Tuesday, 19 September 2017

ब्रह्मज्ञान!

मध्यंतरी आमच्या घरच्या अंगणात एक ब्रह्मकमळ उमलून गेलं. मी पहिल्यांदाच हे कौतुकाच फुल इतकं जवळून उमलेलं पाहिलं.पण मला काही ते अगदी टपोरलेलं शुभ्र फुल अपुर्वाईने कैमे-यात पकडता आले नाही. तरीपण एक पोस्ट टाकलीच फेसबूकवर.
घर मालकीणीलाही एक फोटो काढून पाठवला.
पण या 'ब्रह्मकमळाची' मला खरंच फारशी माहिती नाही आणि नव्हती देखील. पण सोशल मिडियावर या फुलाच फारंच अपुर्वाईने कौतुक होतं बुवा.

मग एका मैत्रीणीने माझ्या पोस्टवर एक प्रतिक्रिया लगेच पाठवली.फुलाविषयीचे गैरसमज सांगितले, रोपं कशी बनवायची हेही सांगितलं. तिने सांगितलेली रोपं बनवायची पध्दत मीही लगेच अमलात आणली.
शेलाट्या ब्रह्मकमळाच्या झाडाची दोन-चार पानं तोडली आणि दोन बाटल्यांमधे पाण्यात घालून घरातचं ठेवली.साधारण तीन आठवड्यांनंतर पाहिलं तर दोन्ही बाटल्यांमधल्या पानांना मुळं आणि पानंही फुटली आहेत.म्हणजे या रोपाची मल्टिप्लिकेशन्स सहजपणे शक्य आहे.
मग जरा नेटवरुन माहिती घेतली तर कळलं हे so called 'ब्रह्मकमळ' म्हणजे  Epiphyllum oxypetalum या कैकटसचा प्रकार आहे.हिमालयात आणि उत्तराखंडमध्ये याची भरपूर वाढ होते.रात्री उमलणारी शुभ्र व मोठी टपोरलेली फुलं म्हणून जरा जास्तच कौतुक यांच. सुवासाविषयी साशंकताच आहे.
उत्तराखंडचे तर हे राज्यीय फुलं आहे.याच्या विविध जातींना वैज्ञानिक नावं तर आहेतच पण फक्त जुलै-ऑगस्टमधे आणि रात्रीच उमलणा-या या फुलाला 'Queen of the night'  या नावानेही ओळखलं जातं.

तर आता ज्यांना कुणाला या फुलांची भरपूर रोपं करायची असतील त्यांनी मी केला तो प्रयोग करुन बघावा आणि खरंच का हे फुल ब्रह्मदेवाच फुल आहे याचाही नव्याने शोध घ्यावा.कारण असे बरेच गैरसमज असतात. आपण खातर जमा करुन घेत नाही.जसे की वॉटर लिलीजना सर्रास कमळ म्हणून संबोधलं जातं.
मी पण असच समजत होते.पण दापोली-दाभोळ रस्त्यावरच्या डॉ.कोपरकर दांपत्यांची ऐसपैस अभ्यासू नर्सरी जेव्हा पाहिली तेव्हा तिथे सरस्वतीचं बैठकीच ठिकाण असू शकणारी कमळं पाहिली आणि माझा गैरसमज दुर झाला.
खरंतर अगदी लहानपणापासून आपण पाटीवर पाकळ्या-पाकळ्यांच कमळ काढायला शिकतो,आपलं राष्ट्रीय फुल कमळ आहे तरीही फारस खोलात न शिरता आपण वॉटरलिलीजनाच कमळं म्हणून नावाजत रहातो.
आमच्या हिरण्यला छोटी का असेनात पण खरी कमळं लावायचा विचार आहे. ही ब्रह्मकमळं पण नक्कीच लावीन आता.

No comments:

Post a Comment