Thursday, 9 November 2017

वसुधैव कुटुंबकम्

हे आमचे बंकटभाऊ. गेली पंधरावर्ष झाली आम्हाला हुरड्याची(ज्वारीची) कणसं हुरडा पार्टीत पुरवतात. दरवर्षी आमच्या समन्वयानेच पेरणी करतात.
आमचा हुरडा फेस्टिव्हल साधारणतः अडीच महिने चालतो. पुर्ण डिसेंबर-जानेवारी आणि नोव्हेंबर-फेब्रुवारीचा एकेक आठवडा. इतक्या नियमितपणे कोवळी,ताजी कणसं मिळण्यासाठी पेरणीही तशीच पंधरा-पंधरा दिवसांच्या अंतरानुसार करुन अडीच-तीन महिने सतत चांगलंच पिक येत राहिल हे बघावं लागतं.पावसाचं गणित तर आहेच पण त्यातही काही कसर राहिली तर निगुतीने पिक आमच्या वेळेबर हुकूमच घ्याव लागतं कारण या ज्वारीच्या कणसांची भाकरी योग्यतेची ठोसर ज्वारी बनत नाही. It's like sweet corn. ताजा आणि कोवळाच खाऊन हा हुरडा-ज्वारी संपवावी लागते. त्यामुळे बंकटभाऊंना आम्ही हुरडा सिझनपेक्षाही आताच जास्त भेटतो.
He is our main and oldest supplier.
त्यांना भेटुन पाऊस,पेरणी,उगवण,पिक याचे सतत अंदाज घेत रहावं लागतं. त्यांच्या आर्थिक अडचणींना वेळीच मदत करावी लागते.

तर आज नेमके बंकटभाऊ मला भेटले.कसं,कायच्या गप्पा झाल्यावर त्यांची आपली यंदाच्या पिकपाण्याची कथा सुरु झाली.
हां..म्येडम..पाऊस लगी बेतशीर झाला व्हता, पन त्यो चितेच्या पान्यान लगी लई घान केली. चितेचा पाऊस लयीच ब्येक्कार बगा.
चितेचा पाऊस ?
हावं ना चितेचा ?
चितेचा ? तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये.
त्ये नक्सत्र नसतेत का ?
ओहो..चित्रा नक्षत्र ?
हां ते तुम्ही चित्रा म्हनतात आमी त्याला चिता म्हनत्यो.
आमचं बोल्न जरा रानगटावानी अस्त्येना.
जुनी मान्स तर म्हन्तेत यक वेळ त्यो दरोडा परवडला पन त्ये चितेच विषारी पानी नको. आन त्यानंतर सवतीचा पाऊश आला तर थोडत्री बरं -हाते.
या येळेस सवतीचा पाऊस लगी मोप झाला.
सवतीचा पाऊस ?
हाव सवतीचा. आमी तं सवतीचाच म्हन्त्यो. तुमी काय म्हन्ता ?
एव्हाना त्यांच्या बोलीभाषेचा मला अंदाज आला होता पण मलाच ओळीने नक्षत्र पाठ नव्हती ना.
स्वाती नक्षत्र का ?
हां त्येच ते सवाती..आमी खेड्यात्ली मान्सं सवतीचा पाऊश म्हन्त्यो त्येला.
चितेच्या पावसावर सवतीचा पाऊश लगी झालाच पायजे. तर काई पिक हाती लागत्येत. वावरातली माती बी सवतीच्या पावसाने लगी नरम होत्ये.नुस्ता चितेचा पाऊश म्हंजी लगी पिकंही जातं आन् वावराचा बी लई खेळखंडोबा व्हतो.
पयल्या पान्यामुळं पिकं लगी कमरेपत्तूर झाली व्हती पन कन्सं मात्र एवढुले लागले.आता काय दाने निघावेत त्यातून ? म्हनायला पाऊश लईच झाला लगी पन आपल्या हिशेबात झाला तं काई लाग हाई.
खरं कीनाई !
आता तुमाला सांगतो मागच्या वर्शी म्या कपाशीचं पिक येकरी विस क्विंटल घेतलं आता या वर्शी दहाबारा क्विंटल निगालं तरी मोप झालं. तर अशी बात हाय पावसाची. आसं कदी बी पानी येऊन कसं चालल ?
नुस्ती धरनं भरुन काय उपेग हाय ? पिकाचं लगी लेकरावानीच असतं.

आत्ता बी सायबाकडनं स्प्रिकलरसाटी (Sprinkler) पैशे उचल घ्यायला आल्तो. खेड्यानं दिवस-दिवस लाईटा जात्येत. आता कवा पानी द्यावं वावराला ?
आन सगळ्यानी यकदाच मोट्री लावल्या तं मोट्री जळत्येत. आता उचल घेत्यो सायबाकडनं आन रातच्याला लाईटा आली की स्प्रिकलर फिरवत्यो. आपल्याला पिक घेनं तर भागचं हाय.आपन सायबाला शबद दिला म्हन्जे दिला.
आपली सोयरिक काय आजची थोडी हाय.
लगी पंदरावर्सापासून म्याच कन्सं द्येतो नव्हं ?
एवढुल्या पोरी व्हत्या माज्या.आता लगी लगिन करुन गेल्या आपल्या घरी. माज्या चारी पोरींची लगिन लगी सायबाच्याच आधारानं झाली बगा.
आणि मुलगा काय करतो ?
त्याची सोळावी चालू हाय. इथं शेहरातचं येतो शिकायला. त्ये कामर्स का काय घेतलय म्हन्तो. बैंकीच्या परिक्षा द्यायाच्या म्हन्तो. त्यांच डोकं लगी इकडचं चालतं. म्या म्हन्ल कर तुला जसं वाटल तसं. म्या हायेच वावराच बघायला. पोरीबी आपल्या घरी सुखात हाईता. लगी काय तानंच न्हाई बगा आता डोक्याला.
बरं म्यैडम चलतो. पैशे घेऊन लगी शागंजातून स्प्रिकलर घेऊनच गावी जातो. पानी असून बी वावर लयीच कोरडं झालया.
येत्यो बरका.

पोटापाण्यासाठी कोणताही व्यवसाय करताना,कष्ट करताना पैशांबरोबरच मिळणारा असा हा माणुसकीचा,
भलेपणाचा निर्झर सगळा वैताग,धडपड विसरायला लावून जिवाला खरोखर श्रांत करतो.

No comments:

Post a Comment