Monday, 6 November 2017

सह्रदयी दिवे.

या दोनेक वर्षातच त्रिपुरारी पौर्णिमेच साजरी करण जास्त जाणवू लागलय.बारा-पंधरा वर्षांपूर्वी दिवाळीला इंदौर-मांडू-ओंकारेश्वराच्या परिसरात होतो.ओंकारेश्वरला नर्मदे किनारी देव ऊठणी एकादशीच्या आधीची पुर्वसंध्या अनुभवली होतीच.तसच पुढेही ठिकठिकाणी या दिवसात नदीच्या पात्रात दिवे सोडलेले पाहिले होते. आणि चार वर्षांपूर्वी तर खुद्द हरिद्वार,ऋषीकेशलाच गंगा आरतीचा आणि गंगेत दिवे सोडण्याचा ह्रद्य अनुभव घेतला होता. तरीपण असे दिवे आपणही आपल्या जवळच्या वाहत्या पाण्यात सोडावे अस कधी लक्षातही आलं नाही. आमच्या या नव्या घरात,नवीन परिसरामुळे आणि आमच्या स्वैपाक करणा-या सारिकामुळे धार्मिक रिवाजांची खूप माहिती सतत मिळते. तर परवा काकड आरतीचा ब्लॉग लिहिताना तिला त्रिपुरारी पौर्णिमा तु कशी साजरी करते असं विचारलं तर चातुर्मासातले रोजचे काही रिवाज करणं आणि या त्रिपुरारी पौर्णिमेला त्याची सांगता एका टोपल्यात पाणी घेऊन त्यात दिवा सोडून करते असं तिने सांगितलं. ताई आजच्या दिवशी दिवा पाण्यात सोडण्याला फार महत्व असतं बरं.
मग माझ्या लक्षात आलं आपणही का नाही असे दिवे पाण्यात सोडायचे. आपल्या हिरण्यला तर प्रशस्त तलाव आहे, वाहते ओहळ आहेत. Why not at Hiranya ? मनाने उचल खाल्ली लगेच बाजारातून पानांचे द्रोण आणि रेडीमेड फुलवाती आणल्या. उशीरा का होईना पण हिरण्य लगतच्या आठशेवर्षापुर्वीच्या 'आप पाश दर्रा' या हेरिटेज तलावात दिवे मनोभावे सोडले.
ऐसपैस तलावाला अधीन झालेला जांभुळा-गार काळोख, डोंगरामागून वर येत असलेला पौर्णिमेचा तेजाळ मोतीया चंद्र,
आल्हाददायक झुळका, व्हैलीतल्या निरवतेला भंग करणारं चुबुक-डुबुक पाणी आणि त्यावर हुरहूर लावत
हेलकावणारे तेजस्वी दिवे. खरंतर असा कितीसा जीव असतो त्या टिमटिम दिव्यात ? तरी पण एखाद दिवा जरी मिणमिण करत विझू लागला की जीव अक्षरशः कासावीस होतो.
काय जादू-शक्ती-ओढ त्या हलत्या ज्योतींमधे असते कळत नाही.

आप पाश दर्रा. देवगीरी परिसरातील एक प्राचीन तलाव.यादवांनी बांधायला सुरवात केलेला आणि पुढे वेळोवेळीच्या राज्यकर्त्यांनी भक्कम केलेला हा प्रशस्त तलाव. पावसाच्या पाण्याने भरणारा.
शतकानुशतकांचा गाळ पोटात साठवून असलेला हा तलाव पावसाळ्यात तर फार लुभावतो. दुर्दैवाने त्याच्या या भुरळ घालण्यानेच काही बळी घेतलेत.
बेधुंद, मस्तीखोर तरुणाईच्या जीवघेण्या अपघातांना साक्षी रहाणं म्हणजे मन अक्षरशः विदीर्ण होतं.
तर पाण्यात दिवे सोडताना नकळतपणे तेही अभागी जीव आठवले. वाहत्या दिव्यांकडे बघत त्याही आत्म्यांसाठी मनोमन प्रार्थना केली, सर्व कल्याणकारी आर्शिवाद मागीतला आणि एवढ्या आभाळभर आसमंतातही आपल्या तेजाने तळपणा-या ज्योती मागे ठेवून परतले.

No comments:

Post a Comment