Monday, 6 November 2017

गहने.

साधारण तिन आठवड्यांपूर्वीची गोष्ट. रोजचाच मॉर्निंग वॉकचा रस्ता. दिवाळी सुरुच झालेली.शाळांना सुट्ट्या लागलेल्या.त्यामुळे तुरळक गर्दी रस्त्यावर. पण रेल्वे ब्रिज जिथे टेकतो तिथे रस्ता प्रशस्त होतो, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्ठी मोकळी मैदानं आहेत.सर्कशी, प्रदर्शनं, लग्न समारंभं, मेळावे अस काहीना काही चालूच असतं तिथे. तर तिथेच नेहमी भटके लोकही उघड्यावर सिझनप्रमाणेची काहीबाही फुटकळ विक्री करत असतात.एखाद दोन आठवडे कुटुंब काबिल्यासह रहातात आणि मग दिसेनासेच होतात. महिलांची रहाणी गुजरात-राजस्थानी भटक्यांसारखीच असते. काटकोळा बांधा,चटपटीत रंगातला फ्रिलवाले-गोठवाले घागरे,त्यावरच्या वैशिष्ट्यपुर्ण चोळ्या, त्यांनाच शोभून दिसतील अशा विरुद्ध रंगी चटकदार ओढण्या. आणि आर्थिक संपदेप्रमाणे आणि भटकेपणाला सुयोग्य असे अंगावरचे खरे-खोटे भरपूर दागिने. त्यांना पहाताच माझे तर पायच थांबतात. कधी त्यांच्या हस-या,निरागस, उघड्यानागड्या मुलांचे फोटो, कधी महिलांचे पदराआडचे फोटो, मग त्या निमित्ताने थोडा संवाद,कधी घरुन काही कपडे,खाद्यपदार्थ आणून देणे..वगैरे उद्योग मी फारच आवडीने करत असते.

सकाळच्या वेळी यांचे पुरुष साधारणतः दुध-पाव,धंदा अशी सोय बघायला बाहेर पडलेले असतात. त्यामुळे महिला आणि मुलांचच सकाळी राज्य असतं. एखादीशी थोडं जरी बोललं तरी पटापट बाकीच्याही अग्रेसिव्हली जमतात आणि संभाषणात भाग घेतात. साहजिकच आहे. परक्या प्रांतातलं रस्त्यांवरच जिणं सोप्प नसतचं.

तर या दिवाळीच्या तोंडावर पोलादाचे तवे,कढया आणि खलबत्ते विकणारे आले होते. राजस्थानातील चितोडगड प्रांतातले. साताठ कुटुंब. एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यातील आपापले चौक आणि रस्त्यांच्या बाजू वाटून घेतलेल्या. कधीतरी त्यावरुनही सकाळीच भांडण..अर्थात बायकांचीच. मला हे लोक रोजचं दिसतात.बरेच फोटोही काढून झालेत त्यामुळे थोडा बघील परिचय वाढलाय.

मला ट्रायबल राहणीमानाचं अतोनात वेड.त्यात महिला म्हणजे तर काळजाचा ठोकाच. इत्थंभूत स्त्रीवेष जरी असला तरी त्यांच निडर असणं, खमकेपणाने स्वतःला सांभाळून रहाणं, वैशिष्ट्यपूर्ण कपडे, त्याची शिवणाई, नखशिखांत खरेखोटे दागिने, शरीरावरचं गोंदवणं...
List is just end less.
थोडक्यात इथे मी बोट दिलं की मनगटंच पकडते म्हणाना. याबाबतीत माझ्या नव-यानी तर इतका धसका घेतलाय की विचारुच नका. आणि नुसता नवराच नाही आता तर ड्रायव्हर सुध्दा दचकतात रस्त्यात आठवडीबाजार,जत्रा किंवा अशा लोकांच्या वसाहती दिसल्यातर. रामायणातील सीतेला, रामाने फसवून जंगलात सोडलं होतं म्हणे पण ही आधूनिक सीता मात्र खुषीने जंगलात राहून टाटा करणारी आहे बरका. असो.

तर याही वेळेस संवादाची कुंडली जमली.मग जरा दागिन्यांची चौकशी केली.खरे का खोटे ? कुठे केले..वगैरे. त्याही बायका बारागावचं आणि छप्पन रस्त्यांच पाणी पिलेल्या. लगेच विचारलन् मला..चाहिये क्या तुमको ? बोलो कितना दोगे इसका ? माझी तर आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन अशी अवस्था झाली. सच में दोगे ? प्रश्नार्थकपणे एक नजर
नव-याकडे टाकून, हां..हां..क्युं नही ? बोले कितना दोगे. मग कुडत्याची बटनं-साखळ्या, कानातले, झुमके, शिर्षफुल..सगळ्याच दागिन्यांची घासाघीस सुरु झाली. या लोकांचे सर्वच दागिने मोहात पाडतात. पण शेवटी आपल्या वापरण्या योग्यतेचेच घेण्यात अर्थ असतो. यांचे हे चांदीचे दागिने एकतर खूप वजनदार असतात आणि एकदाच सोनाराकडनं घालून घेतले की वर्षनूवर्ष तेच वापरायचे, काढायचेच नसतात म्हणजे शक्यच नसतं. तर तेही आपल्याला शक्य नसतं कारण आपण मैंचिंगचे पुजारी नं !
एकतर वजनी चांदी म्हणूनही महाग आणि आपण रसिकतेने घेतोय म्हटल्यावर या बायकाही अवाच्या सव्वा किंमत सांगतात. त्यामानाने रुप्याचे दागिने स्वस्त असतात पण म्हणुनच जरा बोजड असतात.असो.
पण हे दागिने असतात मात्र सुरेखंच.अत्यंत सफाईच काम, पाहताच भारतीय वाटावेत असे डिझाईन्स.  आणि वर्षानुवर्षे अंगावर घातलेले दागिने म्हणजे झिजून,मळखाऊन मस्त जिवंत झालेले असतात ते.

सकाळची वेळ होती.दिवाळीची घाई होती.थोडासा अंदाज घेतला म्हटलं जरा पुनर्विचार करुन मारावी दुपारी चक्कर. गेले तर जिश्याशी बोलले होते ती नव्हतीच जागेवर. हिची साखळीदार चोळीची बटनं फारच आवडली होती. रस्ता ओलांडून दुस-या महिलांना गाठलं. त्याही उत्सुक होत्याच तिप्पट भावाने जूने दागिने विकून गावी परतायला. परत जरा गप्पा, दागिने पारखणं-आवडणं, घासाघीस, सौदा न जमणं-मोडणं, परत बोलावणं इत्यादी बायकी सोपस्कार रितीने पार पाडून एक कानातलं आणि एक जड शिर्षफुल घेतलं. एकीने तर नवीनच शिवलेला घागरा-चोळी-चुनरी विकत घ्यायचाही आग्रह केला, ड्रेस आणूनही दाखवला.
कानातले कानाच्या वरच्या कानशिलाजवळच्या भागात दोनदोन जोड घालतात.वजनाने जरासे हलके असतात.आणि कानात मोठाले झुमके घालतात.तेही फारच एथनिक वाटतात.पण त्याची फिरकी आणि पुंगळी म्हणजे एखाद्या मध्यम स्क्रु ड्रायव्हर सारखी दांडगी असते. लहानपणीच कानाच्या लहान छिद्रात मोराच्या पिसाचा मागचा दांडा घालून ही छिद्र मोठी करतात ही मंडळी.ऐकावे ते नवलचं ! असो.
हे वजनी पण टपोरं शिर्षफुलं डोक्यावर घालतात.
दो-यात गुंफून, वेणीतही पक्क गुंफून ठेवतात त्यामुळे ते जागचं हलत नाही.
बहूदा डोक्यावरची ओढणी यात अडकून जागीच रहावी  यासाठी या फुलाचा उपयोग होत असावा. म्हटलं तर अगदी साधं डिझाईन पण माझा भारी जीव जडतो अशा गोष्टींवर. दिवाळीच्या तोंडावर बसल्या ठिकाणी चारपैसे जास्त मिळाले म्हणून या बायका खुष आणि आपल्याच गावी सहजपणे भारताच्या एका कोप-यातले देखणे दागिने त्यामानाने सहज आणि स्वस्त मिळाले म्हणून मीही खूष.
कानातले लगेच दिवाळीत घातले. सगळ्यांना आवडले. पुढेही काही दिवस फिरताना त्या महिला अजूनही दागिने विकत घ्या म्हणून मागे लागल्या पण भावलेल्या कुडत्याच्या बटनांचा सौदा फिस्कटतंच गेला आणि मग दिवाळीसाठी म्हणून याही लोकांनी गावचा रस्ता धरला.

बघू, परत कधी, कुठे ही अशी मंडळी दिसली तर  प्रयत्न करुचं !

No comments:

Post a Comment