हिवाळा आला की लग्नसराई सुरु होते. आणि मग त्यानिमित्ताने नातलग आणि मित्रपरिवारांचे गेट-टुगेदर्स ठरतात. चाळीशी,पन्नाशी,साठीतले सर्वच अर्थांनी स्थिरावलेले सभ्य लोकं जुन्या शाळा,कॉलेजच्या सुरम्य आठवणीत पार हरवून जातात. त्यातही मुलींविषयीचं काहूर मनात दौडायला सुरवात होते त्या वया पुढच्या गप्पा तर फारच रंगारंग असतात.(Same applies to girls also!😉)
मग कुणाची तरी वाट बघत-बघत रचलेले टपरीवरचे अनेक कट चहा, तिच्या जवळच्या मित्राला दिलेली चहा-समोश्याची लालुच, परवडत नसतानाही केक कापून, गोल्डन चहाची पार्टी मित्रांना देऊन साजरे केलेले तिचे वाढदिवस, मग त्यासाठीच्या पैशाच्या
उधा-या..भांडणं..माफ्या आणि योग जमलाच तर तिच्या आणि त्याच्या लग्नात 'बेधुंद' होऊन नाचणं..वगैरे.
या गप्पात खास जिव्हाळ्याचे विषय म्हणजे 'ती हल्ली कुठे असते, काय करते, तिचा नवरा कसाय' आणि यातुन वेळ उरलाच तर आजची सुबत्ता आणि तेव्हाची कडकडीत कडकी. मग तेव्हाच्या कडकीतला गुलाबी आनंद आणि आजच्या जरतारी सुबत्तेतला फोलपणा. तेंव्हाच्या टपरीवरच्या कट चहाची मजा आजच्या कुठल्याच स्टार,ग्रीन,औषधी चहात नसल्याची खंत एकजात,एकसुरात कबूल केली जाते.
यातले काही जण अजूनही old times sake
टप-यांवर भेटतात, दिलखुलास खुलतात. तु-मी करत बिल द्यायला भांडतात. पण हे बहुतेक मुलं-पुरुषच असं करतात.
मुली बिचा-या एकदा का सुस्थळी पडल्या की अशा ह्रद्य गोष्टी पार विसरुन जातात. पन्नाशीच्या दोन टकाटक मैत्रीणी सहजपणे कुठे भेटल्यात आणि चल गं एकेक चहा घेऊ त्या टपरीवर असं म्हणत चहा घेत असतील असं मला तरी वाटतं नाही. म्हणजे मनात त्याच जुन्या आनंदासाठी झुरायचं आणि आजच्या आयुष्यात मात्र असे आनंदाचे क्षण वेचायचेच नाही. का बरं असं ?
आपणच आपल्या सुबत्तेच्या,संपदेच्या,मोठेपणाच्या भिंती आपल्याभोवती बांधत जातो आणि मग असे आनंदानी सळसळणारे चुकार किरणं आपल्यापर्यंत पोहंचुच शकत नाहीत.
No comments:
Post a Comment