Friday, 3 November 2017

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने.

आमच्या या नवीन घराच्या अगदी जवळ एक मंदिर आहे (५ देवांच). जवळच रहाणा-या नगरसेवकांच्या कृपेने सतत काहीना काही धार्मिक कार्यक्रम सुरु असतात,मंडपं पडतात, भंडारे संपन्न होतात. त्यामुळे नेहमीच पुजेला जाणा-यांची लगबग,आरत्या-भजनांचे आवाज सतत कानी पडत असतात. तर एवढ्यात रोज पहाटे फिरायला जाताना अनेक वयस्क बायकांची बरीच लगबग दिसायची.शेवटी ठरवून एकदा गेलेच मंदिरात पहाटेच. (पंचमबाबा होतेच आधीच सगळी इत्थंभूत माहिती पुरवायला) अगदी सकाळी सहालाच गेले तर मंदिर नुकतच उघडलं होतं आणि सर्वप्रथम मीच तिथे आले होते. खरंतर काकड आरती अगदी पहाटे पाचवाजताच होते असं ऐकून होते.(माझ्या आत्या,काकवांमूळे) जरा निवांत अत्यंत सुमार मंदिर पहात नाही की अजून चारचौघीजणी आल्या.आल्या आल्या विठ्ठल-रुख्माई, हनुमान, साईबाबा, शनिदेव, गणपती, महादेव अशा सा-या देवांचे दर्शन.(पाय-यांचे चढ-उतार जमले तरच) मग वड,पिंपळ,औदुंबर, आवळीच्या झाडांना नमस्कार,आवळीच्या झाडाखाली ज्योत ठेवणे,गाय-वासराला,पुर्व दिशेला नमन करुन सभामंडपात खुर्चीवर स्थानापन्न. सध्या चौघीचजणी आहेत त्यामुळे कौटुंबिक गोष्टींना बहर न आला तर नवलंच.
...अहो..मुलगा सोडतो मला रोज इथे..मला म्हणाला आई..बसकर आता तुझ्या त्या काकड आरत्या..रात्री उशिरा येतो आणि पहाटेच मला सोडायला त्याला यावं लागतं ना, फार वैतागतो.
...म्हटलं अरे मी जात जाईन माझी मी तर तेही नाही.
...अहो माझाही गुडघा हल्ली फार दुखतो. पुढच्या आठवड्यात जायचय पुण्याला दाखवायला.म्हटलं जमेल तितके दिवस  यावं इथे..कार्तिक म्हटलं की पाय वळतातच मंदिराकडे.
एव्हाना अजून महिला आल्या. स्थानापन्न झाल्या.ज्या मेन बाई होत्या(जरीची साडी,खोपा,गजरा) त्यांच्या पुढ्यातच्या तबकात सगळ्यांनी आपापल्या घरुन आणलेलं दुध,साखर,फुलं एकत्र करुन ठेवलं आणि भजनाला बसल्या.

उठा..उठा..हो देवा आता करत साधारण देवांना आळवणी करत उठवणे,सर्व देवांची,नद्यांची,संतांची स्तुती करणे.मग पूजारी देवांना(विठ्ठल-रुख्माई) आंघोळ घालणार,वस्त्र बदलून बाजूला होणार. मग तमाम महिला हातात घरुन आणलेला काकडा(तुपात भिजवलेली कापडाची मोठी वात) कींवा निरांजन घेऊन देवाची ज्योतीने आरती करणार. ही दिप आरती हा परमोच्च बिंदू आहे या काकड आरती सोहळ्याचा.
सगळ्याजणी ज्योतींनी आरती करताना मी नुसतीच उभी होते तर एका बाजूच्या बाईंनी मला त्यांची निरांजन दिली आणि म्हणाल्या तु पण आरती कर या निरांजनीने थोडावेळ.मी पण दोनचारदा निरांजन फिरवून परत त्यांच्या हातात दिली. परत सगळ्याजणींनी बसून देवांची,नद्यांची,संतांची स्तुती गीतं गायली,फुलार्पण केलं,प्रसाद घेत मेनबाईंना नमस्कार करुन परतायला लागल्या.
काकड आरती कशी असते ते कळलं,पण हे मंदिर फारंच सुमार आणि अस्वच्छ आहे बूवा. रोज इथे येणा-यांना हे कसं काय खटकत नाही कींवा प्रसन्नही कसं वाटत कोण जाणे.
असो पण त्या वयस्क अनोळखी बाईंनी समजून उमजून निरांजन-ज्योत माझ्या हातात दिली याच मला कौतुक वाटलं. पण इथे फक्त बायकांचच राज्य.पुजारी शेजारी रहात असूनही आरतीला उपस्थित नव्हता.

मंदिरातून घरी आल्यानंतर जरा फोनाफोनी करुन औरंगाबादला अजून कुठे कुठे काकड आरती होते त्याची माहिती घेतली. चारच दिवसांवर त्रिपुरारी पौर्णिमा आलेली म्हणजे काकड्याची समाप्ती जवळ आलेली. तर चौकशीत कळलं की रिवाजाने काकड आरती फक्त विठ्ठलाचीच करतात पण हल्ली प्रत्येकच देवाची, प्रत्येक मंदिरात काकड आरती होत असते म्हणून. काळाचा महिमा इतका अगाध आहे की देवही त्याच्या तावडीतून सुटत नाहीत.

शहरातीलच जून्या भागातील एकनाथ मंदिरात काकड आरती रोज शिस्तीत होते ते कळलं आणि मग दुस-या दिवशी पहाटेच आंघोळ करुन तिथे गेले.हे मंदिर म्हणजे आमच्या शालेय जीवनातील पहिला बसस्टॉप.मंदिराने आता कात टाकून चकचकीत संगमरवरी रुप धारण केलेलं. साहजिक आहे म्हणा. आसपास बाजार आहे,बहुतांश व्यापारी वर्गाच वास्तव्य आहे.
पोहोंचले तर २०-२५ बायका आलेल्या.सगळ्याजणी एकजात बेतशीर तयार होऊन आलेल्या.
परत देवांची दर्शनं,जमीनीवर बसून भजनं.परत देव,नद्या,संत तसाच क्रम.पुन्हा उभं राहून काकड्याने आरती. माझे हात पुन्हा रिकामेच.
दुर कोप-यात एक काटकोळी,कष्टकरी महिला,जोडाचं दुरंगी नऊवार नेसलेली खांबाचा आधार घेऊन उभी होती. बाकी सगळ्या महिला एकत्र बसलेल्या-उभ्या.
बहुदा उच्चवर्णीय, सधन, गजरे, जरीच्या साड्या अशा निटनेटक्या तयार होऊन आलेल्या. तर ज्योतीने आरती सुरु असताना त्या कोप-यातल्या कृशबाईंनी जवळ येत त्यांच्या हातातली मातीची लहानशी पणती माझ्या हातात दिली आणि खुणेनीच सांगितलं की तु पण ज्योतीने आरती कर देवाची. थोडावेळ मी आरती केल्यावर म्हणल्या की दे तो दिवा आता माझ्याजवळ, तुला पोळेल. रितसर भजनं संपली.
मेनबाईंनी(पुजा-याची बायको) सर्वांना जागेवरुनंच लोणी-साखरेचा प्रसाद दिला. सगळ्यांनी स्वतःच्या काकड ज्योती-वाती एका ठिकाणी जमा केल्या. माझ्याही चौकशा केल्या.मीही पौर्णिमा आणि तिचं साजरीकरणाच्या चौकशा केल्या. तर उद्या अन्नकुट आहे म्हणल्या. आज रात्री बारा वाजता हरीहराची पुजा आहे असं सांगितलं. म्हणजे रात्री बारा वाजता शंकराला तुळस आणि कृष्णाला बेल वहायचा असतो म्हणे. त्याला वैकुंठ चतुर्थी म्हणतात..वगैरे..वगैरे.
काही उत्साही महिलांनी अन्नकुटाला यायचा फार आग्रह केला.
निघायची वेळ झालेलीच होती तर निघताना त्या कृशबाई माझ्याशी बोलायला म्हणून जवळ आल्या. मला परत या म्हणाल्या. आरतीच्या वेळेस त्यांच सगळ्यांपेक्षा एकदम बाजूला उभं रहाणं मला खटकलंच होतं त्यामुळे मी पण जरा त्यांची चौकशी केली तर त्या तिथे झाडू मारायचं,सफाईचं काम करतात.जवळच रहातात.
मणक्यांचा आजार असल्यामुळे भिंतीला टेकूनच उभं रहावं लागतं म्हटल्या.असो.

तर या दोन्ही मंदिरात अनोळखी बायकांनी माझ्या हातात दिवा इतक्या सहजपणे देण्याने मी फार भारावून गेले. एकतर त्यांच्या मनात असलेलं तेजाने देवाची आरती करायचं असीम महत्व आणि कुणी त्या क्रियेपासून वंचित रहात असेल तर त्याला त्या क्रियेत आपला दिवा देऊन सामील करणं. माझ्या दृष्टीने अशी सदिच्छा मनात येणं व कृतीतही आणणं हेच फार तेजस्वी आहे. Such things connect you instantly.

घरच्या वाटेला लागले तर माहिती प्रमाणे शहरातल्याच एका शंकराच्या जून्या,मोठ्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा सायंकाळी चहूबाजूंनी खूपसारे दिवे लावून साजरी करतात हे समजलं होतं. कंन्फर्म करायला एकदा जाताजाता डोकवावं म्हणून गाडी वळवली.
मंदिराच आवार मोठ्ठ आहे.मंदिरही दोनेक शतकांपूर्वीच असावं.शहरातलं एक लोकप्रिय राबत्याच मंदिर.चकाचक जिर्णोद्दार झालेला आहे.

सकाळचे आठही वाजलेले नाहीत अजून.मंदिर सामसूम. मंदिराकडे जाताना, मंदिराच्या प्रशस्त पाय-या उतरताना एक परिचित बाई दिसल्या. त्यांना तिथे बघून मला धक्काच बसला. बॉबकट,जरीची साडी,हातात तबक, चेह-यावर प्रसन्नता. या मावशी माझ्या आईची शाळकरी मैत्रीण.आईच लग्न लवकर झालं,संसार मागे लागला.या मात्र पुढे शिकून डॉक्टर झाल्या आणि लग्नानंतर औरंगाबादच्याच सरकारी दवाखान्यात नोकरीला लागल्या. एक तडफदार डॉक्टर व्यक्ती म्हणूनच त्या ओळखल्या जायच्या. कालांतराने कोटलाकॉलनीतल्या आमच्याच इमारतीत या मावशी आणि त्यांचे कुटुंबीय रहायला आले.त्यामुळे आमची सगळ्यांचीच मैत्री अजून घट्ट झाली.
अर्थात त्यांची मुलं लहान होती,काका मावशी दोघही सरकारी दवाखान्यात नोकरी करायचे. पण या मावशी धडपड्या आणि फार उत्साही. माझ्या अनुभवी आईला विचारुन खास स्वैपाक,पदार्थ करायच्या.आईकडनं विणकाम,भरतकाम,स्मॉकिंग शिकून मुलीला स्वेटर्स विणायच्या,फ्रॉक्स करायच्या.
मेडिकलच्या स्टाफरुममधे वेळ मिळेल तसंं विणकाम करायच्या, मैत्रीणींनाही शिकवायच्या..अर्थात गाईडंस माझ्या आईचच असायचं.तर मेडिकलच्या स्टाफरुममधे माझ्या आईची कला आणि नाव त्याकाळी असं दुमदुमलं.
या मावशी म्हणजे एकदम फायरब्रेंड व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांना या मंदिरात बघून आणि मलाही तिथे इतक्या सकाळी बघून दोघींनाही खूप आश्चर्य वाटलं.

तिथेच कोवळ्या उन्हात बराच वेळ बोलत उभ्या राहिलो. माझ्या आईची त्यांना अजूनही कशी वेळोवेळी आठवण येत रहाते ते सांगितलं. अजूनही जमेल तसं शिवण करतात,उत्साहाने स्वैपाक करुन लोकांना खाऊ घालतात. मलाही जेवायला बोलावलं. मला फार आनंद मिळतो म्हटल्या या गोष्टीत.

तुला सांगते मेधा....मी इथे रोज साडेपाचला येते. इथे येणा-या बायकांशी संवाद साधते,त्यांना एकत्र करते. आमच्या ट्रिप्स अरेंज करते.त्यांना संसाराच्या पलीकडे बघायला शिकवते.
देव आहे का नाही ? असेल तर तो माझं भलं करेल का वाईट ? या असल्या गोष्टीत मला अज्जिबात इंटरेस्ट नाही बघ. मला इथे पहाटे येऊन छान वाटतं, प्रसन्न वाटतं. काही चांगले आनंदाचे क्षण माझ्या वाट्याला येतात यातच मी तृप्त आहे बघ. माझ्या वाट्याला जो आनंद येतोय तो मी या बायकात वाटते बघ !
मला त्यांच्या जे जेव्हा जसं पटतय ते तसं जगण्याच्या वृत्तीचं विशेष कौतुक वाटलं.

मग परत आईची आठवण काढली.
मेधा तुझ्या आईच्या accident ची माहिती मिळाल्यानंतर I was the first one to check the mortuary..मी म्हटलं मला बॉडीचे डोळे बघू द्या. डोळे बघून मी शालूला ओळखलं..अगं घाटी(सरकारी दवाखाना) काय अख्ख औरंगाबाद हळहळलं गं तुझ्या आईच्या जाण्याने...

मंदिराचा निरामय परिसर, सकाळच प्रसन्न कोवळं ऊन आणि इकडे डोळ्यातनं कढत अश्रूंच्या धारा...
दोघींच्याही.
शोधायला एक आले आणि गवसलं दुसरच.
खरोखर या ऋणानुबंधाच्या अगम्य, अगाध आणि ह्रद्य निरगाठी कधी काळजाला हात घालतील आणि कधी नेत्रज्योती ओलावतील याचा भरवसाच नाही.

जेवणाच्या निमित्ताने परत नक्की भेटायच ठरवून माझ्या आईने बहाल केलेला एक ऋणानुबंध जाज्वल्य ठेवायचा असं मनोमन ठरवत जडपावलांनी आणि भरल्या डोळ्यांनी मी परतले.

No comments:

Post a Comment