Monday, 30 October 2017

असाच, आजचा दिवस.


सध्या अगदी कंटाळवाणे दिवस चाललेत. एका विमनस्क रटाळपणाने घेरलय.कसातरी तो मॉर्निंग वॉक मात्र करते आहे.सध्या त्या वापरातल्या Scholl चपलेचा नरमपणा जाऊन फार टणक झाली आहे.त्यामुळे टाचांची वाट लागून नेहमीचा तरतरीतपणा अगदी थंडावला आहे. In short, चाल बिगडी है.
तर काल जाऊन आधी नवीन चप्पल आणली आणि आत्ता जरा कामं करायला बाहेर पडले.

गेला बाजार संसार आता खरं उताराला लागलाय पण मला तर काही गोष्टींच असं काही गृहिण्य स्फुरण चढलय म्हणता की बापरे !

अख्ख संसारी आयुष्य रेडीमेड आटे, कुठलीही बरी पैकबंद तेलं,(जाहिरातींना न भाळता)तयार तिखट,
हळद,मसाले (मेतकुट,लोणची,जैम मात्र घरीच)
वापरण्यात गेलं आणि आता मात्र मी चोखंदळपणे गहू भरणे, दळून आणणे,थालीपीठाची,उपासाची भाजणी करुन चक्क स्पेशल गिरणीतून दळून आणणे,मसाले घरी करणे असले पौष्टिक उद्योग करत आहे.त्यातलंच एक तब्येतीच काम म्हणजे घाण्यावरनं तेल आणणे.
एक नामांकित जूनं दुकान आहे.
तिथे मशीनवर तेल काढून देतात.गेल्या काही महिन्यांपासून तिथूनच करडईचं तेल आणत आहे.नवरा बायको दुकान चालवतात.मग गेलं की सहज गप्पा होतात.कुठली तेलं चांगली.काही स्वैपाकाला चांगली,काही तळणीला चांगली तर काही कच्च्या वापराला चांगली..रंग-रुप-वासावरनं कशी ओळखायची..सिंगल-डबल फिल्टर्डचे धोके-पौष्टिकता वगैरे..वगैरे. छान अनुभवी उपयुक्त माहिती मिळते. अर्थात स्वतः गेलं तरंच.
शिक्षणाशी काहीही संबध नसताना फक्त व्यवसायातलं मुरलेलं ज्ञान म्हणूनही कीतीतरी मौलिक माहिती या अशा लोकांना असते. एकदा ग्रामीण भाजीबाजारात गेले तर आमचे ड्रायव्हर काका आणि भाजीवाली बोलत होते की शहरातल्या लोकांना कांदा सुध्दा कुठला चांगला असतो ते कळत नाही म्हणून. तर हे असं असतं जागरुक अनुभवातनं आलेलं शहाणपण.त्यामुळे काही बाबतीत शहरी माणसं खरंच अडाणी असतात असं पटायला लागतं.
तर या तेलाच्या दुकानात जायच्या आधी एका मैत्रीणीला रवा-कणकेच्या मशीनच्या शेवयांसाठी साहित्य देऊन आले.आमच्याकडे असं साहित्य दिलं तर किलोंनी शेवया करुन मिळतात.फोडणीच्या शेवयांसाठी अगदी उत्तम. तर तिच्याकडे कळलं उद्या एकादशी आणि तुळशीच लग्न आहे म्हणून.
एकादशी म्हणजे मग चारच दिवसावर कार्तिक पौर्णिमा आली की !
One of the most beautiful full moon day and it's unique celebration.

मागच्या वर्षी याच काळात चढत्या भाजणीने लोकप्रिय असलेल्या २-३ मंदिरात काकड आरतीला गेलेले.
माझ्या वडीलांच्या नातलगांमधे 'काकड आरती' हा शब्द इतक्या असंख्य वेळेला ऐकला होता ना की आता अगदी शेजारीच रोज काकड आरती होतेय म्हटल्यावर न राहवून गेलेच डोकावायला. पहिल्यांदाच पहाटेच्या काकड आरतीचा अनुभव घेतला.
संपूर्ण भारतात त्रिपुरारी पौर्णिमा फार सुंदर साजरी करतात.रात्री नदीत दिवे सोडतात. खूप पुर्वी नर्मदा किनारी अनुभवली होती ही नेत्रदिपक, चित्तवेधक पौर्णिमा.
जराशा आवेगानेच झालेला काळोख,नदीकाठचा हवेतला हिरवट गारवा, आणि कुठलीही आतिषबाजी न करता ग्रामस्थांनी ह्रद्यपणे नदीत सोडलेले टिमटिम शांत दिवे...
हेलकावत..हेलकावत दूर जाताना खरचं फार हुरहूर लावतात या मंद दिपज्योती.
तर या अनुभवलेल्या काकड आरतीवरही लिहून ठेवलय.करीनच तेही पोस्ट एवढ्यात.
पण फार विषयांतर न करता माझ्या वडीलांच्या घरातल्या तमाम जुन्या-पुराण्या अशिक्षित,अल्पशिक्षित स्त्रियांना सगळ्या आमावस्या, पौर्णिमा, एकादश्या, प्रदोष, चतुर्थ्या, तिथ्या आणि सगळे सणवार कधी आहेत ते फटाफट सांगता यायचं(अधीक मासासह) !
माझी लहान आत्या तर बसल्याठिकाणी दोन-चार महिन्यांचं तिथींच कैलेंडर बिनचूक सांगायची. तिचं, माझ्या आजीचं ते हाताची बोटं मोजत पटापट सणवार कधी येतील हे सांगणं बघीतलं की मी चकीत व्हायची.
आम्हाला ग्रैगेरीयन कैलेंडर्स लागतात दस-या नंतर दिवाळी कधी आहे हे बघायला.त्यातही कैलेंडर पाठपोट छापलेली असली तरचा उलटसुलट गोंधळ तर विचारुच नका.
त्यामुळे हिंदू तिथी कैलेंडर आणि काकड आरती म्हटली की आजी,आत्या,काकवाच आठवतात प्रकर्षाने. 
तसेच ते कार्पेंटर्स आणि लाकडी काम करणारे.नजर टाकताच त्यांना कळतं कुठल्या झाडाचं आणि कीती जूनं-चांगलं-वाईट लाकूड आहे ते. आणि कुठलं लाकूड कधी, कुठे, कसं आणि का वापरायचं ते. कीती ह्रद्य ऋणानुबंध आहे ना झाडांशी. पाहताच ओळख पटते.
किराणा, कपडा, काथ्या..अगदी कुठलाही व्यावसायिक असो प्रत्येकाकडेच ही अनुभवी जाण असतेच. आणि त्याचा प्रचलित शिक्षणाशी तसा काही संबंध नसतो.
They have their own pinch of time tested wisdom to share with.

व्यक्तीशः मला 'वल्ल का वाळेल' या पलीकडे आपल्याला लाकूड ओळखता येत नाही याचं फार वैषम्य आहे.
तसचं पौर्णिमा-अमावस्या बघत आणि हाताच्या बोटांवर तिथ्या मोजत हिंदू कैलेंडर आपल्याला सांगता आलंच पाहिजे असंही फार मनापासून वाटतं.
आहे का कुणी शिकवणारं ?
Seriously, I am damn interested.

No comments:

Post a Comment