Tuesday, 10 October 2017

निश्वास

दिवाळी जवळ आली की कपाटं उपसली जातात.जुन्या-पुराण्या साड्यांना हवा दाखवली जाते. मैचिंगच्या बदलत्या कन्सेप्टनी जुन्या कपड्यांची थकवणारी यशस्वी ट्रायल होते. एक नवी तरतरी येते. उर्वरीतआयुष्यातला कपडेपटी रहाणीमानाचा एक फतवा मनोमन निघतो. कधी एकदा त्या जुन्या पण मन गुंतलेल्या साड्या,दागिने नव्या उत्साहाने घालेन असं होऊन जातं आणि उपसा-उपसी करताना कळतही नाही दिवस कधी कलतो ते.
आज,उद्या..उद्या आवरु असं करत चक्क आठवडाभर पसारा तसाच रहातो.
मीनटाईममधे सणावारीचे अनेक प्रदर्शनं येतात. विक्रेतेही लेटेस्ट ट्रेंड, व्हरायटी, हैन्डलुम, डिस्कॉउंट अशी प्रलोभन दाखवतात.आपलीही येनकेन कारणे विकेट पडतेच.अजून दोनचार साड्या-कपडे घरात येतात.एकवेळ ती साडी घेणं परवडतं पण ते ब्लाऊजेस आणि परकरांच बाळंतपण निभावणं फार जिवावर येतं बुवा. पुन्हा जुन्या-नव्यांचा घोळ घालायचा, ट्रायल घ्यायच्या आणि पसारा अजून पसरवायचा.
शेवटी तर हा पसारा आवरताना अक्षरशः शक्तीपात होतो.
का जमवतो आपण इतकं ? हाव सुटत नाही हे मोघम उत्तर. ढिगांनी साड्या.तरी इतरांपेक्षा आपण बरेच संयमी आहोत अशी समजूत आपणच आपली घालायची आणि मनातली घालमेल दाबून टाकायची.

आता या पुढे कपड्यांची खरेदी करायची नाही असं बरेचदा ठरवून झालयं.पण निश्चयाचा महामेरू कधी आणि कसा ढासळतो कळतच नाही.
स्वतःच, स्वतःला केलेल्या प्रॉमिसची वाच्यता करण्याने हसं होतं. पण मग विचार केला चांगलं रहाणं-दिसणं,
ट्रेंडी कपडे घालणं,फैशनेबल दिसणं याचं नाही म्हटलं तरी एक नकळतं सोशल दडपण-एक्सपेक्टेशन आपल्यावर असतचं, नाही का ?
मग का नाही या प्रेशरचा उपयोग आपलाच स्तुत्य विचार तडीस नेण्यासाठी करायचा ?
निदान त्या दडपणापाई तरी आपण आपला निग्रह पाळू.
तर आता मी ठरवलय निदान वर्षभर तरी साडी आणि ड्रेसेस, मटेरियल घ्यायचच नाही...Come may what !
मनावरचा संयम ! तोही अवाजवी खरेदी बाबतीतला.
कीती शुल्लक गोष्ट,पण अक्षरशः आपल्या मनाचा आणि देहाचा भुगा करते.कारण आपण करु देतो हेच खरं.

तर हे लिहिताना देखील मला फार मोकळं आणि प्रसन्न वाटतंय.
अक्षरशः सुस्कारा सोडलाय मी !

No comments:

Post a Comment