Tuesday, 19 September 2017

चार दिवसातल्या गोष्टी.

परवाच्या तेरवाची गोष्ट.
सकाळचे ११ वाजून गेलेले.बेल वाजली.बघीतलं तर ३-४ बायका.एकजण शेजारच्या.ऐसपैस महिला,
ऐसपैस हसू..या या बसा.बसल्या.
बोला काय काम होतं ?
आम्ही नं देवीसाठी वर्गणी जमा करत आहोत.घरपरत २५१ रुपयांची.
कुठलं मंदिर ?
हे इथलं मागचच.(मनातल्या मनात..बरं झालं स्वतःहून तावडीत आल्या)
या आसपासच्या मंदिरानी खरंच फार वैताग आणलाय.
सतत रस्त्यात खांब रोवून मंडप ठोकलेले असतात.
भंडारे लावतात.भाविकांची गर्दी असते. गाडी चालवणं आणि वळवणं मुश्कील होतं.परवाच माझ्या गाडीला हलकासा स्क्रैच आला आहे त्या मंडपांच्या खांबांमुळे. सकाळचे सहा वाजत नाही की पुजा-अर्चा सुरु तीही लाऊडस्पीकर वरनं. हे कमी म्हणून की काय आसपासच्या घरात सोमवार, शुक्रवार, रविवारचे सत्यनारायण, गणपती, महालक्ष्म्या आणि आता पितरं धुमधडाक्यात. गेले दिड-दोन महिने झाले अखंड पुजाच सुरु आहेत इथे. मनात राग खदखदतच होता.
अहो मला जमणार नाही वर्गणी द्यायला.
अहो बायकांचाच कार्यक्रम आहे.स्पर्धा घेणार आहोत आम्ही नवरात्रात.
स्पर्धा म्हणजे कॉलनीतल्याच बायकांच्या ना ? नाही जमणार मला.मी मला जमेल तशी गरिबांना मदत करते.आपणंच आपली काय ब्राह्मणी कौतुकं करुन घ्यायची ?(आमच्या सगळ्या कामवाल्यांना या नवरात्रात एक दिवस हिरण्यला नेऊन आणायच कधीच ठरवलय)
अहो सगळ्या जातीच्या बायका येतात तिथे.
अहं..नाहीच जमणार मला वर्गणी द्यायला.एखाद्या मुलीच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर मी नक्की करेन.पण हे नवरात्रीच्या कार्यक्रमाच मला जमणार नाही.जरा स्पष्टच सांगितले.
ओळखीच्या बाई चपापल्या.दुस-या बाईंनी ओळखलं इथे काही बोलून उपयोग नाही.
लगेच सगळ्या उठल्या आणि नाराजीनेच निघाल्या.

तेरवाची गोष्ट.
सकाळचीच वेळ ढोल-ताशांचे ठणाणा आवाज.अगदी बोललेलं ऐकू येईना,डोकं उठेल असं.आधीच घरात पेशंट, त्यात या आवाजामुळे जूना-नवा धार्मिक राग उफाळून आला.तरातरा बघायला बाहेर गेले तर कालच्याच शेजारीबाईंच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवले जात होते.घरातली एक गृहिणी ओवाळायचं तबक,तांब्या घेऊन उत्साहात उभी होती.हे सगळं पाहिल्यावर मी काही बोलायचा प्रश्नच राहीला नाही.
तेवढ्यात एक टैक्सी आली त्यात त्या कालच्या बाई,त्यांचे यजमान आणि दोन्ही मुलं होती.गृहस्थांनी कौतुकाच्या नजरेनीच सांगितलं की आमच्या मुलाचं स्वागत होतयं.तरुण मुलगा बैंकॉकहून फेंसींग या खेळामधलं सिल्व्हर मेडल घेऊन परतत होता.सगळं घर आणि शेजारी कौतुकात गर्क होते. साहजिकच आहे. लगेच त्या मुलाच अभिनंदन केलं.हिरण्यला सहकुटुंब जेवायला यायचं आमंत्रण दिलं आणि परतले.

परवाची सकाळ.
मनिषाबरोबर आज तिची बारा वर्षाची मुलगी दिव्या पण आलेली कामाला. रविवार नसूनही.
कागं आज शाळेला बुट्टी वाटतं ? पाऊस म्हणून का ?
नाही आज युनिफॉर्म वाळलाच नाही.
का बरं ? एकच युनिफॉर्म आहे का ?
नाही एक निळा आणि एक पांढरा.आज निळा घालायचा होता पण पावसामुळे तो वल्लाच राहिला.
युनिफॉर्म घातला न्हाई की बाई लयी रागवत्यात.मंग मी शाळेतच गेले नाही.
काल न दिलेल्या वर्गणीचे २५१ रु मनात घुमतंच होते.लगेच तिला म्हटलं चल मी देते तुला एक युनिफॉर्म घेऊन पण परत शाळा बुडवायची नाही..promise ?
हो काकू..खुदकन हसु आलं..हातही पटापटा काम करु लागले.
चल आज माझ्याबरोबर बाजारात येते का ? पटकन जाऊन येऊ.
आईला विचारुन लगेच तयार झाली.मीही तयार होऊन निघाले. गाडी काढली.
गाडीत बसली आहेस कागं कधी ?
हो..माझ्या मामीच्या..पन ती लयी जुनी हाय, ही जास्त सोच्छय.
हं..
काकू..ह्यो शिट लयीच माग हाय..
हं तिकडे नॉब आहे बघ..वर ओढ आणि कर एडजस्ट.
बरोबर केलं की पोरीनं.मग रस्ताभर गाडीचे ऑटोमॅटिक फिचर्स समजावून सांगितले. गाणी,एसी,पंखा,काचा वरखाली होणं,सेफ्टी बेल्ट..इत्यादी.
तिच्या नजरेला सगळा परिसर नवीन.शहराची काहीच माहिती नाही.
आपले नेहमीचे दुकानं,फळवाले, कॉफी हाऊसेस, नाट्यगृह, पुल, चौक, रस्ते, खड्डे, सिग्नल्स,
ट्रैफिक जैम्स, पादचारी, भिकारी,
पेट्रोल पंप,मोर्चा-उपोषणाची ठिकाणं...
आपल्या जिव्हाळ्याच्या आणि वैतागाच्या असंख्य ठिकाणांपासून ही मुलगी कोसो दूर होती.तिच्या तिच्या मुठभर आयुष्यात आनंदी होती.
तू नाटक पाहिलं आहेस का कधी ?
काय अस्त त्ये ? न्हाई पाहयलं.
आता लहान मुलांच नाटक आलं की मी नक्की दाखवीन हं तुला. किती छोट्या पण सृजनशील आनंदाला मुकलेली असतात ही मुलं.
...माझा मामा मला इथं घेऊन आल्ता.काकू मला तरी थोडं माईत्ये शेहेर. ताईला तं काईच माईत न्हाई.
तिचा नवरा तिला भेटाला आला  तवा बीबी का मकबरा दाखवला त्यानं.
तु पाहिलास कागं मकबरा ?
च्यक्...
तु या पुलावरनं गेलीस का कधी ?
ह्यो पुल हाय ? गाडीचा ?
हं..जाताना जाऊ आपण या पुलावरनं.
तु सर्कस पाहिलीस का गं कधी ?
सर्कस ? नाई.
मी तुला घेऊन जाईन हं सर्कसला आणि मकब-याला पण. तुला सुट्टी असली की जाऊ.
सहारा हैन्डलुम एक्स्पोसमोर थांबलो तर,
ह्यो कोनचा मॉल हाय का ?
अहं..याला प्रदर्शन म्हणतात.
कपडे,दागिने,चपला,गालिचे,फर्निचर असे अनेक स्टॉल्स्...आम्ही क्रॉकरी घेतली तर पटापटा एकसारखे बाऊल्स निवडले...ह्यो ड्यामिज हाय काकू..नका घेऊ अस म्हणत चटपटीतपणे मदत केली.(ड्यामेज शब्द तिथल्या तिथे पिकअप केलेला)
बाहेर येताना..लयी भारी कानातले होती तिथं.
घ्यायचे का तुझ्यासाठी ?
नको..नको.
काकू..तुमाला लयी आवड हाय नवंनवं घ्यायाची.
हं...हे बघ ही कॉलनी..घरं..तुझ्या एवढी असताना मी या घरात रहायची.
आब्बा माह्या येवढं अस्ताना ?
तुमाला काईपण जुनं लयी आटवतं काकू..मला तं कालचं पन आटवत नाई..
का बरं..कविता तर छान पाठ आहेत की तुला.
परत एक समजूतदार हसू.
गाडी पुलावरनं आणली, थांबून आईस्क्रीम घेतलं.तिला कॉर्नेटो घेऊन दिलं..परत एक समाधानी हसू.
घरी आल्यावर युनिफॉर्मचे पैसे दिले.लगेच विकत घ्यायला बजावलं. आईस्क्रीम खात पळाली घरी.घरही दूर आहे तिचं.पण निट जाते म्हणली.

आज परत कामाला तिच आली.आईला बरं नाही म्हणून. फक्त माझं काम झटपट करुन शाळेत जाणार आहे.
काकू..मला काल देलेले पैशै माझे वेगळे आहेत का आईच्या पैशातले दिले ?
नाही ते पैसे तुझेच आहेत. त्याचा फक्त युनिफॉर्म घ्यायचा..बाकी काही नाही.कागं आईने सांगितले का विचारायला.
अहं..मलाच विचारासं वाटलं.घड्याळाकडे बघत काम आटोपलं आणि धूम पळाली.

विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. तसच काहीसं आयुष्यातलं समाधान, आनंद, खुशी, सुख इत्यादी गोष्टींचही आहे.
म्हटलं तर पावलोपावली म्हटलं तर कुठेच नाही.म्हटलं तर खिशात म्हटलं तर ढुंढतेही रह जाओगे असं.
पेरावेत असे आनंद..त्याच्या मंद झूळका आपल्यालाच श्रांत करतात.

No comments:

Post a Comment