Tuesday, 14 November 2017

विसर्जन.

औरंगाबाद-पुणे रस्त्यावरील कायगाव टोका इथला गोदावरी काठचा घाट. इथे जास्त करून नदीत अस्थि विसर्जन आणि घाटावर दहावे,बारावे केले जात असावेत.
माझ्या जाऊबाईंच नुकतच निधन झालेलं त्यामुळे आम्ही कुटुंबीय तिथे पोहंचलेलो.
यंदा पाऊस भरपुर झालेला त्यामुळे आसपासची शेतही पाण्यात बुडालेली त्यामुळे चौफैर छोटी-छोटी पण खोलीचा अंदाज येणार नाही अशी तळी झालेली आहेत. सकाळ संपतानाची वेळ. घाटावर खूप गर्दी आहे. ग्रामीण लोकं जथ्याने येतात अशा ठिकाणी, अशा कार्यक्रमांना. नुकताच दशक्रिया चित्रपट रिलीज झालाय. आमच्याच बाबा भांडांनी लिहिलेलं व नावाजलं गेलेलं दशक्रिया हे पुस्तकही फार पुर्वी वाचलेलं.(चित्रपट याच कादंबरीवर बेतलेला आहे.)तसेच मध्यंतरी पैठणच्या घाटावरच्या
झालक-यांवर बरच लिखाण आणि कविता केलेल्या एका सुह्रदांचीही भेट झाली होती. झालक-यांच्या अनवट आयुष्यावर त्यांनी केलेल्या सहज कविता तर फारच मार्मिक आणि काळजाला भिडणा-या होत्या. साहजिकच झालकरी बघायची मला फार उत्सुकता होती. ती अचानक इथे पुर्ण झाली.

नदीच्या उथळ पाण्यातच थोडसं आत उतरून अस्थि सोडल्या जातात. आणि त्यासाठी स्थानिक लोकांची/झालक-यांची मदत घेतली जात असावी. तर जिथे साधारणपणे अस्थि सोडल्या जातात तिथला पाण्याचा प्रवाह बघून काही झालकरी,चाळणीधारक पुरुष, महिला आणि मुलं छातीपर्यंतच्या पाण्यात उभे असतात. त्यांच्या हातात मोठे लोखंडी टोपले कींवा चाळण्या असतात.
कलेवराच्या सोपस्कारात देहाबरोबर सोन-चांदी,
नाणी दहन केली जातात पण ते धातू अस्थिंमधे आहे तसेच रहात असावेत.
आणि मग या मुल्यवान वस्तू अस्थिंबरोबरच इथे विसर्जितही होतात.
तर ही काठावरचीअस्थियुक्त रेती-वाळू पाण्यात झुकून चाळणीत जमा करुन,चाळत-रोळत पैसे,सोन्याचे मणी शोधत रहाणं आणि मग सापडलेल्या या मौलिक गोष्टी विकून त्यावर उपजीविका करणं हाच या झालक-यांचा व्यवसाय आणि दिनक्रम असतो.

आमच्याकडच्या या दुखःद घटनेमुळे सगळे जीवलग एकत्र जमलेलो.साहजिकच रितीरिवाजांवर भरपूर उहापोह झाला. अगदी सहजपणे जो आपण 'सोयर ना सुतक' हा शब्द प्रयोग करत असतो त्याचा(सोयराचा) माग मला आत्ता लागला. बाळांतपणानंतर जे सोवळं पाळलं जातं त्याला सोयर म्हणतात(बरेच जणं सुखरुप बाळांतपणानंतरही ५-१२ दिवस,सव्वा महिना त्या घरी जात नाहीत) आणि कुणाच्या निधनानंतर जे सोवळं पाळतात त्याला सुतक म्हणतात. या काळात एक गोत्री कुटुंबीयांनी कुठल्याही धार्मिक, संसारी, आनंदी समारंभात सामील व्हायला मज्जाव असतो. मराठवाड्यात तर कहर आहे याचा. एकदा त्यावरही लिहिनच.
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक धर्मात, जातीत, उपजातीत, पोटजातीत...प्रांतानुसार, आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक, भावनिक कुवतीनुसार हे विधी अल्प-दीर्घ काळापर्यंत केले जातात.

माझ्या अनुभवाप्रमाणे दिवस गेलेल्या, नुकतच बाळंतण झालेल्या मुलीला शक्यतो मृतदेह आणि मृत्यूनंतरच्या सगळ्या विधींपासून कटाक्षाने दुर ठेवलं जातं. एक तर बाईच्या तनामनाची नाजूक अवस्था आणि येणा-या बाळजीवाच्या भल्यासाठी पण भीतीपोटीच हा पायंडा पडला असावा असे वाटते. खूप जणं अशा घरचं(जिथे निधन झालं आहे ते घर) जेवत नाहीत,अशा घरी सव्वा महिना पाऊलही ठेवत नाहीत वगैरे..वगैरे.
इथे मला एक ठोकताळी म्हण किंवा विचार आठवतो.
कुठल्याही घराची स्वच्छता बघायची असेल तर त्या घरचा संडास बघावा आणि कुठल्याही समाजाची संस्कारी बैठक जाणायची असेल तर त्या समाजातले मृतदेहावरचे अंतिम संस्कार बघावेत.

पण आश्चर्य म्हणजे इथे या घाटावर एक अख्खा समाजच मृत्युनंतरच्या या विधींच्या अगदी तळाच्या रिवाजांवरच जगतोय.
झाली सकाळ की अस्थिंची वाट बघायची, सतत आपलं पाण्यात उभं राहून अस्थियुक्त वाळू हाताळायची. कलेवराला वाहिलेलं सोनं-नाणं मिळवून,विकून त्यावर उदरनिर्वाह करायचा. बरं या कामातही बायकाचं अग्रेसर. म्हणजे एखादी गरोदर स्त्री देखील स्वतःच्या आणि पोटातल्या जीवासाठी हे काम उरीपोटी घेऊन करणार. घाटावरच्याच कोणाच्या तरी दहाव्या-बाराव्याच्या जेवणाची आस धरणार. आणि त्यावरंच आपला आणि पोटातला जीव पोसणार.
किती विरोधाभासी आहे हे सगळं.
So everything in life is very very subjective.त्यामुळे काळाच्या प्रवाहात परत-परत स्वतःला,आपल्याला,समाजाला इव्हैल्युयेट करणं आणि काळ सुसंगत वागणं फार गरजेच आहे नाही ?

No comments:

Post a Comment