माझ्या दोन बाळांतपणात जे काही डिंकाचे लाडू बहिण, सासू बाईंनी केले असतील तेवढेचं. परत मी कधीही हे लाडू केले नाही वा करवूनही घेतले नाहीत.
म्हणजे हे लाडू मला करताच येत नाहीत कारण कधी केलेच नाहीत.
पण गेल्या वीस वर्षांचा अनुभव असा आहे की जवळपास समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकं थंडी पडली की डिंकाचे कमी-जास्त ड्रायफ्रूटस् घातलेले लाडू अगदी आवर्जून करतातच.
झाडून सगळ्या कामवाल्या,हिरण्यवरच्या कष्टकरी महिला, ड्रायव्हर्स, भाजीवाल्या, फळवाल्या, नातलग, सगळ्या मैत्रीणी हे लाडू करणार म्हणजे करणारच.
थंडीत तब्येतीला, हाडांना, कमरेला चांगले असतात म्हणे हे लाडू. कष्टकऱ्यांच एकवेळ समजू शकतं पण अति वजनाचा सामुहिक रोग असलेल्या एक थरातील माझ्यासहच्या समाजाला या लाडवांच्या खुराकाची तशी खरीच गरज नसते.आता कौतुकच करायचं तर कशाचही करता येतं म्हणा. असो.
तर या वर्षी विडाच उचलला हे लाडू करून बघायचा.
नुकतीच नांदेड ट्रिप झालेली. तिथेही घरोघर लाडवाचे डब्बे भरलेलेच होते. तिथूनही काही टिप्स आणल्या.
पुस्तकं चाळली. बोले तो तबीयतसे भिडे.
आईचं माहेर कंधार.
त्या भागात डिंक मिळतो तोही खात्रीने धावड्याचाच.(नांदेडकडे या लाडवांना डिगाचे लाडू असं म्हणतात) इकडे गोडंबी,(माझी मुंबईची मावशी मला गोडंबी असं कौतुकाने म्हणायची)चारोळी छान आणि स्वस्त मिळते. या शिवाय काजू, बदाम, खारका, अंजीर, खोबरं हा सुकामेवा अक्षरशः ढीगांनी विकायला असतो रस्त्यांवर या दिवसात.
येताना तोही मेवा घेऊन आले. माहेराची वारी म्हणजे काय ?
थोडं थोडं म्हटलं तरी परतताना लोटपोट सामान होतं.
तर लाडू करायचा आज घाट घातला. सरसर बदाम कापावेत तर अडकित्ता सापडेना. आणि सापडला तरी नवख्याला सराईतपणे अडकित्ता चालवणं कठीणंच आहे. बोटांना भलतीच रग लागते हो !
कोटला कॉलनीत एकदा गणपती उत्सवात महिलांच्या काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एका मिनिटात जास्तीत जास्त आणि निटसं कतरा सुपा-या कातरणे आणि २-३ मिनिटात झटपट घोळदार नऊवार नेसणे अशा त्या स्पर्धा होत्या. मला वाटतं सुपारी कातरण्यात आईला पहिलं आणि नऊवार नेसण्यात तिसरं अशी बक्षिसं मिळाली होती. पांढरी सुपारी अगदी एकसारखी पातळ कातरली होती तिने. आपली आई स्पर्धेत उतरते म्हणजे काय ? अगदी उत्साहाने तिला चियर अप करायला आम्ही जातीने तिथे हजर होतो ना !
आई-वडीलांच्या जिंकण्याचीही एक भारीच किक बसते नाही लहानपणी ?
आमचे बाबा सुपारी खायचे. अति नाही. बहुदा माझ्या वाढदिवसाला एकदा कुणी तरी सुपारीचं झाकणवालं भांड गिफ्ट दिलं होतं. स्टिल प्लेटिंग केलेलं.
ते भांडं, त्यात एकदोन लाल-पांढ-या अख्या सुपा-या आणि काही खांडं-लवंगा, भांड्यावर ठेवलेला लोखंडी-पोलादी अडकित्ता अजून माझ्या नजरेसमोर,त्या धातूंच्या विशिष्ट आवाजासह आहे.
त्याकाळी आई-मावश्या आवर्जून कंधारहूनच पोलादी-लोहाच्याअडकित्ते, विळ्या, किसण्या, खलबत्ते मागवायच्या. तिथले शिकलकरी चांगले बनवतात म्हणून.
बहुदा नांदेडातील नानकजींचा गुरुद्वारा आणि शिकलक-यांची वसाहत हे त्याचं कारण असेल.
अडकित्ता हा शब्द कसा आला असेल बरं ? अडकवलेली सुपारी आणि कत्ता म्हणजे कापणं म्हणून असेल का ?(कत्ता..कत्तल)
माझे बाबा कधीच चोखंदळ खवय्ये नव्हते तरी शेवटी शेवटी त्यांना चांगलं चुंगलं खावसं वाटायचं. त्यांच्या खाण्यातल्या सगळ्या इच्छा माझी बहिण पुर्ण करायची. मला अमूक-ढमूक करुन दे किंवा खाऊ घाल अशी मागणी बाबांनी माझ्याकडे कधीच केली नाही हे आज प्रकर्षाने जाणवतंय.
आत्ताही सगळा मेवा एकत्र करुन तयार आहे. तरीसुद्धा यजमानांचा ओके आल्यावरच लाडू वळणार आहे.
हो..चवीतले बारकावे माझ्यापेक्षा त्यालाच जास्त कळतात. तर आल्या आल्या दोन मुठी मगज मटकावून न बोलताच यजमानांनी पावती दिली. असो.
डिंकाचे लाडू जमले. अगदी एका लाडवावर समाधान होणार नाही इतके छान झाले.
Mission successful.
For me it was not less than any expedition.
मग सकाळी उठून लाडू वळत बसले.
खरंच आपली आई आज असती तर कशी रियेक्ट झाली असती आपलं संसारातलं,व्यवसायातलं,
व्यक्तीमत्वातलं भलं-बुरं बघून ? आपल्या स्वभावात, दिसण्यात, व्यक्तीमत्वात, छंदात, कर्तृत्वात भिनलेले मायबाप बघायला 'आईचं नसणं' याची मला फार खोलवर जखम आहे.
मी स्वतंत्रपणे थाटलेल्या संसाराचं आईने काही म्हणजे काही पाहिलं नाही. संसारात बरेच चढ-उतार येऊन गेले, आनंदाचे-विमनस्कतेचे क्षणही अनेकदा शिवून गेले. वेळोवेळी वाटत राहिलं-राहतं वो होती तो कैसा होता ?
बाबांच्या जगण्यालाही शेवटी पुत्रवियोगाचं दुःखी अस्तर लागलं पण एक तृप्तता आली होती त्यांच्या जगण्याला आणि आमच्याही मनात त्यांच्या विषयी.
आईचं तसं नाही झालं. भरल्या ताटावरनं आणि संसार अर्धा टाकून तिचं अचानक जाणं झालं.
त्यामुळे तिचंच काय पण आमचंही आयुष्य कायमचंच अपुर्णांकात राहून गेल्यासारखं वाटतं कधी कधी.
No comments:
Post a Comment