथे. आसपासच्या शहरातून,खेड्यातून राख सावडून इथे येईपर्यंत दहा वाजतातच, त्यामुळे यांच काम दहा ते चार-पाच पर्यंत चालतं. जन्मल्यापासून इथेच वावरल्यामुळे न पाण्याची धास्ती ना मृतदेहाची भीती. ब-यापैकी पैसा सुटतो या कामातनं. कधी काम लागलं तर वावरातही काम करतात पण मुख्य व्यवसाय हाच. पावसाळ्यात हे काम तसं कठीण जातं करायला. पण ह्यांच्या पैकी एकही जण आजपर्यंत अपघाताने बुडून गेलेला नाही.
अहो..मैडम कशे बुडू आमी ? मासा कदी बुडतोय व्हय ?
ग्रामीण भागातली महिला असेल तर सोनं जास्त मिळतं. ग्रामीण भागातल्या झाडून सगळ्या मुली, महिला कानाच्या गालाजवळच्या कडक त्रिकोणी भागात खुडकं नावाचं कानातलं घालतातचं. आणि बहुधा मृत्यूनंतर ते खुडकं काढायला फार त्रासदायक जातं त्यामुळे मृतदेहावर तो दागिना तसाच ठेवतात. सवाष्ण महिला असेल तर जोडवी,मंगळसुत्राच्या वाट्या असही ठेवलं जातं.
मैडम शहरातली रक्षा आली ना की काही मिळत नाही. शहरात दहनभुमीतले मसणजोगीच सगळं काढून घेतात. लोकं राख सावडायला यायच्या आधीच मुंडकं हलवून, रक्षा चिवडून सगळं काढून घेतात आणि परत जागच्याजागी मुंडकं, हाडं ठेवतात. तुम्हाला कळत पण नाही.
मग खेड्यात नसतात का मसणजोगी ?
खेड्यात आपापल्या वावरातच जाळतेत. आन तिथं महापालिका नसती नां देनं-घेनं करायला !
येक वस्तु हालत न्हाई तिथली.
शेहरात मसणजोगीच सगळं खाऊन टाकीतो.
ऐकून अक्षरशः अंगावर काटा आला.
आपल्या जीवलगांच्या कलेवराची कीती काळजी घेतो आपण. शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित होईल याची केवढी दक्षता घेतली जाते सगळ्याच नातलगांकडून.
मसणजोग्याचं हात मारण्यासाठी अस्थि आणि कवटीची हलवा हलवी करुन परत शंका येणार नाही असं जश्यास तसं ठेवणं हे तर कल्पने पलिकडचं भयानक वाटलं.
तुम्हाला भिती नाही का हो वाटत ? पोटुशी बाया, चिमुरड्या पोरी अशी मयताची राख-वाळू चिवडतात ते ?
भिती काहेची ? जनमल्यापासून हेच हाये.
आवं नुसती राखंच नाय आमी तं सुसाईडवाल्या बॉड्या शोधून आणितो. त्या पुलावरनं उडी मारली की लगी बॉडी इकडच येती वहात. पोलिसं काय इथ्थोर येतेत आन आम्हालाच शोधायला लावतेत.
हाडं काय, नखं काय, केसं काय..काय बी हाताला लागते. आत्ता डुबी मार्ली तर पाच पंचवीस हाडकं सापडत्येत. भ्या काय त्याचं ?
हां काम लगी बेक्कार हाये पन आता पोटासाटी करनं भागच हाय ना ?
पण सगळ्यांना पुरेलसं सोनं-चांदी सापडत काहो ? केवढुसा तो मणी असतो. सापडेल कधी आणि विकाल कधी ?
खेड्याची राख असली म्हंजे सापडतेच सोनंनानं.
आन शेहरवाले रक्षा विसर्जनाचे म्हनुन शे दोनशे देत्येत ना !
पण तुम्ही आजारी नाही पडत का ? सतत थंड पाण्यात उभं रहाणं, घाणही कीती आहे इथे.
आता लोकाचे काय सांगता ? काही बी आनून फेकतेतच इथे. तरी आमी जमेल तसे साफ करितो. लगी सर्वे कपडे धुन-धाऊन वाळवीतो.असले आमच्या मापाचे तं वापीरतो न्हाय तं जाळीतो.
अहो...आम्ही शहरात तर फार पाळतो काही गोष्टी. लहान मुलांना प्रेत दाखवत नाहीत. गरोदर बायकापण अशा प्रसंगी यायचं टाळतात. बायका स्मशानभूमीत जात नाहीत..अशा घरातलं जेवण बाहेरचे कुणी घेत नाहीत..वगैरे असे अनेक समज आहेत शहरवासीयांचे.
त्ये तुमचं माननं हाय. आता आमी तं यावरच पोट भरु लागलो की.आनी वाईट काय आन चांगलं काय मानलं तं सगळच हाय. आहो आमी तं हाडक्याला येकादा मनी चिकटला तं त्यो बी तोंडानी सोडीवतो. रोजचं झाल्यावर कसलं आलय भय. किती बी घान असो का कुनाची बी राख असो आमाला काय बी होतं नाई बगा.
हे ऐकून तर पार शहारत निशब्दच झाले.
किती त्या तळ्या-मळ्यातल्यासारख्या विरुध्द टोकाच्या समजूती.
पण खरोखर इथला बांधीव आणि जमीनीलगतचा घाट इतका घाण आहे की विचारायची सोय नाही. कलेवराचं पांघरुण, अथंरुण, साड्या, कपडे, घोंगड्या, गाद्या, उशा, चपला पोती सगळं इथेच गंगार्पण केलं जातं.
तसच जी व्यक्ती दहा-पंधरा दिवस क्रिया करते तिचेही वस्त्र इथेच बुडवले जातात.
विधींच तेलतुप, मुंडणाचे केस, कणकेचे, भाताचे गोळे, फुलं-पानं-उदबत्त्या-गोव-या, गाईंचे मलमूत्र, जेवणावळीतलं जेवण,पत्रावळ्या...मोकाट गाई आणि सैराट कावळे...सगळा घनघोर कचरा नुसता काठाकाठाने सडतोय. पण त्या दुःखातिरेकी कर्मकांडा पुढे कुणालाच त्याचं काही वाटत नाही बहुधा.
ग्रामीण जनता तर अक्षरशः जथ्थ्याने येतात इथे. जवळचे, दुरचे पुरुष-महिला सगळे इतके जमतात इथे की घरच्यांना एखाद्या समारंभासारखंच नियोजन करावं लागतं या ठिकाणी. डाव्या हाताला अस्थि विसर्जन की उजव्या हाताला बुडूक आंघोळ. काही कपड्यानीशी तर काही उघड्यावरच कपडे बदलायचाही उपदव्याप करतात. गार पाण्यात बुचकळलेले, ओलेत्याने क्रिया करणारे वयस्क, लहान मुलं तर थंडीने,दडपणाने इतके थरथरत असतात की क्षणभर वाटतं आता हेच गचकतात इथे. झालक-याबरोबर घरातली एखादी व्यक्ती पाण्यात आत जाऊन अस्थि सोडू लागली की काठावरच्या त्या घाणीत उभ्या असलेल्या बायाबापड्या, बाप्ये जोरदार हंबरडे फोडत पार कोलमडून पडतात.
पण दहाव्याचे आणि पुढचे कार्यक्रम करताना मात्र मंडळी बरीच भानावर असते. कर्त्याच्या निधनामुळे उघड्यावर पडलेल्या संसाराचा व्यवहारी हिशेब सासर-माहेरचे उर्वरित कर्ते करु लागतात. वातावरणात एक अनाम धुम्मस असते. मालमत्तेचं राजकारण कुजबूजलं जातं. एखादा अर्काट दिर किंवा भाऊ तिथेही डरकाळ्या फोडतो. मग अनाथ बायका अजून भेलकांडतात. असाच प्रसंग बहुधा पिंडाला कावळा शिवण्याच्या वेळी होत असावा.
शेवटी काहीही म्हणा 'come may what life goes on' हे त्रिकालाबाधित सत्यच शिल्लक रहातं ही दगडावरची रेघ.
आत्ताही एक प्रवचन चालूच आहे. चांगले बोला,चांगले विचार करा, चांगलाच आहार घ्या, चांगलच आचरण करा असं बोधामृत समोरच्या भाबड्या पब्लिकला बूवा ऐकवताहेत. मनुष्य जीवनाचे तिन महत्वाचे सोहळे म्हणजे जन्म सोहळा,विवाहसोहळा आणि मरण सोहळा आहेत म्हणे. जसा आहार तसा विचार,जसे विचार तसा आचार आणि जसा आचार तशी कृती आणि जशी कृती तशी गती. तर चांगली गती आणि मोक्ष हवा असेल तर सत्याचा मार्ग धरा. खोटं बोलू नका, सगळ्यांच भलं होईल असच वागा...वगैरे. तोपर्यंत पुढच्या विधींची तयारी झाली आहे हे बघून बुवांनी आटोपतं घेतलं.
तसं बघायला गेलं तर व्यवहारातले सगळे लोभ, विकार इथे रितसरच नांदतात फक्त त्याला अस्तर दुःखाच असतं.
मंडळींशी बोलण्यात बराच वेळ गेला. बोलतांना देखील रस्त्यावर नजर ठेवून असलेल्या झालकरी भाऊंना येऊ घातलेल्या गाड्यांची चाहूल लागली आणि त्यांनी आटोपतं घेतलं.
आमचेही शेवटचे विधी शिल्लक होते. तेही तिथेच एका बाजूला करण्यात येत होते. आमच्या आधी होऊन गेलेल्या विधींच काही सामान (फुलं-पानं-शितं-काड्या-उदबत्त्या वगैरे) तिथेच पडलेलं होतं ते पायतळी घेत आपल्या विधींचे सोपस्कार करणं फारच कसंतरी वाटत होतं. पण इथलं सगळंच मला तर इतकं विरोधाभासी आणि खाडकन डोळे उघडवणारं वाटलं की या बाबतीतल्या माझ्या बहुतांश संवेदनांची राख रांगोळी झाली असं म्हटलं तरी वावगं ठरु नये.
माणसाचं माणूसपण,भावनिक गुंतवणूक आपल्या-त्यांच्या जीवात जीव असे पर्यंतच नंतर उरतं ते फक्त एक बायो डिग्रेडेबल प्रॉडक्ट आणि त्याला चिकटलेल्या समजूती-गैरसमजुतींची काळी, पांढरी, करडी राख.
No comments:
Post a Comment